सुश्री गायत्री हेर्लेकर
☆ जीवनरंग ☆ सांजवात…भाग 3 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
सत्येन…. हो, त्याच्याशी बोलल्याशिवाय मनाची घालमेल कमी होणार नाही, हे ज्योतीला अनुभवातून माहित होते. म्हणुन तिने लगेचच फोन करुन त्याला सांजवातमध्ये येण्यास सांगितले. डोळे झाकून ती शांत बसुन राहिली. ज्योती अस्वस्थ आहे हे मायाने ओळखले.
“ज्योतीताई, बरे वाटत नाही? कॉफी आणु का? नाहीतर खोलीत जाऊन जरा विश्रांती घेता? कामांचे काय हो ,ती करु नंतर.”
“नाही, नाही, नको मला काहीच. I am ok,”
दोन मिनीटे थांबुन…. मनात काहीतरी नक्की करुन. ज्योतीच पुढे म्हणाली, “हे बघ माया,… तु खोलीत जाऊन त्या अनुराधा जोशींना सामान आवरायला सांग,. नाही, तुच मदत कर त्यांना. अन् हो, रेखा आली की त्यांना ईकडे च घेऊन ये”
“ठीक आहे” म्हणुन माया निघाली. म्हणजे त्यांना ठेवुन घ्यायचे नसावे असा विचार माया च्या मनात आला.
स्वातीताईच्या कानावर घालुया, तिला काय वाटते ते पण बघुया. असा विचार करुन ज्योतीने स्वातीला फोन लावले. अन् बराच वेळ बोलणे झाले.
“हो ताई…. माझ्या तरी मनात तसे आहे, खुप धीर वाटला तुझ्याशी बोलुन. हं,हं, सत्येन आला वाटते, रात्री निवांत बोलुयाच, काय होते ते” म्हणुन फोन ठेवला.
अचानक तातडीने का बोलावले या संभ्रमात सत्येन होता. पाठोपाठ रेखा आणि सुरेशही आले. रेखाने…. गेल्या २, ४ दिवसातील सर्व घटना थोडक्यात सांगितल्या.
नंदन तब्येत बरी रहात नसल्यामुळे इथला सर्व व्यवसाय बंद करुन कायमचा अमेरिकेला मुलाकडे जाणार आहे. त्याची बायको, मुलगा आणि सून सगळ्यांचाच अनुआईला तिकडे नेण्यास विरोध, अगदी कडाडून विरोध.
म्हणुन २५ लाख रु, डिपॉझिट देऊन त्याने तिची व्यवस्था ईथे करायचे ठरवले,. सर्व बंगले, घरेही विकुन टाकली.
ज्योतीच्या मनात आले, बाबांची कोट्यावधी ची इस्टेट. आपल्याला काही नाहीच. पण त्याच्या बायकोला, जिच्यामुळे हे मिळाले त्या सख्ख्या आईला फक्त २५ लाख रु, तेही डिपॉझिट. देणगी नाही, एखादे छोटेसे हक्काचे घर तरी ठेवायचे तिला. चिड आली त्याच्या स्वार्थी वृत्तीची. खरे तर सत्येन आणि स्वातीताईकडे मिस्टर यांचा विरोध म्हणुन कोर्टकचेरी केली नाही, आपलाही हक्क आहेच ना बाबांच्या इस्टेटीत.
“रेखा, ज्यो…. तुला माहित आहेच, सांजवातला पैशाची गरज कायमच असते. पण, तरीही त्यांच्या ईथे रहाण्याने तुला मानसिक त्रास होणार, ताण येणार म्हणुन आपण त्यांना नाही म्हणणार आहोत.”
संस्थेची पैशाची गरज महत्वाची आहे, ही संधी सोडुन नये, फारतर ज्योती सांजवातमधुन बाहेर पडेल, असे सत्येन मत.
पण पैसा नंतरही मिळेल पण ज्योती सारखी कार्यकर्ती, founder member गमवायची नाही, त्यांची सोय आपणच दुसरीकडे करून देऊ. असा सुरेश आणि रेखाचाच युक्तिवाद. यावरही बरीच उलट सुलट चर्चा झाली.
ज्योतीचा कशातच सहभाग नव्हता.
शेवटी रेखा तिच्याजवळ जाऊन “ज्यो… खरंच सांग तुला काय वाटते? तुझ्या मनात काय आहे?”
डोळ्यात आलेले पाणी पुसुन, ज्योती अगदी शांतपणे म्हणाली “सत्येन, आपल्या लग्नाच्या
आधीपासुन सर्व निर्णय आपण दोघांनी मिळुन घेतले, किंवा एकमेकांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मला वाटते, आजही तसाच तुझ्याकडून मिळेल. रेखा, सुरेश, मला वाटते, अनुआईला ईथे ठेवू नये” ज्योतीने एकदा सगळ्यांकडे बघितले.
“अनुआईला, आमच्या घरीच कायमचे रहायला घेऊन जावे”, सर्वजण तिच्याकडे अवाक होऊन पाहु लागले. पण तिने आपले बोलणे ठामपणे पुढे चालु ठेवले.
“केवळ लहरींखातर किंवा नंदुदादावर मनात करायची म्हणुन मी हा निर्णय घेत नाही, अनुआईवर आतापर्यंत झालेले अन्याय, तिची मानसिक कुचंबणा, तिच्या डायरीतुन वाचली होती, प्रत्यक्षात बघत होते, पण तेंव्हा काही करु शकत नव्हते, नवविधासाठी काम करतांना, ईतर सर्व बायकांना मदत करतांना हे मला कायम टोचतो असे की माझ्याच घरातील अन्याय मी काही करु शकत नाही, अन् आता संधी मिळते आहे, मी अनुआईला सन्मानाने जगण्यासाठी माझ्या घरी नेणार, माझ्या बाबांनी तिची घेतलेली जबाबदारी, मी स्वीकारणार”
पुढची फाईल बंद करुन बाजुला सारुन ज्योतीने जणु सांगितले की तिचा निर्णय झाला आहे, पक्का झाला आहे. “मघाशी, स्वातीताईशी बोलले, तिचाही पाठिंबा आहे.”
सत्येन, तिच्याजवळ जाऊन, “ज्यो, I am really proud of you, आणि माझ्यावर विश्वास ठेवुन, होकार समजलास, Thanx”
रेखा, सुरेशकडे बघुन, “सुरेश, तु म्हणतोस ते बरोबर आहे, पैसा आपण कुठूनही मिळवू नंतर .पण आता मात्र, तो चेक नंदनला परत देऊन टाका. आम्हाला अनुआईंसाठी एक पैसा ही नको त्यातला.”
तेवढ्यात मागुन, “नाही, नंदनला तो चेक परत द्यायचा नाही, त्याचा या पैशावर काहीही अधिकार नाही.” अनुआई दारातून आत येत म्हणाली.
“अनुआई, अनुआई…” म्हणत ज्योतीने धावत जाऊन मिठी मारली.
तिला जवळ घेत, “ज्यो… ज्यो.. खरंच कौतुक वाटते तुझे अन् सत्येन म्हणतात तसा अभिमानही. तुझा, तुझ्या विचारांचा, आणि तुझ्या या कार्याचाही. पैसे नंदन ने दिलेत कबुल आहे. पण ते आहेत माझ्या नवर्याचे. माझ्या मुलींच्या वडिलांचे, त्यांचाही तेवढाच हक्क आहे त्यावर. माझ्या मुलीच्या कामासाठी, सांजवात प्रकाशमान होण्यासाठीच तो वापरायचा. डिपॉझिट नाही तर, देणगी आहे ही.”
सर्वचजण तिच्याकडे बघु लागले, रेखा काहीतरी बोलणार, तेवढ्यात अनुआई “मायाबरोबर सामानाची आवरा आवर करुन मघाशीच बाहेर येऊन बसले, विझायच्या मार्गावर असलेल्या या दिव्याला आणखी कुठल्या वादळात जावे लागणार, आता उरलेल्या आयुष्याला अजुन कोणत्या बदला ला सामोरे जावे लागणार.. या विचाराने, उदास, निराश झाले होते. पण तुमचे सगळे बोलणे कानावर पडले. ज्योचे किती आणि कसे आभार मानू तेच समजत नाही.”
अनुआईच्या डोळ्यांतील पाणी पुसत, “नाही, अनुआई, नाही, लेकीचे आभार मानतात चा कधी?”
रेखाही पुढे होऊन “आणि… अनुआई. विझायच्या मार्गावरचा दिवा म्हणु नका हं. उलट आतापर्यंत वादळवार्याला तोंड देणारी तुमची जीवनज्योत आता मानाने, शांतपणे… तेवत रहाणार आहे ज्योच्या घरात सांजवात म्हणुन”
कथा समाप्त
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈