श्री अरविंद लिमये

?जीवनरंग ?

☆ देव साक्षीला होता – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता. त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!)

मान टाकल्यासारखा दिवस उजाडला, तसाच मावळूही लागला. रोजच्यासारखी दुपार तापलीच नाही. राख धरलेल्या निखाऱ्यासारखा सूर्य दिवसभर थंड आभाळांत पडून राहिला होता.तो विझून जावू लागला,  तसं आभाळ विव्हळू लागलं. सांज झाली, आणि आसूड ओढल्यासारख्या विजा कडाडू लागल्या. संकटाची दवंडी पिटत वारा घोंगावू लागला. स्वतःचा जीव वाचवीत धुळीचे लोट पळू लागले.

मातीत खेळणाऱ्या पोरांच्या दंडांना धरुन पळवत बायाबापड्यांनी घरं गाठली.

घरासमोरची आवराआवर करून दार पटाटा लावली.अंगात संचार व्हावा तशी झाडं घुमू लागली.

वानरांनी जीव मुठीत धरून फांद्यांना मिठ्या मारल्या. पक्षांचे पुंजके घरट्यात लपले. पानांबरोबर ती जड घरटीही झुलू लागली. ऐन मुहूर्ताला आभाळ उरी फुटून रडू लागलं.त्याच्या अश्रूंचा महापूर आल्यासारखं पाणी कोसळू लागलं. अख्खं गाव पाण्यानं चिंब झालं. महार वाड्यात पेटू लागलेली चुलाणी पेटण्यापूर्वीच विझू लागली. पावसाच्या सड्यानं सादळून गेली. पावसानं जोर आणखी वाढवला तशी जनी धास्तावली.

फडक्यात बांधून ठेवलेलं दोन भाकरींचं पीठ झाडून घेऊन त्या वेळी ती भाकरी थापत होती. भुकेने कासावीस होऊन शिन्यानं भोकाड पसरलं. त्याच्या पाठीत धपाटा घालायला उठण्यासाठी दात ओठ खात जनीनं जमिनीला रेटा दिला, तेव्हा मांडीवर झोपलेल्या झीप्रीची झोप उडून ती रडायला लागली. झपाटून पटापटा मुके घ्यावेत तसं काकणं वर सारून जनीनं झीप्रीच्या इवल्याशा पाठीत धपाटे हाणले, आणि तिला जमिनीवर भिरकावलं. शेकून झालेल्या धुरकट भाकरीचे दोन तुकडे थाळीत टाकून तिने थाळी शिन्यासमोर सरकवली. आणि हात लांब करून झीप्रीला पुन्हा कवटाळून घेतलं. झीप्रीचा घाबरलेला जीव पाणी शिंपडल्यासारखा शांत झाला.

जनीच्या पुढे आता फक्त कसंबसं एकाच भाकरीचं पीठ शिल्लक होतं. तिने भाकरी थापली. शेकली. भाकरीचा तो चंद्र दुरडीत अलगत उभा ठेवला.तिच्या दिवसभराच्या भुकेल्या पोटात त्याच्या खरपूस वासानं आगडोंब उसळला.तिने आवंढा गिळला. आणि ती चुलाणं विझवायला लागली.

‘आता बबन्या आला की आर्धी आर्धी भाकर दोघांनी संगट खायची ‘असा विचार तिच्या मनात आला, तेवढ्यात झोपडीबाहेर कुणाचीतरी पावलं वाजली.

‘बबन्याचअसनार …’ जनी हरकली. झिपरीला सावरत ती दाराशी आली. समोर सादळलेला मिट्ट काळोख होता. त्यात बबन्या दिसेचना. तिने डोळे फाडून पाहिले तेव्हा खूप वेळाने तिला त्या अंधारात अंधुक दिसू लागलं. …समोर बबन्या नव्हताच. शिरपा न् सदा उभे होते. आख्खे भिजलेले. गुडघ्यापर्यंत चिखल माखलेले…

“ह्ये न्हाईत. ह्यो पाऊस मुडदा कोसळतुय न्हवं का कवा ठावनं. कुटं आडकून पडल्यात द्येवालाच ठाव..”

शिरपा न् सदाला काय बोलावं सुचेचना. देवाच्या साक्षीनं घडून गेलेलं आक्रित आठवून शिरपा न् सदा अजूनही कासावीस होते. धीर गोळा करून मग शिरपाच बोलू लागला आणि व्हय व्हय करत सदा भेदरल्या अवस्थेत मान डोलवत राहिला. सगळं ऐकून जनी शक्तीच गेल्यासारखी मटकन् खालीच बसली. मनातल्या धुवांधार पावसानं तिचे डोळे चिंब भिजून वाहू लागले. पण आरडून ओरडून रडायचं भान न् त्राण तिच्या भुकेल्या शरीरात नव्हतंच. भाकरीचा तो चंद्रही आता वास हरवलेल्या अवस्थेत विझलेल्या चुलीपुढं दुरडीत मान टाकलेल्या बेवारशासारखा थंड पडला होता..! सकाळी जाताना मागं वळून हात हलवणारा बबन्या तिच्या ओल्या नजरेसमोर तरळत राहिला आणि बबन्यासाठी काकुळतीला आलेल्या जनीचं मन वेडंपीसं झालं. मघाशी भोकाड पसरून रडणाऱ्या त्या आभाळासारखं ते खदखदू लागलं. झिप्रीला तिथंच जमिनीवर टाकून देहभान विसरल्याअवस्थेत ती चिखलपाण्यातून धावत सुटली ..वेशीच्या दिशेने..!       

वेशीसमोर देवाच्याच साक्षीने आक्रित घडून गेलं होतं!!                                             

सांज झाली, तेव्हा आत्ता बबन्या येईल म्हणून जनी सादळलेल्या चुलीत जाळ लावून भाकरी थापत होती तेव्हा तिकडे पावसात अडकलेला बबन्या वेशीवरच्या झाडाखाली उभा होता. शिरपा आणि सदा त्याच्या बरोबरच होते. पावसाचा जोर वाढला आणि झाडाखालीही पाणी ठिबकायला लागलं तसं शिरपा न् सदानं शाळेच्या आडोशाला धाव घेतली. शाळेच्या आवारात पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बबन्या त्यांच्याबरोबर आलेलाच नाहीय. तो झाडाखालीही दिसेना. नजर लांब करून पहायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की वेशीवरच्या मारुतीच्या देवळात कसलीतरी झुंबड उडालीय. ऑपरेशन करून आलेल्या बबन्याला त्यांच्यामागे शाळेपर्यंत इतक्या लांब पळता येईना तेव्हा त्याने जवळच असलेल्या मारुतीच्या देवळाकडे धाव घेतली होती. पाऊस चुकवायला म्हणून देवळाच्या पायरीवरून तो थोडा वर सरकला आणि..आणि तिथं पावसामुळे आधीच देवळात आश्रयाला थांबलेले गावकरी भडकले. ‘हे म्हारडं देवळात आलंच कसं..’ म्हणून ओरडू लागले. आदल्या रात्रीपासून उपाशी असलेला आणि ऑपरेशनच्या वेदनांनी कळवळणारा बबन्या हात जोडून गयावया करीत होता.

“पान्यात भिजाय लावू नगा..’ म्हणत त्यांचे पाय धरायला तो पुढे झाला तसा गावकऱ्यांच्या गर्दीतला एक जण पुढे झेपावला. 

“या म्हारड्यानं द्येव बाटिवला” म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला लागला. ते पाहून बाकीच्यांचीही भीड चेपली. तेही एकामागोमाग एक करीत पुढे आले. बबन्याला धक्के देत त्यानी भर पावसात त्याला देवळापुढच्या चिखलात ढकलला. कुणीतरी जवळचा एक दगड उचलला आणि नवीन दिशा मिळाल्यासारखे एकेक करत सगळेच खाली वाकले. बबन्यावर दगडं बरसायला लागली. हातातल्या काठ्यांचे वार सुरू झाले. बबन्या गुरासारखा ओरडत होता. हातापाय आवळत मार चुकवायचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. रक्ताळलेल्या बबन्याचे मासांचे लगदे लोंबू लागले तसे गावकरी दमून थांबले. मोठ्ठं यज्ञकर्म पार पडल्याच्या समाधानात पांगून गेले. मग पाऊसही थकून थांबला. शाळेच्या  छपराखालून शिरपा न्  सदा वेशीपर्यंत आले तोवर रक्ताळलेला बबन्या मारुती समोर चिखला सारखाच थंड पडला होता..!

…..जनी धावत धापा टाकत वेशीपर्यंत आली तोवर तिथे बबन्याजवळ चिटपाखरूही नव्हतं.वेशीवरच्या देवळात नाही म्हणायला मारुती मात्र उभा होता…! 

जनी बबन्याला आणि त्या देवालाही जाग यावी म्हणूनच जणू  धाय मोकलून आक्रोश करीत राहिली…!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

बहुत ही सुन्दर, मार्मिक, दिल को छू लेने वाली रचना
आपको हृदय से बधाई