श्री बिपीन कुलकर्णी
☆ जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-1 ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
गच्च भरलेल्या आभाळाकडे ती माय तिच्या गच्च भरलेल्या डोळ्यांतून पहात होती. आभाळ आणि डोळे कधीही कोसळतील अशी स्थिती. तशातही ओथंबून फुटू पाहणाऱ्या आभाळात एक सोनेरी किरण प्रकटला आणि त्याने भोवतालच्या गर्द काळ्या मेघांना आभेत लपेटून टाकले. क्षणभरच … पण तेवढ्या क्षणांत त्या माय च्या काळ्याभोर डोळ्यांतसुद्धा एक आशेच्या किरणाची लकेर उमटून गेली. हळू हळू धूसर असलेलं विरत गेलं आणि धुक्याचा पडदा हटावा तसं गत आयुष्य लक्ख दिसू लागले…
लेकराच्या ट्याहाने तिच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं. लेकराचा बापही खुश होता. तिघांचं तीन कोनी आयुष्य सुखनैव पणे दौडत होतं. लेक दिसामाजी मोठा होत होता. तो आपलंच ऐकेल आणि आपल्या मताप्रमाणे वागेल ह्याबद्दल बाप निश्चिन्त होता. परंतु लवकरच लेकाचे स्वतंत्र विचार बापाला ठळकपणे जाणवू लागले होते. लेकराने त्याच्या करियरचे निर्णय स्वतः घेऊन मग बापाला सांगितले, मात्र बापाच्या कपाळावरची आठी आणि चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेली नाराजी मायला कळून चुकली. पुढच्या आयुष्यात आता काय भोगावं लागणार ह्याची कल्पना माय ने उराशी बांधली. तिला एखाद्या निर्णयात सहभागी करून घ्यायचं अशी त्या बापाची पद्धत आणि सवयही नव्हती. बाप लेक समोर आले की मायचं काळीज लककन हलायचं. त्या क्षणी पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्या विचाराने तिचा मेंदू भिरभिरायचा. बाप, लेक आणि माय तिघे जणू त्रिकोणाच्या तीन कोनाच्या पॉईंट वर जगत होते. लेकाने ठरवल्याप्रमाणे त्याचं करियर घडवलं. त्याची नोकरी सुरु झाली… आणि बापाने हिशोब मांडायला सुरवात केली. माय च्या आयुष्याची चव अजूनच बेचव आणि अळणी झाली. अगतिकपणे माय सगळं सहन करीत होती… उद्याच्या आशेने. तिच्या हातात फक्त तेवढंच उरलं होतं…
आता पावेतो बाप लेक दुरावले होतेच, त्यातच एके दिवशी लेकाने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे अमलातही आणला. आज मात्र माय हरली. दैवा पुढे आणि नशिबापुढे तिने हात टेकले. हतबलतेने ती दिवस ढकलत राहिली. अचानक एके दिवशी लेक एका मुलीला घेऊन माय ला भेटायला आला. माय समजली. तिने निमूटपणे सुनेची खणानारळाने ओटी भरली आणि आपल्या लग्नात मिळालेल्या स्त्री धनातून सोन्याचा एक हार आणि दोन बांगड्या तिच्या ओटीत टाकल्या. बापाची धुसपूस सुरु झाली होतीच ती अजून वाढली. त्या मुली मुळे तो नात्यापुरता का होईना पण सासरा झाला होता. माय मोठ्या आशेने बापाकडे पहात होती. अपेक्षा होती लेक व सुनेला त्याच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादाची. 5-10 मिनिटे शांततेत गेल्यावर लेक दहाव्या मिनिटाला त्याच्या बायकोला घेऊन घरातून बाहेर पडला. केवळ बायकोच्या हट्टाखातर तो घरी आला होता. माय ने तिच्या सुनेला तेवढ्या वेळात जोखले होते. ती सुनेच्या समंजसपणावर खुश होती. बाप नेहमी प्रमाणे माय लेकरांपासून अलिप्त होता. काळ वेळ आपल्या गति प्रमाणे आणि त्या लेकाचा बाप त्याच्या गतित. माय ला मात्र काळवेळच काय पण कशाचच बंधन नव्हतं. तिच्या दृष्टीने सगळंच थांबून राहिलं होत.आता तर कशाचाही फरक माय ला पडत नव्हता. माय नेहमी म्हणायची, देव एका हाताने काढून घेत असेल तर दुसऱ्या हाताने नक्कीच काहीतरी देत असतो. पण तो काय देतोय ते उमजून समजून प्रसाद म्हणून स्वीकारलं पाहिजे. माय असं काही बोलायला लागली की लेकाला ती शापित यक्षिणी वाटायची . अहो, खरंच होतं ते … तिच्या संसारातली शापित यक्षिणीच होती ती… तिच्या लेकाला एकच समाधान म्हणजे सासू- सुनेचे सख्य. पण तो तीन कोनांचा त्रिकोण .. त्रिकोणच राहिला होता. चौकोन व्हायची सुतराम शक्यता नव्हती.बाप बदलायला तयार नव्हता आणि लेक? त्याचा तर प्रश्नच नव्हता . कालाय तस्मै नमः … कदाचित काळच त्रिकोणाचा चौकोन करेल ह्या आशेवर माय जगत होती आणि…
क्रमशः …
© श्री बिपीन कुळकर्णी
मो नं. 9820074205
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈