सौ.सुचित्रा पवार
जीवनरंग
☆ हमीपत्र …. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
प्रिय गुर्जी,
साष्टांग नमस्कार.
न्हान पनापसन ऐकत आली शाळच्या गोष्टी, गमती जमती.. अगदी किसना सुदाम्याच्या त्या न थांबलेल्या गोष्टी.. कसं ते गुरुकुलात राह्यले, मग एग येगळी कामं करायची अन मग गुरु माऊली कडन शाबासकी घ्याचे!
मला बी मग लै हवस वाटू लागली.असल्या गोष्टी ऐकून कधी एकदा शाळेत जातो,ती पाटी घेतो,अक्षर गिरवतो अन मोठ्ठ काय तर साहेबिन की काय हुतो अस्स वाटू लागलं.
मग मी आईच्या मागं सारखं भुन भुन चालू किली, “मला बी शाळेत धाड.” पण आईनं कसं नुश्या चेहऱ्याने बघितलं माझ्याकडं आन ती काय बोललीच न्हाई.असं रोजचं झालं. समद्या माज्या मैतरणी, पोरं ठोर शाळात जात्यात, ताटली घेऊन भात खात्यात, नवी कोरी कापड मिळत्यात, मी नुसती हरकून जात्या! पण माज्या नशिबात काय न्हाईच असं वाटू लागलंय. आई म्हणती,” काय करायचं लै शिकून?आणि तिनं माझ्या मोट्या भावालाच मला शिकवायला लावलं घरातच;अन तेच्या बरोबरीनं मी शिकतो,लिव्हतो चार मोडकी तोडकी अक्षरं! आई म्हणती, “बास, पोटापुरत येतंय लिव्हायला,आता कोण पत्र लिव्हतय, तवा तुला वाचा-लिव्हायची उणीव भासल? पण फकस्त तेव्हढंच असतं का शाळत? कित्ती गमती जमती माजा भाऊ मला सांगतो. मी आईला म्हणलंच,”ते काही न्हाई आता सुट्ट्या सम्पत्याल मला शाळत जायचंचय!”
मग आईनं एक गोस्ट सांगितली, ती मी तुमाला सांगते, बारकीच है पण मला लै मोट्टी वाटली. आई म्हणाली,” ही लै लै दिवसापूर्वीची गोस्ट हाय, तवाच्या पोरी लै करून शाळेत जात नव्हत्या. गुरुजी घरो घरी फिरून पोरीच्या घरात समजून सांगून कसं बस एखाद दुसरी पोर शाळत जायची. गिली तर चौथी नायतर सातवी बास म्हणायची. पत्र लिव्हायला वाचायला आलं म्हंजी बास! फुढ शिकलं तरी चूलिफुडच बसायला लागणार आन जितकं जास्त शिकलं तर तसा नवरा हुडकायचा अवघड आणि जास्त शिकलेल्या तेवढा हुंडा कुठंन आणायचा? त्यापेक्षा मधनंच शाळा बंद करायची अन लगीन लावायचं असाच नेम हुता. मी बी शाळेत जात हुते, शाळा म्हंजी गावातच घरापसन जरा लांब एक मोकळा सोपा अन चार खोल्या. एक गुरुजी एक बाई हुत्या. चौथीपर्यंत पास झाले.पाचवीला आमच्यातल्या बऱ्याच पोरी बंद झाल्या,म्हंजी हुत्या पाच -सहा त्यातल्या बी दोन तीन गायब! मग पुना कमी संख्या म्हणून अजून एक बंद! आम्ही दुगीच राहिलो.सातवी पर्यन्त शिकायचंच अन बोर्डाची परीक्षा पास व्हायचंच असंच म्या ठरवलं अन शाळत नित नेमान हजर ऱ्हाऊ लागलो.
पैल गुरुजी अन बाई बदलून गेल्या अन दुसरं दोन नवीन गुरुजी आलं. अळी पाळीने आमच्या वर्गावर शिकवू लागलं. एक रजेवर गेलं तरी दुसरं शाळा चालवायचं! सहा महिने निघून गेलं अन माझ्या बरोबरच्या त्या दुसऱ्या पोरीचं पण लगीन ठरलं. राहिले मीच! ना-नू करत कशी बशी कधी पूर्ण कधी अर्धा दिवस अशी मी शाळा करू लागले.
एक दिवस गुरुजींनी आईला बोलवून सांगितलं, “तुमची लेक खूप हुशार आहे, तिची शाळा चुकवू नका, उद्या पासून आम्ही दोघे जास्तीच वर्ग घेतो तेव्हढं न्यायची आणायची सोय करा.” मग कधी आई तर कधी शेजारच्या कुणाबरोबर माझी येण्याजाण्याची सोय झाली. परीक्षा जसजशी जवळ येऊ लागली तशी मला लैच हुरूप आला. मी सातवी फास होणार! आनंदानं मनपाखरू उंच उंच उडायचं. त्या दिवशी अशीच जादाच्या तासाला सुरुवात झाली. हस्त निघाला होता. दुपारीच काळ्या काळ्या ढगांनी सगळं झाकोळून गेलं हूतं. ढगांचा गडगडाट अन विजांचा कडकडाट पोटात भीतीचा खड्डा पाडत हुता. मी गुर्जीना सांगून घरचा रस्ता धरला पण पावसानं रस्त्यात गाठलंच. मोठं- मोठ्या सरी चुकवता चुकवता चिंब भिजले. इतक्यात मागून गुरुजींची हाक आली, “अगं सरू, भिजू नको,आजारी पडशील अन मग अजून शाळा बुडेलचल, इथंच शेजारच्या वाड्यात मी रहातो, पाऊस कमी झाला की सोडेन घरी. “
मी गुरुजींच्या मागोमाग चालू लागले. वाड्यातल्या सोप्यातच मी अवगडून उभी राहिले त्या संतत धारा एकटक पहात भान हरपून! इतक्यात माझ्या खांद्यावर कुणाचा हात पडला. मी दचकून माग बगीतलं.
‘गुरुजी?’ गुरुजींच्या डोळ्यात येगळच काय दिसलं,असल्या चिंब गारठ्यात माझ्या अंगावर विजेचा लोळ पडल्या सार्क झालं. मी तडक धाव घेतली सोप्याबाहेर. दप्तर तिथंच फेकलं अन धो धो पावसात मागं न बघता पळत सुटले. रस्त्यावरच्या पाण्यात परकराचा घोळ आवरता येईना पण मी जिवाच्या आकांताने घर गाठल; अन धपदीशी पायरीवर पडले. डोक्याला खोक पडली. भीतीनं छाती धडधडू लागली अन मी तिथं तशीच बसून राहिले शून्य हून! त्या दिवसापासून मी शाळेचा धसका घेतला अन गप्प घरात राह्यले ते कायमची!”
गोस्ट सम्पली…
आईची गोष्ट मला कळाली, आई म्हणाली,”आता शाळचं रूप बदललंय, पण गुरुजी? तुज्याही नशिबाला असंच काय येऊ ने “
इचार केला, अन मग मीच ठरवलं तुमालाच पत्र लिव्हायच अन आईला हमी पत्र लिहून तिची भीती घालवायला सांगायचं. जमंल का तुमाला? असं ईचारायच!
जमंल गुरुजी तुमाला माज्या आईला पत्र लिव्हायला? येऊ ना मग शाळेला??
एक बिचारी मुलगी
© सौ.सुचित्रा पवार
१९ मे २०१९
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈