सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ अभियंता दिन – भारतरत्न सर विश्वेश्वरय्या ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
१५ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘ अभियंता दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेलेले विश्वेश्वरय्या हे ध्येयवादी आणि थोर देशभक्त होते.
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी खेड्यात १५ सप्टेंबर १८६१ ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनिवासशास्त्री हे विद्वान संस्कृत पंडित होते. आईने त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि बंगळूरमधून विशेष गुणवत्ता किताब घेऊन बी.ए केले.
त्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड लागली. म्हैसूरच्या राजांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन पुण्यात अभियांत्रिकी पदवी साठी पाठवले. अत्यंत कठीण अशी इंजिनीयरिंग ची अंतिम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून मुंबई राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.स्थापत्य शास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वत्र पसरला.त्याची नोंद घेत सरकारने मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक केली. याच काळात खडकवासला धरणासाठी त्यांनी स्वयंचलित गेटची निर्मिती केली. भारतात प्रथमच हे गेट केले गेले. या डिझाईनला ‘विश्वेश्वरय्या गेट’ हे नाव दिले गेले.
१९०४ साली बढती मिळून देशाचे पहिले अभियंता होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. संपूर्ण देशातून त्यांचे कौतुक झाले.
वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी २४ वर्षे नोकरी केली आणि १९०७ चाली सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर हैद्राबाद सरकारचे विशेष सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली.मूसा आणि इसा या दोन नद्यांवर धरणे बांधून त्यांनी फार मोठे काम केले.
त्यानंतर म्हैसूरच्या राजांनी मुख्य अभियंता म्हणून त्यांना बोलाविले.ते म्हैसूरला आले ‘ कृष्णराज सागर ‘ या कावेरी नदीवरील धरणाचे काम त्यांनी पूर्ण केले.वृंदावन उद्यान, म्हैसूर सॅंडल ऑईल ॲंड सोप फॅक्टरी, म्हैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ म्हैसूर या इमारती आणि धरणे ही त्यांच्या कार्याची पावती आहे.शिक्षण, उद्योग, कृषी अशा सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. सर्वांगीण विकासासाठी अनेक गोष्टी , उद्योगांना चालना दिली.समाजोन्मुख कामे केली. ‘कर्नाटकच्या विकासाचा भगिरथ’ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांचा गौरव म्हणून म्हैसूर संस्थानचे ‘दिवाण पद ‘त्यांना बहाल केले गेले.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात होती. शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी ‘म्हैसूर विद्यापीठा’ची स्थापना केली. सिंचन क्षेत्रासाठी मौलिक असे योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टीम ही त्यांची देणगी आहे.
भद्रावतीचा लोखंड आणि पोलाद कारखाना ही त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. मुंबईची प्रीमियर ऑटोमोबाईल इंडस्ट्री, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी ( आत्ताची दि हिंदुस्तान एराॅनाॅटिक्स ) आणि ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेत त्यांनी भाग घेतला. धुळे, सुरत, सक्कर, कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड, विजापूर अशा अनेक शहरांच्या पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेतही त्यांनी भाग घेतला. त्यांनी औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली.
सेवानिवृत्तीनंतर चाळीस वर्षे विविध समित्या आणि संस्थांमध्ये विविध पदांवर अखंडपणे मोलाचे काम केले. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते.अगदी साधी राहणी होती. म्हैसुरी पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचा स्वभाव साधा होता.पण काही बाबतीत परखड होता. ‘शिस्त ‘हा त्यांचा परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके आणि स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे. त्यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. माणसात देव आहे आणि माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते.
ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब बहाल केला. अनेक विद्यापीठांनी सन्माननीय ‘डि.लीट’ने गौरविले. वयाच्या ९४व्या वर्षी सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले. बंगळूरचे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ भारतातले सर्वात मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र सरकार तर्फे त्यांच्या स्मरणार्थ ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ दिला जातो.
ते शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. १४ एप्रिल १९६२ साली वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे हे अफाट कार्यकौशल्य अत्यंत गौरवास्पद आहे. एका उत्तुंग, महान चरित्राचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम !! ?
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈