? जीवनरंग ❤️

☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – एक ☆ श्री आनंदहरी ☆

“आईवडिलांनी तुला वळण लावलं नाही वाटतं…”

राधाबाई म्हणाल्या तसे ऋतुजाने चमकून त्यांच्याकडे पाहिले.

आपल्या तोंडून असे वाक्य कसं काय बाहेर पडलं या विचारात असणाऱ्या राधाबाई मनोमन चमकल्या. त्यात सुनेचे म्हणजे ऋतुजाचे असे पाहणे… क्षणभर त्यांच्या मनात भीती तरळून गेली. ऋतुजा पटकन काहीतरी खरमरीतप्रत्युत्तर देऊन आपला अपमान तर करणार नाही ना ? मनात उभा राहिलेल्या या प्रश्नाने त्यांचे अंतर्मन ढवळून निघाले होते.

ऋतुजा काहीच बोलली नाही. क्षणभर ऋतुजाच्या डोळ्यांत त्यांच्याबद्दल, सासूबाईंच्याकडून अनपेक्षित आलेल्या या प्रश्नाबद्दल आश्चर्याचे भाव तरळून गेले होते. त्या असे काही विचारतील, म्हणतील हे ऋतुजाच्या ध्यानी -मनीही नसावे. डोळ्यांतील आश्चर्य क्षणात मावळून त्याची जागा दुःखाने घेतली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. काही न बोलताच ती आत निघून गेली.

ऋतुजाने काहीच प्रत्युत्तर केलं नाही हे पाहून राधाबाईंना बरे वाटले. त्यांनी आत जाण्यासाठी वळलेल्या ऋतुजाच्या डोळ्यांतील अश्रू पाहिले आणि त्यांना मनोमन खूप वाईट वाटू लागले.ऋतुजाने अपमान केला नाही यामुळे सुखावलेल्या त्यांना, ‘आपण असे म्हणायला नको होतं .. ‘ असे वाटू लागले. स्वतःच्याच वागण्याबद्दल मनाला चुटपुट लागून राहिली होती. त्यांनी ऋतुजाचा कानोसा घेतला. ती किचनमध्ये जाऊन गॅसजवळ काहीतरी करत होती. आपण तिच्याजवळ जावं.. नकळत आपल्याच बोलण्यामुळे, प्रश्नामुळे निर्माण होऊ घातलेली,  झालेली दरी बुजवावी असे त्यांना वाटले .. पण मनाला वाटले तरी त्या उठल्या नाहीत, आत गेल्या नाहीत किंवा तिला हाक मारून बाहेरही बोलावले नाही. तशाच बसून राहिल्या. काही क्षणातच त्या आपल्याच विचारात हरवून गेल्या होत्या.

अवघे अठरावे सरलं आणि त्या त्या कुटुंबात सून म्हणून आल्या होत्या. लग्न ठरायच्या आधीपासूनच त्यांची आई वेळोवेळी त्यांना काहीबाही सांगत होती. कधी काही चुकले , चुकीचे वागले असे आईला वाटले की सूनावत होती. कधी चिडून तर बऱ्याचदा समजुतीच्या स्वरात सुनेने सासरी कसे वागावे, कसे वागू नये हे सांगत होती. तसे त्यांना लहानपणापासूनच ‘ मुलीच्या जातीने असे वागू नये..’ असे त्यांच्या आईने ऐकवलेले होतेच. लहानपणी कधी फटकारलेही होते. अगदी पारंपरिक साच्यात बसवावे तसे त्यांना, त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्याला ‘ मुलीच्या ‘ साच्यात बसवण्याचा प्रयत्न केला होता .. नव्हे प्रयत्नपूर्वक त्यांना त्या साच्यात बसवलेले होते. पिढ्यांनपिढ्यांचा आदर्श , चांगल्या मुलीचा साचा.

लग्न ठरल्या आधीपासूनच आदर्श मुलीच्या साच्यातून त्यांची रवानगी ‘आदर्श सून ‘ या साच्यात झाली होती आणि वेळोवेळी आईचे तेच तेच सांगणे, समजावणे सुरू झाले होते.

‘सासरी जाशील तेंव्हा तिथं इथल्यासारखं वागू नकोस… पटकन कुणाला उलट उत्तर देऊ नकोस, फटकळपणे काही बोलू नकोस.. नाही म्हणजे तुला तशी सवय आहे म्हणून सांगतेय.. कुणी काहीही म्हणालं तरी ऐकून घ्यावं.. उलटून बोलू नये..ते माहेर नाही हे ध्यानात ठेव .. सासूला माझ्याठिकाणी मान.. पण मी काही बोलले की लगेच प्रत्युत्तर देतेस तशी तिथं देऊ नकोस.. मुकाट काही न बोलता ऐकून घ्यायांची सवय हवी  गं मुलीच्या जातीला..अगं, कितीही झालं तरी ती आपली सासू असते गं.. समजा काही म्हणाली तरी ऐकून घे.. ऐकून घेतलं की मग भांड्याला भांडं लागत नाही घरात… आणि एक , सर्वांशी मिळून-मिसळून वाग… कुणात दुजाभाव करू नको.. कुणी काही लागट बोललं तर तिथल्या तिथं विसरून जावं.. मनात अढी ठेवू नये..’

 कधीतरी त्यांची आई त्यांना सांगायची पण ते स्वतःशीच बोलल्यासारखं असायचे.. काहीसे स्वतःत हरवून गेल्यासारखे.. काहीसे जुन्या आठवणीत गेल्यासारखे.. दुसऱ्याच कुणाचे शब्द आईच्या तोंडून ऐकतेय असे राधाबाईंना वाटायचे. कदाचित आजीने आईला ऐकवलेले.. कदाचित पणजीने आजीला ऐकवलेले..

क्रमशः….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments