श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ मनोकामना (भावानुवाद) – श्री भगवन वैद्य ‘प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

या स्टेशनवर गाडी जरा जास्तच थांबत होती. गाडीचे इंजीन इथे बदलले जायचे. `खाली उतरुन काही खायला मिळतं का बघुयात.’

`हो ना! गाडीत आलेल जेवण अगदीच भिकार होतं. पैसे मात्र पुरेपूर वसूल करतात हे लोक!’  डब्यात अशा तर्‍हेचं बोलणं होत होतं. एवढ्यात दोन मुसंडे बोगीत घुसले.

`मोबाईलवर खाण्याबद्दल तक्रार कुणी केली?’  त्यांच्यापैकी एक जण प्रवाशांकडे गरागरा डोळे फिरवत म्हणाला. `घरात काय फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवण मागवता काय?’  दुसरा म्हणाला.

`बोला ना! कुणी तक्रार केली?  मादर… आमची रोजी-रोटी हिसकवायला बघताय तुम्ही लोक ! टीव्ही नं आमच्यावर इन्क्वायरी लावलीय. बोला, कुणी कंप्लेंट केली?’  पहिला संतापाने किंचाळत म्हणाला.

`मी केली! जेवण अतिशय वाईट होतं. फेकून द्यावं लागलं.’  धोतर, कुडता घातलेला एक वयस्क फौजी म्हणाला. एका मुसंड्याने पुढे येऊन त्याची कॉलर पकडली. दुसर्‍याने त्याचा हात खेचला आणि त्याला ओढू लागला. `थेरड्या चल खाली! तुला चांगलं जेवण खिलवतो. सगळे जण हबकले. एवढ्यात वरच्या बर्थवर झोपलेले दोन नवयुवक उड्या मारून खाली आले. `त्यांना सोडा. कंप्लेंट आम्ही केलीय.’

`तुम्ही जादा हुशारी दाखवताय काय?  तुम्हाला चांगल्या जेवणाची चव चाखवतो.’

`स्साले…  त्या टी.टी.ने आम्हाला दंड केला. गाडीत यायचंही बंद केलय. ‘  या दरम्यान आणखी दोन मुसंडे डब्यात शिरले. साईड बर्थवर बसलेले दोन तरुण पुढे येत म्हणाले, `त्यांना सोडा. तक्रार आम्ही केलीय. हवं तर आमचा मोबाईल बघा. ‘

`कंप्लेंट त्यांनी नाही,  आम्ही केलीय.’  शेजारच्या बोगीत कॉलेजची हॉकी टीम प्रवास करत होती. `आम्ही वीस प्लेटस मागवल्या होत्या.’  हातात हॉकी स्टीक घेऊन पुढे येत मुले म्हणाली. एकंदर डब्यातलं सगळं वातावरण बघून चारी मुसंडे कुणालाही हात न लावता खाली उतरले.

डब्यातली स्थिती पूर्ववत झाली. केवळ वयस्क फौजी,  पाणी भरलेल्या डोळ्यांनी आस-पासच्या युवकांकडे काही काळ बघत राहिले,  जशी काही त्यांची मनोकामना पूर्ण झालीय.

मूळ कथा – साध     मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments