सौ. दीपा नारायण पुजारी
? जीवनरंग ?
☆ पाणी रे पाणी ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
रेडिओच्या जाहिरातीतील ताई सारखी विचारतेय, आई कधी येणार गं नळाला पाणी?
छोटूला कळतच नाही आहे ही ताई रोज रोज अशी का विचारतेय? नळाला पाणी तर आहेच ना? मग?
त्यानं आजीच्या मागं एकसारखा तगादा लावला आहे.
छोटू: “आजी ही वेडी आहे का ग? की या ताईच्या घरात खरंच पाणी येत नाही नळाला?”
आजी: “नाही रे वेडी कशी? त्यांच्याकडं नळच नाही. ऐकलं नाहीस का तिची आई तिला विहीर दाखवतेय ते?”
छोटू : “विहीर?”
आजोबा : “हो, अरे तुझ्या त्या पुस्तकात आहे बघ चित्र; वेल चं?”
छोटू : “Well? बापरे. . आजोबा त्यांना रोज वेल मधून पाणी काढावं लागतं? नळ नाही त्यांच्या कडं?”
“आजी , आपण जाऊया त्यांच्याकडं? मला बघायची आहे वेल”..
महानगरातल्या आलिशान सोसायटीत राहणाऱ्या छोटूला घरात नळ नसतात, पाणी नळाला येत नाही ही कल्पनाच करता येत नाही. मागं एकदा त्याच्या यूकेजी च्या’ मिस नं दूध कोण देतं? ‘ असा प्रश्न विचारला होता. छोटू म्हणाला, ‘पिशवी. ‘मिसनं बरंच समजावून सांगितलं. पण हा ऐकेचना. शेवटी त्याच्या आई बाबांना शाळेत बोलाविण्यात आलं. मग एकदा त्याला गावी जाऊन गोठा दाखवावा लागला. तेंव्हा कुठं बाळराजांना गाय आणि म्हैस दूध देतात हे पटलं.
आजी : “हो, जाऊया हं. तुझ्या आई बाबांना रजा काढायला सांगू आणि जाऊ विहीर बघायला.”
छोटू एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं संध्याकाळी आई बाबा आल्यावर त्यांच्या मागं लकडा लावून गावी जायचं ठरवूनही टाकलं.
आजी मात्र विचारात हरवल्या. त्यांच बालपण जरी शहरात गेलं असलं तरी त्यांचे काका- काकू गावीच रहात होते. प्रत्येक दिवाळी, मे महिना या दोन्ही सुट्ट्यांत आजी म्हणजे यमू गावी जायची.
आजींच्या डोळ्यासमोर आठ-नऊ वर्षांची फ्राॅक घातलेली यमू आली. त्यांचं मन भूतकाळात गेलं. छोटू बरोबर बोलता बोलता त्या यमू बरोबर किटलीतून पाणी आणू लागल्या.
“आई, काकू मी येणार आहे पाणी आणायला.”
” खूप लांबून आणायचंय हं पाणी ठमाबाई. तुला नाही जमणार.” . . . काका
“हो आणि येताना थोडं ऊन होईलच. आमची चांदणी कोळपून जाईल.”. . . काकू
अशा कोणत्याही वाक्यांना न जुमानता यमू शांताक्कांच्या मागं लागून फळीवर ठेवलेली लहानशी किटली काढून घेईच. आई आणि काकूच्या मागं मागं ती छोटी छोटी पावलं टाकत चालायला लागे देखील.
शेतातल्या विहिरीवर पोचेपर्यंत तिच्या हातातली किटली शांताक्काकडं पोहोचे. तिच्या हातात, फ्राॅक च्या खिशात फुलं, पानं यांचं संमेलन भरले. प्रत्येक वेगळा रंग तिला खुणावत असे. पानांचा, फुलांचा वेगळा आकार तिला मोहात पाडत असे.
गावापासून जवळच असलेली विहीर. . . सगळ्या बायका इथं जमत आणि मग सुखदुःखाची देवाणघेवाण करत कपडे धुतले जात. दगडावर घासून , धोपटून जसा कपड्यातला मळ बाहेर पडे तसाच मनातला सुध्दा. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचे पिळे, आणि पिळ सुटलेली स्वच्छ मनं तसंच भरलेल्या कळशा घागरी घेऊन सगळ्या घरी परतत.
एवढा वेळ यमू कधी पाण्यात खेळे, कधी आपला फ्राॅक धुवून टाके तर कधी जवळच्या फुलझाडांत रमे. मे महिन्यात मात्र ही फुलझाडं वाळलेली असत. पिवळी पडलेली पानंही तिच्या वही पुस्तकात गोळा होत. शाळेतल्या मैत्रिणींना तिचा हा गावरान अल्बम वेड लावत असे. फिरकीच्या टोपणाची किटली भरुन घेऊन ती घरी परते.
क्वचित कधीतरी काकू नदीवर कपडे धुवायची टूम काढे. वारणा नदीचं तसं उथळ पात्र, खडकाळ काठ, गावापासून लांब असलेला, तिथं नेणारा धूळखात, सुस्त पडलेला, तापलेला मातीचा रस्ता, धूळ बसलेली झाडं, झुडपं, काटेरी निवडूंग! त्या रस्त्यावर काकूच्या मैत्रिणी भेटायच्या. रखरखत्या ऊन्हात, संसाराचा कोरडा भार गाठोड्यात बांधून, कोरड्या मनानं, झपाझप चालत त्या नदीकाठ गाठत. गळ्यात लाकडी ओंडका बांधलेली , पाण्यात डुंबण्यासाठी आसुसलेली जनावरं जड पायांनी संथपणानं जाताना दिसत. धूळरस्ता त्यांनी उठवलेली अक्षर चित्रलिपी कोरडेपणानं वागवत राही.
हाताला काही तरी गार लागलं. आजी भानावर आल्या. आजोबा सरबताचा ग्लास हातात घेऊन ऊभे होते.
“काय, आठवणीतून आलात का बाहेर?”
आजीनं हसून ग्लास हातात घेतला.एक घोट घेऊन त्या म्हणाल्या,” परिस्थिती फारशी बदललेली नाही हो. आठवणीतील गाव काय आणि आपलं शहर तरी काय. आजची बातमी वाचलीत पेपर मधली?”
आजोबा: “हं, इतकी वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून, अजून दैनंदिन गरजा भागवता येत नाहीत.”
आजी: “परदेशात बेसीनच पाणी देखील पिण्यायोग्य असतं.”
आजोबा: “गल्फ कंट्रीज मध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार होत. पाणी महाग आहे पण दुर्लभ नाही.”
आजी: “आणि जीवनदायी पाण्याचं महत्त्व पटवून द्यायला कमी पडलो आपण”.
आजोबा: “या भारतदेशाला पुन्हा एकदा भगीरथ प्रयत्न करावे लागणार बहुतेक.”
“आजी, आजोबा, आजोबा.” . छोटू जोर जोरात हाका मारत होता.
“अगं ही भीमाक्का बघ नळ सुरू ठेऊन कुठं गेलीय. बादली भरून वाहतेय ना.”
दोघंही आवाजाच्या दिशेनं निघाली.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
मो.नं. ९६६५६६९१४८
Email: [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
अतिशय सुंदर रचना, बधाई