श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ रियुनियन .. भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(गप्पा मारत, हास्य विनोद करीत त्यांनी मेन कोर्स पूर्ण केला ) —- इथून पुढे .
आजवरचे सर्वात आठवणीत राहील असे लंच त्यांनी पूर्ण केले. सर्वात शेवटी आपल्या कैरी बैगमधून आणलेले एक स्पेशल केक रिचर्डने भीतभीत काढून समोर ठेवले. त्यावर ‘फिफ्टी इयर्स ऑफ फ्रेंडशीप’ असे लिहिले होते. तो केक पाहून इयान व टिमोथी खूश झाले.
स्टुअर्ट येण्याची आशा आता मावळली होती. त्याची भेट होउ शकली नाही ही खंत तिघांना लागून राहिली होती. तिघांनी मिळूनच केक कापला. रिचर्डने स्वतःच्या हातांनी बनवलेला तो केक–ज्याने या मित्रांच्या पुनर्भेटीची गोड सांगता झाली. केक खाउन रेस्टोरंटमधल्या सर्वांना वाटण्यात आले.
टिमोथीने हेड वेटरला बिल मागितले. तसे तो हसला..
‘सर टिमोथी, बिल तर पेड झालय..’
‘पेड झालय? पण कोणी केले?’ टिमोथीने आश्चर्यचकित होत.विचारले. तेच भाव इतर दोघांच्या चेह-यावर होते.
‘तुमचे मित्र स्टुअर्ट यांनी..’
‘पण तो तर आलाच नाही..मग कसे पेड केले..’
‘माफ करा..सर टिमोथी..पण आजच्या काळात बिल पे करायला प्रत्यक्ष यायची गरज कुठे भासते?’
‘तेही बरोबरच आहे’ इयान म्हणाला..मग आपल्या मित्रांकडे वळत तो म्हणाला ‘पण मग स्टुअर्टला यायचंच नव्हतं तर हे बिल देण्याची तर काय गरज होती?’
तेवढ्यात बाहेर कार थांबल्याचा आवाज आला.
‘चला…शेवटी तरी स्टुअर्ट वेळ काढून आला वाटतं’ असे समजून ते तिघे खूश झाले. पोर्चमधून आत येणा-या पावलांची चाहूल घेत ते तिघे दरवाज्याकडे एकटक श्वास रोखून पहात होते.
अन..तो आत आला…अन ते तिघे डोळे फाडून त्याला पहातच राहिले. समोर स्टुअर्ट हसत उभा होता.
“हो स्टुअर्टच…पण बापरे..हा इतका तरुण..अगदी चाळिशीतला कसा दिसतोय…? याचे वयच वाढले नाही की काय?” तिघांच्या मनात एकाच वेळी हा विचार आला.
‘तो’ हसला. त्या तिघांजवळ येत तो म्हणाला..
‘मला ठाउक आहे..तुम्हा तिघांच्या मनात काय प्रश्न आहे? तुमचा स्टुअर्ट इतका तरुण कसा काय? बरोबर?’
तिघेही काही बोलले नाही. काय चाललय हे तिघांना ही कळत नव्हते.
‘सांगतो..सारा उलगडा करतो. मी तुमच्या मित्राचा, स्टुअर्टचा मोठा मुलगा, टेड. मी आज माझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करायला इथे आलोय’.
टेडचे हे बोलणे ऐकून तिघांच्या पायाखालची जमीनच हादरली. रिचर्डने थरथरत्या हाताने आपल्या दोन्ही मित्रांचा आधार घेतला. दोघांनी त्याचा हात घट्ट पकडला.
टेड पुढे म्हणाला
‘पप्पा..सहा महिन्यापूर्वी गेले..प्रोटेस्ट कैंसर. खूप इच्छा होती त्यांची की तुमचे हे रियुनियन करेपर्यंत त्यांना आयुष्य मिळावं..पण देवाच्या मनात ते नव्हतं. मृत्यु जवळ आला तेंव्हा पप्पांनी मला बोलवून सांगितले की त्यांच्याऐवजी या रियुनियन मधे मी त्यांना रिप्रेजेंट करावं. आजच्या दिवशी तुम्हा मित्रांच्या भेटीत कसलाही गोंधळ नको म्हणून सहा महिने आधीच आजचा पूर्ण दुपारसाठी हे रेस्टॉरंट मला त्यांनी बुक करायला सांगितले होते.
खूप आठ्वण काढायचे तुमच्या हायस्कूल च्या दिवसांची. तुमच्या गंमती जमती, मस्ती, गर्लफ्रेंड्स, सगळे आठवत रहायचे. त्यांना या रियुनियनमधे ते क्षण पुन्हा जगायचे होते.’
टेडने हसत हसत आपले डोळे पुसले.
‘खरंच अतीव इच्छा होती पप्पांना तुम्हाला भेटायची. म्हणून मला त्यांनी मृत्यु आधी सांगितले होते “माझ्या तिन्ही मित्रांना भेटशील तेंव्हा त्यांना माझ्यावतीने घट्ट मिठी मार”. असे समजा की त्यांची हीच शेवटची इच्छा पूर्ण करायला मी आलोय’
टेडचे हे बोलणे ऐकून तिन्ही मित्रांना अश्रु अनावर झाले. ते तिघे टेडजवळ आले. तिघांनी टेडला घट्ट अलिंगन दिले. त्यांच्या अश्रुंनी टेडचे खांदे भिजुन गेले.
टेडला मिठी मारताना तिघांनाही मिटलेल्या डोळ्यांसमोर आता आपला पंधरा वर्षांचा स्टुअर्टच दिसत होता.
ख-या अर्थाने आता त्यांचे ‘रियुनियन’ पार पडले होते.
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈