श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ छोटुली – भाग 5 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहीलं – कलाकाराच्या प्रत्येक हावभावावर टिकून राहिलेली असते. आज तेच कौशल्य त्यांना त्या रुसलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी वापरायचं आहे. आता इथून पुढे)
जेव्हा त्यांना पडद्यामागे ती मुलगी दिसली, तेव्हा त्यांना वाटलं, तो पडदा म्हणजे कैकेयीचं कोपभवन झालय. या पडद्यामागे सगळ्या शोचं राज्य डावावर लागलय. तिच्याजवळ ते गेले, पण ती मुळी बोलायलाच तयार नव्हती. जेव्हा त्यांनी अवीचं नाव घेतलं, तेव्हा मात्र तिने लगेच वळून पाहीलं आणि अशा नजरेने बघितलं की अवीचं नाव ऐकताच ती शांतीपूर्वक बोलायला तयार आहे. ते तिच्याशी अतिशय प्रेमाने बोलले. वेळेची नाजुकता, मुलीचं नाजुक वय, आणि ग्रँड फिनालेची नाजुकता, सगळं मिळून त्यांच्या बोलण्याच्या शैलीला अतिशय नाजुक बनवत होतं. आपला राग बाजूला ठेवून त्यांनी त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. दोघांच्यामध्ये काही खूस-फूस झाली आणि अनाउंसमेंट केली गेली, ‘काही तांत्रिक अडचणीमुळे यावेळी शूटिंग होऊ शकत नाही. बरोबर एक तासाने शूटिंग सुरू होईल.’
अनाउंसमेंट ऐकताच एकदम चांगलाच गोंधळ माजला. व्ही. आय. पी. संतापले. प्रत्येक मिनिटाचे पैसे गोळा करण्यासाठी त्यांचे बुभूक्षित डोळे निर्मिती विभागाकडे टवकारून पहात होते. गॅलरीत बसलेले प्रेक्षक, काही न करताही बेचैन झाले होते. ज्यांनी इतका वेळ धाव-पळ करून सेट लावला होता, त्यांची स्थितीही वाईट होती. सजावट, तंत्रज्ञ, मुख्य अतिथी, परीक्षक सगळ्यांचीच आपापली शान होती. आपापला थाट होता. आपआपल्या मागण्या होत्या. सगळ्यांना वाटत होतं, चॅनेल करोडोंनी खर्च करतेय, ते केवळ त्यांच्यामुळे. परीक्षकांचं ग्लॅमर ही जशी काही कार्यक्रमाला दिलेली फोडणी होती. आशा तर्हेने ही फोडणी दिली जात होती, की त्यामुळेच पैसे परतले जाताहेत… भाजीच जशी… तंत्रज्ञांना वाटत होतं, त्यांची प्रगत टेक्नॉलॉजीच असं दृश्य सादर करताहेत आणि तेच यशाचं रहस्य आहे. तिकडे स्पर्धकांच्या आई-वडलांना वाटतय, त्यांच्या मुलांच्या प्रतिभेमुळेच शो चाललाय. सगळ्यांचीच पाची बोटे तुपात होती.
ती लहान मुलं, ज्यांना लहानपणापासूनच या तणावात ढकललं गेलय, ती कधी असा विचार करत नव्हती, की त्यांच्यामुळेच हा शो चाललाय. ती नेहमीच घाबरलेली, भेदरलेली असत. त्यांना कधी आईकडून, कधी परीक्षकांकडून ओरडून घ्यावं लागे. विशेषत: स्क्रिप्ट लिहिणार्याकडून रागावून घ्यावं लागे. जे लिहिलं आणि पाठ करून घेतलं, ते बोलायचं राहिलं तर किंवा चुकीचं बोललं गेलं तर त्यांची धडगत नसे. सुरुवातीच्या ३-४ शोमध्ये सगळ्यांकडूनच स्वयंशिस्त पाळली जात होती. हळू हळू शो पॉप्युलर होत गेला, तशी चॅनेलची हुकुमशाही वाढत गेली. टी.आर.पी. जसजसा वाढू लागला, तसतसे वेगवेगळे कयास बांधले गेले. शोचा प्रत्येक विभाग हे यश आपल्यामुळेच मिळतय, असं मानू लागला. दृश्यांच्या परिकल्पनेत रचनात्मकता आणण्यासाठी अनेकदा धोकादायक दृश्येही दाखवली जाऊ लागली. मुलांना बॉलप्रमाणे इकडून तिकडे ढकलले जाऊ लागले. प्रेक्षक श्वास रोखून ते दृश्य बघू लागले.
यावेळी मिस्टर अरोरा मात्र शांत होते. एका वेळी एकच समस्या सोडवायची, असा त्यांचा नियम होता. सगळ्यांना बाजूला सारत ते, ज्या ठिकाणी अवी बसला होता, तिथे येऊन पोचले. त्याला घेऊन छोटुलीकडे आले. कोपर्यात रुसून बसलेल्या छोटुलीचे डोळे त्याला बघताच चमकले. ती अविबरोबर खेळण्यासाठी धावत – पळत आली.
क्रमश:….
मूळ लेखिका – डॉ. हंसा दीप
Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada
Ph. 001 647 213 1817 Email- [email protected]
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈