? जीवनरंग ❤️
☆ संचारबंदी..भाग -1 ☆ श्री आनंदहरी ☆
मोर्चा.. !
बंद…!
दंगल…!
जाळपोळ… !
जमावबंदी…!
संचारबंदी… !
- ● ● ● ●
” तुला रं मुडद्या रडाय काय झालं ? तुजी आय मेली का बा रं ? गप बस्तुस का ? “
चिडलेल्या तिनं पोराच्या पाठीत कावाकावानं धपाटा घालत विचारलं आणि पाटीतल्या भाजीची उलथा- पालथ करीत हताशपणे भाजीकडे पाहिले. भाजीची पाने पिवळी पडून भाजी कुजायला लागली होती. तिनं पाटीवर फडकं टाकून त्यावर पाण्याचा हबकारा मारला.
तिने मारलेल्या धपाट्याने रडणारे पोर एकदम गप्प झाले होते.कधीही अंगाला हात न लावणाऱ्या, न मारणाऱ्या आईने धपाटा घातल्याने काहीसे आश्चर्याने, काहीसे भीतीने ते कोपऱ्यातूनच तिच्याकडे पहात होते. डोळ्यांच्या पापण्यात अजूनही पाणी होते, गालावर ओघळ होते पण त्याने ओठ मात्र घट्ट मिटून घेतले होते. हुंदका बाहेर पडला, भोकाड पसरले तर आपल्याला आणखी धपाटे बसतील, आईच्या हातचा मार खावा लागेल असे त्याला वाटत होते. त्यामुळे भोकाड पसरणे तर दूरच मुसमुसण्याचा आवाजही बाहेर पडू नये म्हणून तो घाबरून तोंड दाबून बसला होता.
‘मला म्येलीला हाव सुटली..सस्तात भाजी घावल्याव दोन दोन पाट्या घेतल्या.. म्हनलं चार पैकं जास्तीचं हुतीली… पर वैशीच माझी.. समदंच गेलं.. चार दिस झालं करफू का काय म्हंत्यात त्यो हाय… भाजीबी सुकून, कुजून ग्येली आन त्या मुडद्या दलालाचं पैकंबी आंगाव … त्यो चार रोज दम बी धरायचा न्हाय.. आन त्यात ह्यो मुडदाबी कुठंसं उलातलाय कुणाला ठावं ? …’ ती स्वतःशीच पण मोठ्याने बडबडली. स्वतःच्याच बडबडीकडे तिचे लक्ष गेलं आणि बडबडीतलं शेवटचे वाक्य आठवून तिला काहींसं अपराधी वाटू लागलं. नवऱ्याची काळजी मनात ठसठसू लागली. या संचारबंदीच्या काळात नवरा कुठं असेल ? हा प्रश्न तिला व्यथित करू लागला. कुणीसं म्हणालं होतं ‘ कर्फ्युत माणूस दिसला की गोळी घालतात..’ तिला ते वाक्य आठवलं आणि ती अधिकच बेचैन झाली.
‘कुठंसं आस्तिली ही.. ? चार दिस झालं…’
रोज रात्री नवटाक मारून तरंगत का होईना पण घरी येणारा नवरा दोन दिवस झाले परतला नव्हता. त्यात कर्फ्यु लागू झाला होता त्यामुळे तिच्या मनात शंका -कुशंका थैमान घालू लागल्या होत्या.
‘कुणाला ईचारावं बरं ..? .. कुणाला ईचारणार ? समदी खुडूक कोंबडीवानी आपापल्या घरातनीच तर हायती…’
तिच्या मनात प्रश्नापाठोपाठ उत्तरही आलं होतं पण तरीही तिला राहवेना
‘दारूच्या नशेमंदी त्यो रस्त्याव तर आला नसंल ?.. पोलिसांनी गोळी तर घातली नसंल नव्हका ?.. ‘ नसत्या शंका-कुशंका तिचं काळीज कुरतडू लागल्या होत्या. ती दाराशी आली… दार किलकीलं करत आजूबाजूचा कानोसा घेत समोर नजर टाकली.. त्याचवेळी दार अर्धवट उघडून बाहेरचा कानोसा घेऊ पाहणाऱ्या समोरच्या शेजाऱ्याला तिनं विचारलं ,
” व्हय वो भावजी, गावात समदं शांत हाय नव्हं ? “
” काय की.. कोण गेलंय बगाय ?…”
ती उगाच काहीतरी काम सांगेल आणि शेजारधर्मामुळे ‘नाही’ म्हणता येणार नाही.. उगाच नसती झंझट नको असा विचार करत दार बंद करता करता शेजारी म्हणाला. त्याने दाराला आतून कडी लावल्याचा आवाज तिलाही ऐकू आला.
दार पुढे लोटत ती नवऱ्याच्या काळजीत भिजत हताशपणे बसून राहिली.
क्रमशः……
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈