सौ.ज्योत्स्ना तानवडे
जीवनरंग
☆ खेळी…भाग 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
ॲडव्होकेट रागिणी ऑफिसात आजच्या कामांची कागदपत्रे पहात होती. तेव्हा मधुरा केबिनमध्ये आली.’नमस्कार मॅडम’, म्हणत समोरच्या खुर्चीत बसली. मधुरा खूप दडपणाखाली दिसत होती. तिच्या आणि रितेशच्या घटस्फोटाची केस सुरू होती.आज मुलाच्या कस्टडी बाबत सुनावणी होती.
मधुरा एका बँकेत चांगल्या पदावर होती.रितेश मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. आर्थिक सुबत्ता होती.त्यामुळे मोठं घर, गाडी सर्व उत्तम होते.मधुराच्या बॅंकेचे कर्ज असल्याने घर दोघांच्या नावावर होते.सहा वर्षांचा राजस आणि तीन वर्षांची रुंजी अशी दोन लहान मुले होती. सगळेच एकदम मस्त चालू होते. मधुरा सगळ्यांशी मिळून मिसळून रहात होती. सासू-सासर्यांशी तिचे वागणे अतिशय जिव्हाळ्याचे होते.
एकीकडे हे सगळं छान होतं.तर दुसरीकडे रितेशचा स्वभाव विचित्र होता. प्रत्येक गोष्टीवर तो शंका घेई. सतत त्यावरून तिला टोकत राही. खरंतर घरातल्या सर्व गोष्टी करणे,मुलांचे संगोपन, शाळा, स्वतःची नोकरी यामुळे मधुराची खूप ओढाताण होई.तरीही ती सतत हसतमुख असायची.पण रितेशला याबद्दल एका शब्दाचेही कौतुक नव्हते. स्वतः रोज कामावरून उशिरा यायचे आणि घरी आल्यावरही ऑफिसचे काम म्हणत फोनवर तासनतास बोलत बसायचे. तो घरात कसलीच मदत करीत नसे. पण तिच्या कामात मात्र सतत खोट काढीत असे. फोन करून सारखी तिची चौकशी करी.तिच्यावर संशय घेई. मधुराने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. पण आता तिला हा जाच वाटू लागला होता. तो तिच्यावर काहीही आरोप करायचा आणि त्याचे स्पष्टीकरण देता देता तिची दमणूक व्हायची.हा मानसिक छळ आता तिच्या सहनशक्ती बाहेर जाऊ लागला होता.
स्वतःचा मूड असेल तर रितेश मुलांना जवळ घ्यायचा.नाहीतर त्यांचे अजिबात लाड करायचा नाही. मुलांना पण त्याचा लळाच नव्हता. घाबरून ती त्याच्यापासून दूर राहायची. हे सततचे वाद, भांडणं, संशय या कटकटींनी मधुरा वैतागून गेली. एक दिवस तिने त्याला बजावले, ” हे बघ रितेश, ही बिनबुडाची भांडणं थांबव. जरा आवर घाल स्वतःला. तू तुझं वागणं बदललं नाहीस तर मी घर सोडून जाईन.”
तिच्या धमकीने उलट तो खूषच झाला. त्याला हेच हवे होते. पण याबद्दल त्याने तिलाच दोष दिला.” खुशाल चालायला लाग. नवऱ्याला कसे खूश ठेवावे याची थोडी तरी अक्कल आहे का? सगळी माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि म्हणे हिनेच संसार सांभाळलाय.गरज नाही मला असल्या संसाराची .”
मधुरावरच ठपका ठेवत रितेशने तिला घरातून जायला सांगितले.ती मुलांसह माहेरी आली. मुले सोडून जाताना त्याला कसलाही अपराधीपणा किंवा दुःख वाटले नाही. उलट त्यानेच घटस्फोटासाठी कोर्टात केस केली. मुले लहान, अर्धवट झालेला संसार, आर्थिक व्यवहार एकत्रित आणि गुंतागुंतीचे यामुळे मधुराची या गोष्टीला मान्यता नव्हती. पण तो माघार घेत नव्हता. त्याच्या आई वडिलांनीही खूप समजावले. पण तो त्यांचेही ऐकत नव्हता. त्यातच त्याने आता राजसची कस्टडी मागितली होती. मधुरा खूप घाबरून गेली. त्यासाठीच आज कोर्टात जायचे होते
मधुराकडे पाहताना रागिणीला एकदम शेवंताची आठवण झाली.
क्रमशः….
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
सातारा
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈