श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ कर्जदार (भावानुवाद) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
‘बाबांसाठी प्लाज्मा डोनरची आवश्यकता होती. हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर प्लाज्मा मिळू शकेल, असा कळलं. ती सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मी प्लाज्मा डोनरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि समोर आला, बुधना रहमकर.
‘अरे तुम्ही?’ मला आश्चर्य वाटलं. तुमची कवच कुंडले कुठे गेली?’ तुम्ही करोनाच्या पकडीत कसे सापडलात?’
गेल्या वर्षी ‘सुपर स्पेशालिटी होस्पिटलमध्ये माझी मोठी काकू करोनावरील उपचारासाठी अॅडमिट होती. ऐंशीच्या वर तिचं वय होतं. अर्थरायटीसमुळे ती तशीही चालू शकत नव्हती. घरातल्या कुणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. आमची चिंता होती, तिथे काकूकडे नीट लक्ष दिलं जाईल की नाही? तिची देखभाल नीट होईल ना? कुणी परिचित नर्स मिळेल का, काकूची नीट देखभाल करण्यासाठी?. एवढ्यात बुधना भेटला. म्हणाला, ‘आपण आपल्या काकूची मुळीच काळजी करू नका. मी त्यांची नीट देखभाल कारेन. आपण गेटवर जे काही द्याल, ते मी त्यांच्यापर्यंत पोचवेन. फोनवर आपलं त्यांच्याशी बोलणं करवीन. तुमची काकू आता माझी काकू आहे. मी त्यांची चांगली काळजी घेईन.’
‘पण तुम्हाला हे लोक आत कसे येऊ देतात?’
‘ मी त्यांनाही मदत करतो.’
‘तुला कोरोनीची भीती वाटत नाही?’
‘नाही. माझ्या शरीरावर कवच कुंडले आहेत. ती मला सुरक्षित ठेवतात.
‘कवच कुंडले….’
‘होय. त्यांची नावे आहेत, गरीबी आणि बेरोजगारी.
वर्षभरापासून आपल्यासारख्यांकडून जे मिळतं, त्यावरच मी माझं घर चालवतो.
मी त्याला 200 रु. देत म्हणतो,’ हे ठेवा. नंतर आणखीही देईन. काकू इथे आहेत, तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष ठेवा.’ नंतर काकू बरी होऊन घरी आली.
बुधनाकडे पहात मी म्हंटलं, ‘तुमची कवच कुंडले कुठे गेली? तुम्ही करोनाच्या पकडीत कसे सापडलात?’
‘सर, तेव्हा काय व्हायचं, घरी गेलं की आई सक्तीनं, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला लावायची. कसला तरी काढादेखील प्यायला द्यायची. पण जसजसे होस्पिटलमध्ये पेशंट वाढू लागले, तसतसं घरी जाणं बंद झालं. तिथेच जेवणं- खाणं, रहाणं, झोपणं होऊ लागलं. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायचं, कामाच्या नादात राहून गेलं आणि एक दिवस पॉझिटिव्ह झालो.’
या दरम्यान मी बुधनाला एक लिफाफा आणि आपलं कार्ड सोपवत म्हंटलं, ’धन्यवाद! तुझ्यापाशी माझं कार्ड ठेव. कधी गरज लागली, तर फोन कर.’
बुधनाने कार्ड ठेवून घेतलं आणि लिफाफा परत करत म्हंटलं, ‘सर, मला माहीत आहे, यात काय आहे. सर मी हे घेणार नाही.’
‘यात फार नाही, फक्त पाचशे आहेत. तुझ्या कामी येतील.’
‘नको सर, मी डोनर नाही, कर्जदार आहे. करोना पेशंटसच्या नातेवाईकांच्याकडून आधीच खूप काही घेतलय. त्याच्या बदल्यात सेवा देण्याच्या ऐवजी स्वत:च आजारी पडलो. तेच कर्ज मला चुकवायचय.
मूळ हिन्दी कथा – कर्ज़दार
मूळ लेखक – भगवान वैद्य ‘प्रखर‘
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर भावपूर्ण रचना