☆ जीवनरंग ☆ जुगार!!! ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆
‘अपूर्वाई’ किंवा ‘पूर्वरंग’ याची अपूर्वाई आता काही राहिली नाही. तशी ती मीनाताईंनाही राहिली नव्हती. जपान, चीन, थायलंड, युरोपातले दहा देश पतिराजांबरोबर त्यांनी पाहिले होते. त्यांच्या दिवाणखान्यातील, माफ करा आलिशान हॉलमधील वस्तूच त्यांच्या वारंवारच्या परदेशगमनाची साक्ष देत होत्या.
ह्या वेळी मीनाताई अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांची कन्या आणि जावईबापू तिथं होते. अमेरिकेत होते म्हणजे ‘आयटी’ मध्ये होते, हे वेगळं सांगायलाच नको. मीनाताईंचे ‘हे’ मात्र ह्या वेळी त्यांच्या सोबत नव्हते. त्यांच्या कंपनीचं काही तरी मोठं काँट्र्क्ट व्हायचं होतं, म्हणून ते तिथंच राहिले होते. मीनाताईंनी ठरवलं, ह्यांची जबाबदारी नाही म्हटल्यावर आपण अमेरिका मनसोक्त पाहायची आणि भारतात परतल्यावर पुण्या-मुंबईच्या दैनिक-साप्ताहिकांमध्ये दाबून लेख हाणायचे! त्यामुळेच त्या अगदी टिपणं वगैरे घेत होत्या.
मुलगी आणि जावयानं ठरवलं की, मीनाताईंना लास वेगासची सफर घडवून आणायची. वीकएंड तिथंच एंजॉय करायचा. अगदी अट्टल जुगाऱ्यासारखं खेळायचं. भरपूर जिंकायचं, नाही तर खिसा खाली करून परतायचं. त्यांनी मीनाताईंना बेत सांगितला. सगळी उत्सुकता दाबून ठेवत मीनाताईंनी वरवर विरोध केला. मग थोडा आग्रह झाला नि त्यांचा लटका विरोध गळून पडला.
ठरल्याप्रमाणं तिघं तिथं गेले. जावयानं सासूला आग्रह केला. म्हणाला, ‘‘बघा तुमचंही नशीब अजमावून एखाद्या डावात.’’ मान जोरजोरात हलवत मीनाताई म्हणाल्या, ‘‘मी इथपर्यंत आले तेच खूप झालं हं. जुगार नका खेळायला लावू. मी आयुष्यात एकच जुगार खेळले. हिच्या पप्पांच्या रूपानं मोठा जॅकपॉट लागला मला. त्यावर खूश आहे मी.’’
जावयानं बराच आग्रह केला. मग लेकीनं भारतीय पुराणातली उदाहरणं देत कधीमधी जुगार खेळणं कसं अनैतिक नाही, हे आईला पटवून दिलं. ‘अगदीच तुमचा आग्रह मोडायचा नाही म्हणून हं,’ असं म्हणत मीनाताई तयार झाल्या.
मीनाताईंचं नशीब फाटकंच होतं त्या दिवशी. पाच-सात डाव झाले, एकदाही त्यांच्या हाती काही लागलं नाही. जावयाचे डॉलर आपण उधळतोय या समजुतीनं त्या कानकोंड्या झाल्या. अजून पाच-सात डाव झाले. उं हू. नशीब बेटं काही त्यांची साथ देत नव्हतं. हिरमुसल्या झाल्या बिचाऱ्या. परतायची वेळ झाली. अखेर जावयानं तोडगा काढला. म्हणाला, ‘‘शेवटचा डाव खेळा पाहू. जिंकणारच तुम्ही.’’
मीनाताई काही तयार होईनात. शेवटी जावई परत पुढं आला. हमखास जिंकण्यासाठी त्यानं त्यांच्या कानात युक्ती सांगितली. म्हणाला, ‘‘मम्मी, तुमच्या वयाच्या आकड्यावर पैसे लावा. मोठ्ठा डाव जिंकताय तुम्ही.’’ आणि तो बाहेर गेला.
पाच मिनिटांनी जावई बापू परत येऊन बघतायेत तो काय, सासूबाई घामाघूम झालेल्या आणि त्याची बायको काळजीत. त्यानं लगबगीनं विचारलं, ‘‘का गं? काय झालं?’’
बायको म्हणाली, ‘‘काय झालं कुणास ठाऊक. तिनं ५० डॉलर ५२ आकड्यावर लावले आणि चाकाचा काटा थांबला तो बरोबर ५८ ह्या आकड्यावर. ते पाहून तिला चक्कर आल्यासारखंच झालं!’’
© श्री सतीश स. कुलकर्णी
(मुक्त पत्रकार, ब्लॉगर)
(इंटरनेटमुळे छान छान विनोद वाचायला मिळतात. विशेषतः इंग्रजीतले विनोद. त्यातल्याच काही छोट्या विनोदांना मराठी साज किंवा बाज देऊन थोडं विस्तारानं लिहिलं. एखाद्या धान्याचा दाणा फुलवून त्याची खमंग व कुरकुरीत लाही बनवावी, तसं. ह्या लघुकथा अशाच; वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर दोन-चार स्मितरेषा उमटल्या, तर हेतू साध्य झाला एवढंच! – श्री सतीश स. कुलकर्णी)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈