श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ रियुनियन .. भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
( याच दिवशी ते चौघे पुन्हा याच ‘पॉल्स लाउंज’ रेस्टोरंट मधे दुपारी बारा वाजता परत भेटतील.)—- इथून पुढे
चौघांमधे सर्वात जो उशीरा येइल तो त्या रियुनीयनचे बील देइल अशी गंमतशीर अटही त्या एग्रीमेंट मधे त्यांनी टाकली होती. आजच तो दिवस होता जेंव्हा पन्नास वर्षांनी ते चौघे परत भेटणार होते.
रेस्टॉरंट च्या बाहेर एक लैंडरोवर गाडी येउन थांबली अन त्यातून इयान उतरला. त्याने गाडीची चावी व्हैले कडे दिली व तो रेस्टोरंटच्या दिशेने चटचट चालत आला. पोलीस सुपरीटेंडेंट म्हणून पाच वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावरही त्याने आपला फिटनेस चांगला ठेवला होता. कुठूनही तो पासष्ट वर्षांचा म्हातारा वाटत नव्हता.
हेड वेटर त्याला टेबलशी घेउन आला तसा रिचर्ड उठून उभा राहिला व गळाभेट घेत त्याने इयानचे स्वागत केले. दोघे मित्र लंडनमधे असले तरी ब-याच काळाने, कदाचित तीस एक वर्षांनी भेटले होते.
हेड वेटरने पन्नास वर्षे जुनी फ्रेंच वाईन टेबलवर आणून ठेवली. ती महागाची वाईन बॉटल बघून रिचर्डच काय पण इयानदेखील चरकला. पोलीस खात्यात वरच्या हुद्दयावर असतानाही इतकी उंची वाईन तो कधी प्यायला नव्हता.
त्या दोघांच्या चेह-यावरचे भाव वाचत हेड वेटर चटकन म्हणाला
‘सर..ही वाईन कॉम्पलीमेंटरी आहे या रेस्टॉरंटच्या मालकांकडून. पन्नास वर्षांनी चार मित्र आमच्या रेस्टॉरंट मधेच परत भेटताहेत हा साधा योग नाही. आमच्यासाठीही ही अभिमानाची गोष्टच आहे.’
‘ठीक आहे..तुमच्या मालकांना धन्यवाद सांगा. बाकी दोघे मित्र आले की मग ही बॉटल उघडूत’ इयान म्हणाला.
तो पुढे काही विचारणार इतक्यात पोर्चमधे कार थांबल्याचा आवाज आला..व ‘एक्स्क्युज मी’ असे म्हणत हेड वेटर तिकडे धावला.
बाहेर एक आलिशान लिमोझीन गाडी उभी होती. ड्रायवरने पटकन मागे येत कारचा मागचा दरवाजा उघडून धरला व लिमोझीन मधून टिमोथी उतरला, नव्हे ‘सर टिमोथी’ उतरले.
दोनच वर्षांपूर्वी इंग्लंडच्या राणीने बकिंगहम पैलेस मधे इतर मान्यवरांबरोबर टिमोथीला नाईटहूड प्रदान केले, व तो सर टिमोथी झाला.
त्याला रुबाबात आत येताना पाहून इयान आणि रिचर्ड दोघांची छाती दडपली. एकेकाळी आपला मित्र असला तरी आज तो ब्रिटन मधल्या टॉप पाच उद्योगपतींपैकी एक होता व आता त्याला नाईटहूड मिळाली होती. त्यामुळे त्याच्याशी वागता बोलताना आब सांभाळूनच वागावे लागणार होते.
पण झाले वेगळेच. मित्रांसमोर येताच स्वतः टिमोथीने मोठेपणाचे सगळे संकेत झुगारुन, फेकून दिले, व अत्यानंदाने दोन्ही मित्रांना घट्ट आलिंगन दिले. मोठ्या पोझीशनवरील लोकांना जवळचे मित्र नसतात. ख-या मित्रांसाठी ते नेहमीच तरसतात हे वाक्य इयान व रिचर्डला आज पटले.
आता तिघे मित्र एकत्र आले तसे गप्पांचा फड रंगला. एकमेकांची व तिघांच्या कुटुबियांची चौकशी झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अर्थात अजून स्टुअर्ट यायचा होता.
पण तेवढ्यात हेडवेटरनी येउन सांगितले की स्टुअर्ट यांना यायला थोडा वेळ होइल तरी त्यांनी त्याच्यासाठी न थांबता सुरवात करावी.
‘अच्छा, म्हणजे स्टुअर्टला आजचे बिल द्यायची संधी मला द्यायची नव्हती तर…त्यासाठी एवढा खटाटोप’ असे टिमोथीने म्हणताच तिघेही हसले.
वाईनची बॉटल उघडली गेली व ती पन्नास वर्षे जुनी विंटेज वाईनचे ग्लास हातात घेत तिघांनी चियर्स म्हंटलं..
‘टू फिफ्टी इयर्स ऑफ फ्रेंडशीप’ टिमोथीने टोस्ट केले व बाकी दोघांनी त्याला दुजोरा दिला.
गप्पा मारत वाईन व रेस्टोरंट मधून त्यांनी ऑर्डर केलेले उंची पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी आपला फर्स्ट कोर्स पूर्ण केला.
अजूनही स्टुअर्टचा पत्ता नव्हता.
वाईनची बाटली संपली तरी स्टुअर्ट अजून आला नव्हता त्यामुळे नाईलाजाने त्यांना मेन कोर्स ऑर्डर करावा लागला. टिमोथीला नंतर एक बोर्ड मिटींग असल्याने स्टुअर्टसाठी अजून थांबणे शक्य नव्हते.
हेड वेटरने त्यांना त्या दिवसाच्या स्पेशल मेनू बद्दल सांगितले. यातल्या ब-याच डिशेस तिघांच्या आवडीच्या होत्या. हा योगायोग समजून त्यांनी त्या डिशेस ऑर्डर केल्या. गप्पा मारत, हास्य विनोद करीत त्यांनी मेन कोर्स पूर्ण केला.
क्रमशः….
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈