जीवनरंग
☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – दोन ☆ श्री आनंदहरी ☆
‘बाळा, आपलं बायकांचं असंच असतं गं.. रोप एका अंगणात रुजायचं.. वाढायचं.. मोठं व्हायचं.. मग दुसऱ्या कुठल्यातरी अंगणात जाऊन पुन्हा रुजायचं, बहरायचं.. मुळांना नव्या मातीशी, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं थोडं कठीण जातं हे खरं… काही क्षण ते रोप कोमेजतं हे ही खरं.. पण तिथल्या मातीशी जुळवून घेता आलं तर मात्र ते चांगलं फोफावतं.. बहरतं.. बहरायचं असलं तर नव्या मातीशी, वातावरणाशी जुळवून घ्यायलाच हवं.. अगं, सुरवातीला थोडं जड गेलं तरी हळू हळू ती माती आपलीच वाटू लागते.. मुळाशी चिकटून आलेल्या जुन्या मातीच्या खुणाही मग वेगळ्या रहात नाहीत, उरत नाहीत.. इथं उगवायचं, वाढायचं आणि तिथं फोफवायचं, बहरायचं..हेच आपणा बायकांचं जीवन असतं हे ध्यानात ठेव पोरी… तिथं गेल्यावर आपणच आपलेंपणा निर्माण करायचा असतो.. हे अंगण चार दिवस पाहुणी म्हणून लाभलेलं.. आपलं खरं अंगण ते तेच असतं..ज्या अंगणात लग्न होऊन जातो तेच अंगण…’
लग्न होईपर्यंत राधाबाईंची आई त्यांना असेच काही-बाही सांगत रहायची. राधाबाई लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आल्या होत्या. सारे बालपण, नव्या नव्हाळीने उमललेले ते अवखळ तारुण्य, ज्या घरात, अंगणात नाचल्या , बागडल्या ते घर, अंगण सारेच वळणाआड गेले.. आणि त्या सासुरवाशीण झाल्या.. पण मनाच्या कुपीत मात्र ते सारे तिकडचे क्षण, भवताल त्यांनी अलगद जपून ठेवलेला होता.
राधाबाई लग्न होऊन या घरात आल्या त्या माहेरच्या आठवणींच्या तळ्यात डुंबतच..घर, माणसे, सारेच परके.. सारंच वेगळं..उपरेपणाची भावना मनाला डाचत होती.. आईचे शब्द मनात रुंजी घालायचे.. आता हेच आपले घर हे त्या मनाला बजावत राहिल्या.. काळ हळुहळु पुढे सरकत राहिला.. तसे सासरचे घर आपले वाटू लागले.. घरातील माणसे आपली वाटू लागली.. मन थोडे थोडे रमू लागले. कामाच्या घबडक्यात माहेरच्या आठवणी नकळत मनातल्या कुपीत कधी गेल्या हे त्यांच्याही लक्षात आले नाही.
घरात तसा जाणा-येणाऱ्यांचा, पाहुण्या-पैंचा रावताच असायचा.. कामाला दिवस अपुराच वाटायचा. त्यांची सासू पण अवतीभवती काहीतरी करत वावरत असायची.. त्यामुळे निवांतपणा , एकटेपणा असा फारसा मिळायचा नाहीच पण कधीतरी एखादया दिवशी दूपारच्या वेळी त्या एकट्याच परसातल्या आंब्याच्या झाडाखाली काहीतरी निवडत बसलेल्या असताना त्यांच्या मनातली आठवणींची कुपी उघडायची.. एखादी माहेरची आठवण हळूच वर यायची..हात ही स्तब्ध व्हायचे.. मन माहेरात पोहोचून त्या आठवणीत रमून जायचे..त्या आठवणीत रमता रमता कुठल्याशा आवाजाने किंवा तसेच मन भानावर यायचे पण भवतालाचे भान हरपून, अवघे माहेर आठवून त्यांच्या डोळ्यांत त्यांच्याही नकळत पाणी दाटलेले असायचे.
“आईची आठवण आली का बाळा ?”
घरातले कुणीतरी वडीलधारे येता येता तिच्या डोळ्यांतील पाणी पाहून आपलेपणाने विचारायचे. कधीतरी सासू तिथे आली तर तिचे मन ओळखून मायेने जवळ घेत विचारायची,
“खूपच आठवण येत असेल तर येतेस का चार दिवस आई-वडिलांना भेटून ?”
कसंनुसं हसत आठवणीतला तो क्षण हळूच मनाच्या कुपीत ठेवून मनाची कुपी त्या बंद करायच्या आणि डोळे पुसत म्हणायच्या,
“नाही, तसे काही नाही. डोळ्यांत काहीतरी गेलं होतं..”
राधाबाईंची सासूही समजूतदार होती. तिलाही असे अचानक डोळ्यांत काहीतरी जाऊन पाणी येण्याचा अनुभव होताच. ती हळुवारपणे राधाबाईंची पाठीवर हात फिरवत म्हणायची,
“तरीही वाटलं कधी माहेरी जावंसं वाटलं चार दिवस तर सांग. सांगीन कुणाला तरी सोडून यायला. याच दिवसात माहेरी जावंसं वाटतं गं…. एकदा का संसाराच्या रामरगाड्यात अडकलं की… आणि अगं आई असते तोवरच माहेर.. नंतर नाही ग उरत काही..”
राधाबाईंना सांगता-समजावताना नकळत सासूबाईंच्या मनातही हरवून गेलेल्या माहेरची आठवण जागी व्हायची मग सुनेला ते जाणवू नये म्हणून त्या झटकन स्वतःचं हळवं झालेलं मन सावरत आत निघून जायच्या.
राधाबाईही डोळ्यांच्या कडा पुन्हा टिपून काम करत राहायच्या.
क्रमशः….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈