सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ भेट…. – भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !)  — इथून पुढे —

त्यादिवशी असाच बैलगाडीला जुंपून त्याला नेहमीप्रमाणं शेतात नेला . शेंगांच्या रानातून शेंगाची पोती आणायची होती. निम्या रस्त्यात गेल्यावर ठेच लागल्याचं निमित्त होऊन सुंदर रस्त्यात कोसळला .शिवाचा जीव हलला , गाडीवरून उतरून त्याला त्यानं चुचकारल ,पाठीवरून हात फिरवला पण सुंदर उठायचं नाव घेईना .तिथंच बैलगाडी सोडून दुसरा बैल रस्त्याकडेला बांधून तो सुंदरला उठवायचा प्रयत्न करू लागला.पायात काटा मोडलाय का पाहिला पण कुठं काहीच झालं नव्हतं .शिवाच हातपाय गळून गेलं .तिथंच गळ्याला मिठी मारून त्यांन  हंबरडा फोडला . निरव शांततेत शिवाचा हंबरडा दूरवर घुमत राहिला .रस्त्यावरून येणा-जाणाऱ्यांनी बातमी घरात पोहचवली.जागेवरच डॉक्टर आणला .डॉक्टरनं इंजेक्शन दिलं .हा -हा म्हणता गाव गोळा झाला ,पण शिवाला काही सुचत नव्हतं.तो नुसता सुंदर …सुंदर करत उसासे टाकत होता . संध्याकाळी हळू हळू चालवत कसा तरी सुंदरला घरापर्यंत आणला .सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं . कुणी म्हणलं करणी झाली ,कुणी म्हणलं दिष्टवला .शिवा तर सुंदर जवळून रात्रंदिवस उठलाच नाही .सुंदरच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसा त्याचा धीर सुटला .त्यान पण अन्नाचा कण घेतला नाही .अंगारा ,धुपारा ,दृष्ट काढून ,औषधं बदलून  झाली पण सुंदर शांत होता .केविलवाणे तो मालकाकड पाहत राही आणि एका सकाळी जमिनीवर मान टेकून सुंदर शांत झाला .शिवाने हंबरडा फोडला. कुणाचंही मन पिळवटून जावं असंच आक्रीत घडलं होतं .शिवा वेडा व्हायचाच बाकी होता .

त्यादिवसापासून त्याची झोप उडाली .जेवणावरून स्वत:वरून ,शिवारावरून मन उडलं .जिथं तिथं सुंदरच्या आठवणी त्याचा पाठलाग करत .रात्री अपरात्री उठून तो गोठ्यात जाई आणि सुंदरच्या जागेवर विमनस्क बसून राही .लोकांनी समजूत काढली ,शालुच्या माहेरच्यांनी समजूत काढली पण तो स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हता की सुंदर त्याच्या गोठ्यातून जीवनातून गेलाय .

शालूला रात्रंदिवस धन्याची  चिंता लागून राहिली .त्याचं मन तिलाही वळवता येत नव्हतं कारण सुंदर त्याचं काळीज होतं अन काळजाशिवाय मनुष्य कसा जगेल ? चालतं बोलतं आत्माहीन प्रेतवत अवस्था होती शिवाची . तिला धास्ती लागून राहिली होती त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना होणार ? देवाचा धावा रात्रंदिन चालूच होता.

गेल्या राखीपौर्णिमेला राखी बांधायला माहेरी गेल्यावर सहजच तिचं लक्ष गोठ्यातल्या वासराकड गेलं अन तिच्या सर्वांगातून एक अनामिक लहर चमकली .सुंदरचंच दुसरं रूप होतं ते ! अन तिच्या मनात एक कल्पना आली .हा शेवटचा उपाय होता धन्याला सुंदरच्या आठवणीतून भानावर आणायचा .

तिनं भावाला -महादूला सविस्तर कल्पना दिली .बहिणीच्या संसाराची त्याला पण काळजी होतीच .प्रयत्न किती यशस्वी होणार हे तिला माहीत नव्हतं पण शिवाला दुःखातून सावरण्याचा हा एकच मार्ग तिच्याकडे शिल्लक राहिला होता .आणि म्हणूनच ती महादूची वाट बघत अस्वस्थपणे आत -बाहेर फेऱ्या घालत होती .

घुंगराच्या आवाजाने ती भानावर आली अन पटकन आरतीचं ताट आणायला आत गेली . लगबगीनं तिनं पाटीत खिचडा  ओतला आणि उंबऱ्यावर येऊन सुंदर ss म्हणून हाक दिली. नवा कोरा रंगीत कंडा , कासरा अन घुंगुर बांधून महादू दारात वासराला घेऊन हजर होता  .घुंगराचा आवाज अन ‘सुंदर’ हाक ऐकून शिवा दचकून गोठ्यातून बाहेर आला. शालून वासराला ओवाळून तोंडात खिरीचा घास दिला डोक्यावर हात फिरवला अन खिचडा खायला दिला .शिवा निश्चल होऊन पहात होता . शालू वासराच्या पाठीवर हात फिरवत त्याच्याशी बोलत होती ,”सुंदर तुझ्या धन्यान काय अवस्था करून घीतल्या बघ ,तूच समजवून सांग बा मी कुणाकड बघून जगू ? झालं ती वाईटच! आम्हाला तर काय बरं वाटतय का र? पण त्याचा आपल्याजवळचा शेर तेव्हढाच हुता  तेला आपण काय करणार ?आपण प्रयत्न केलंच ना ? आता सावरायला हवं ,तूच सावर तुझ्या धन्याला ! ती बघ तुझी जागा ” म्हणत शालून गोठ्यात त्याच्या जागेकडं बोट केलं तिचा कंठ दाटून आला; तिनं वासराच्या गळ्यात हताशपणे हात टाकले तिचे डोळे भरून वाहू लागले.

शिवाला त्याचं लहानपण आठवलं असाच तो सुंदरच्या गळ्यात हात टाकून बोलायचा. थेट सुंदरच होता तो दुसरा !तेच डोळे ,तीच पांढरी शुभ्र सशासारखी गुबगुबीत अंगकांती …”सुंदर sss “पुन्हा एकदा त्यानं आर्त हाक दिली .. गळ्याला मिठी मारली लहान मुलासारखी अन अश्रूला वाट दिली .महादू गळ्यातल्या टॉवेलन डोळे पुसत राहिला .सुंदर शिवाचे हात प्रेमाने चाटू लागला अन मघापासून गच्च दाटून आलेलं आभाळ आता धाडधाड कोसळू लागलं …

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments