?जीवनरंग ?

☆ सॅल्युट ☆ श्री नितीन मनोहर प्रधान

जेव्हां तो सुंदरनगरच्या रेल्वे स्टेशनवर उतरला तेव्हा घड्याळात बरोबर रात्रीचे साडेअकरा वाजले होते. सुंदरनगरहून

मुंबईला जाणारी पहिली ट्रेन पहाटे पाच वाजता होती. याचाच अर्थ त्याच्याकडे त्याच्या कामासाठी मोजून साडेपाच तास होते. आणि त्याच्यासारख्या सराईत इसमासाठी तेवढे नक्कीच पुरेसे होते.

सुंदरनगर मधील उच्चभ्रू लोकांच्या आलीशान बंगल्यांच्या वस्तीचा अभ्यास त्याने नेटवरील गुगल मॅप वरून अगोदरच करून ठेवला होता.

रेल्वेस्टेशन बाहेरील पानाच्या ठेल्यावरून त्याने फोरस्क्वेअर घेतली आणि रुबाबात शिलगावली. पान स्टॉल जवळ उभे राहून तो टू व्हीलर पार्किंगचे निरीक्षण करत थांबला.

त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रुबाबदार होते. सहा फुटाचे व्यायामाने कमवलेले शरीर, गोरापान राजबिंडा चेहरा, ब्लॅक जीन्स, त्याच्यावर डार्क ब्लू कलर चा ओपन शर्ट, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा अतिशय महागडा चष्मा. पायात अॅदिदासचे शुज, मनगटावर रोलेक्स चे घड्याळ आणि पाठीवर महागडी प्रवासी सॅक. जणू काही एखादा राजकुमारच.

ट्रेनमधून उतरलेले प्रवासी पार्किंग मधून आपापल्या टू व्हीलर्स घेऊन निघून गेले. अजूनही पार्किंगमध्ये दहा पंधरा बाईक्स लावलेल्या होत्या. याचाच अर्थ या बाईक्सच्या मालकांनी आजच्या रात्री पुरत्या बाईक्स पार्कमध्ये वस्तीला ठेवल्या होत्या.

रुबाबात तो पार्किंग जवळ आला. जवळच्या मास्टर की ने बुलेटचे लाॅक उघडणे म्हणजे त्याच्यासाठी डाव्या हातचा मळ होता.

सुंदर नगरच्या पूर्वेला अतिशय आखीव रेखीव पण सुंदर नगरशी फटकून असल्याप्रमाणे अलिप्त अशी ती आलिशान बंगल्यांची वसाहत वसलेली होती. त्या गडगंज श्रीमंत लोकांच्या वसाहतीचे नाव देखील तसेच होते, “कुबेर नगरी.”

तो जेव्हां कुबेर नगरीत पोहोचला तेव्हा रात्रीचे सव्वाबारा वाजले होते. वातावरण ढगाळ होते. चंद्र ढगाआड लपलेला होता. रिपरिप पाऊस पडत होता. एकंदरीत वातावरण त्याच्यासाठी बऱ्यापैकी अनुकूल होते. जरी रात्रीचे सव्वा बारा वाजले असले तरीही बऱ्याचशा बंगल्यामधील लाईट चालूच होते. खबरदारी घेणे गरजेचे होते. त्याने बुलेट कोपऱ्यातील झाडाखाली पार्क केली आणि रस्त्याच्या दुतर्फा नजर फिरवत तो चालू लागला.

आणि त्याच्या सराईत नजरेने एक बंगला हेरला. अंधारात बुडालेला तो बंगला उंच उंच झाडांच्या गर्दीत वस्तीतील इतर बंगल्यापासून थोडासा अलिप्त एका बाजूला होता. मोबाईल टाॅर्चच्या प्रकाशात गेटवरचे भलेमोठे कुलुप स्पष्ट दिसत होते. त्याने खुश होऊन हलकेच शीळ वाजवली.

बंगल्याला वळसा घालून तो पाठीमागच्या बाजूला आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच पाठिमागच्या बाजूला छोटेसे गेट होते. त्याने सराईत हाताने छोट्या गेटचे लाॅक उघडले आणि बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. रात्री कदाचित बंगल्याचा मालक आलाच तर पुढच्या गेटने आत आला असता. गाडीचा आवाज ऐकताच तो आरामात मागच्या गेटने पळून जाऊ शकला असता

बंगल्याच्या दरवाजाचे लॅच उघडायला त्याला मोजून सतरा मिनिटे लागली. तो पुरेसा सावध होता. त्याने सर्वप्रथम पळून जाण्यासाठी पाठीमागचा दरवाजा उघडून ठेवला. आतमधला प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणुन त्याने खिडक्यांचे पडदे ओढून घेतले आणि नाईट लॅंम्पच्या प्रकाशातच तो बेडरूम मधे शिरला. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच  आतमध्ये एक अवाढव्य भरभक्कम कपाट होते. बँकेमधले सेफ्टी व्हाॅल्वस लीलया उघडणाऱ्या त्याच्या हातांना ते कपाट उघडण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.

2000 रूपयांच्या नोटांचे एक बंडल, 500 च्या नोटांची चार बंडल्स, जवळ जवळ 25 ते 30 तोळ्यांचे सोन्याचे दागिने – – – तो जाम खुश झाला. धडाधड त्याने तो सगळा ऐवज सॅक मध्ये भरला. तेवढ्यात त्याची नजर बाजूच्या भल्या मोठय़ा देव्हाऱ्याकडे गेली. तो 100% नास्तिक होता. चांदीचे जाडजूड ताम्हण, पेला, समई आणि देवांच्या वजनदार मुर्ती त्याने सॅकमध्ये कोंबल्या.

त्याने घड्याळात पाहिले फक्त रात्रीचा दीड वाजला होता. तो चांगलाच दमला होता आणि ट्रेनला अजुन साडेतीन तास अवकाश होता. आणि येवढ्या अपरात्री बाहेर पडून गस्त घालणाऱ्या जीपने हटकले असते तर मुद्देमालासह पकडले जाण्याचा धोका होता.

त्याने थोडावेळ विश्रांती घेण्याचे ठरविले. त्याला आता तहान लागली होती. बिनधास्त पणे किचन मध्ये जाऊन त्याने फ्रीझ उघडला. आज खरच त्याचे नशीब जोरावर होते.  फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटली शेजारी चक्क मिलिटरी रमची आख्खी भरलेली बाटली त्याला सापडली. थोडेसे शोधल्यावर किचनमध्ये त्याला खारवलेले काजू सापडले. त्याला चक्क लाॅटरी लागली होती. जवळजवळ साडेतीन वाजेपर्यंत तो बेडरूममध्ये टी. व्ही. लावुन शांतपणे रम एन्जॉय करत बसला होता. चार पेग पोटात जाऊन देखील तो पूर्णपणे सावध होता.

पहाटे साडेतीन वजता त्याने मद्यपान आटोपले आणि तो बाहेरच्या हॉलमध्ये आला. आता शेजारीपाजारी जागे होण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि समजा जागे झाले असते तरी त्याचे मुख्य काम झाले होते. जाता जाता शोकेस मध्ये काही किमती वस्तू दिसल्या तर लांबविण्याच्या हेतूने त्याने हॉलमधला लाइट लावला. आणि त्याने जे पाहिले त्याने त्याचे हृदय, हेलावून गेले. त्याच्यासारख्या निर्ढावलेल्या  चोराच्या डोळ्यातून देखील अश्रुधारा वाहू लागल्या. तो धपकन खुर्चीवर बसला खाली मान घालून त्याने एक चिठ्ठी खरडली आणि ती चिठ्ठी आणि चोरी केलेले पैसे आणि किमती चीजवस्तू भरलेली सॅक तशीच्या तशी टीपाॅयवर ठेवून तो मागचे लॅच उघडून अंधारात मिसळून गेला.

सकाळी सात वजता कर्नल अजित पवार हॉलचा दरवाजा उघडून घरत शिरले. कारगिल विजय दिनाच्या समारोहात भाग घेऊन ते घरात शिरत होते. आपल्या करगिल युद्धात शहिद झालेल्या एकुलत्या एका पुत्राच्या आठवणीने ते व्याकुळ झाले होते.  रात्रभर गाडी चालवून ते विलक्षण थकले होते.

दरवाजा उघडल्या उघडल्या त्यांच्या नजरेला टीपाॅयवरील सॅक दिसली. अनोळखी सॅक बघून ते थोडेसे दचकलेच. त्यांना सॅकखाली एक चिट्ठी दिसली. आणि ती वाचून येवढा वेळ कोंडून ठेवलेला हुंदका त्यांना आवरता आला नाही.

चिठ्ठीत लिहिले होते.

“आदरणीय कर्नल साहेब,

त्रिवार प्रणाम

मी एक सराईत चोर आहे. कळायला लागले तेव्हापासून मी फक्त चोऱ्या करूनच जगत आहे. आपल्या घरात देखील मी फक्त आणि फक्त चोरीच्या उद्देशानेच शिरलो होतो. मी चोरी केली सुद्धा.

निघताना तुमच्या घराच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर नजर गेली.

भिंतीवरील 99 च्या कारगिल युद्धात शहिद झालेल्या तुमच्या वीरपुत्राचा फोटो बघितला. त्यांना अतुलनीय कामगिरी बद्दल मरणोत्तर मिळालेले महावीर चक्र बघितले. तुम्हाला स्वतःला 71 च्या लढाईतील कामगिरी बदल मिळालेले वीरचक्र बघितले आणि आपण काय पाप करत होतो याची जाणीव झाली.

आमचे रक्षक बनून तुम्ही सीमेवर स्वतःचे प्राण पणाला लावताय, आज त्याच रक्षकाच्या घरात भक्षक बनून शिरण्याचे पाप मी कुठे फेडले असते?

खरच सांगतो कर्नल साहेब, देवांच्या मूर्तींची चोरी करताना माझे हात कचरले नाहीत. पण सैनिकांच्या घरात चोरी करण्यास तेच हात धजले नाहीत.

कारण मी नास्तिक आहे. मी चोर आहे पण मी राष्ट्रद्रोही नाही. म्हणूनच चोरी केलेले सर्व पैसे, चीजवस्तू, देवांच्या मूर्ती मी टीपाॅय वर ठेवून जात आहे.

रमची अर्धी बाटली देखील ठेवून जात आहे.

तुम्हाला दोघांनाही कडक सॅल्युट.

तुमच्या शहिद सुपुत्राला श्रद्धांजली.

शक्य असेल तर मला माफ करा..

कर्नल पवारांच्या डोळ्यात अश्रू होते तर ह्दयात आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान.

आज खऱ्या अर्थाने त्यांच्या शहिद पुत्राचे बलिदान सार्थकी लागले होते.

 

© नितीन मनोहर प्रधान

रोहा रायगड

6 ऑक्टोबर 2020

मो – 9850424531

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments