जीवनरंग
☆ बाहुली…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆
तो आज जाम खूश होता. आजच गर्भलिंग चाचणी करून आले होते . डॉक्टरांनी एकच शब्द उच्चारला “अभिनंदन अजितराव !” बस्स! एवढ्या एका शब्दानं अजितला आभाळ ठेंगणं झालं होतं. काय करु अन् काय नको असं झालं होतं. सुमित्राची आता नीट काळजी घेतली पाहिजे. जेवण,खानपान, येणंजाणं सर्व काही लक्षपूर्वक केलं पाहिजे.
याच विचारात गर्क होऊन तो नेहमी प्रमाणेच आरशासमोर दाढी करत उभा होता. आवडतं गाणं गुणगुणत. गालावरून हात खाली येईल तसा आणखीन रंगात यायचा, आणखीन जोरात गाणं गुणगुणायचा. तेवढ्यात एक छोटीशी, सुंदर बाहुली त्याला आरशात दिसू लागली. गोल चेहऱ्याची, नाजूक गुलाबी ओठ, टपोरे पिंगट डोळे,गोरे गोबरे गाल, काळे कुळकुळीत केस. एक बट हळूच डोळ्यावर रेंगाळणारी. बाकीचे केस डोक्यावर घेऊन सुंदरशा बो मध्ये बांधलेले. ओठावरचं मोहक हसू पाषाणह्रदयालापण पाझर फुटवणारं! किती गोड, किती मोहक, किती सुंदर ……..
अजित त्या बाहुलीकडे एकटक पाहत राहिला…अगदी भान हरपून….जणू ती त्याच्याकडे बघूनच स्मीत करत आहे. असं त्याला वाटलं. तो गरकन वळला. बाहुली घेण्यासाठी हात पुढे करतो तोच तिचा चेहरा रक्ताने माखू लागला. हळूहळू रक्त खाली ठिपकू लागलं. अन् बघता बघता तिचं डोकं छिन्न विछिन्न होऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळलं तसा तो ओरडत उठून बसला. अंग घामानं पूर्ण भिजलेलं, नजर सैरावैरा धावत होती, त्या बाहुलीचा शोध घेत. हातपाय थरथर कापत होते. घशाला कोरड पडली होती.
त्याच्या ओरडण्यानं सुमित्रापण जागी झाली. लाईट लावून बघते तर तिचा नवरा धापा टाकत, घाबरलेल्या नजरेने काही तरी शोधत होता. “अहो काय झालं?”….तिच्या हाकेनं तो आणखीन दचकला. सुमी त्याच्या जवळ जाऊन त्याला शांत करू लागली. थोडं पाणी दिलं . तसा तो थोडासा भानावर आला.
“पुन्हा तेच स्वप्न का?” तिचा केविलवाना प्रश्न.
त्याने मानेनेच होकार भरला.
आता पर्यंत घरातली सगळीच जागी झाली. खोलीचं दार वाजलं. सुमीनं दार उघडताच सासुबाई धावतच आत आल्या. “काय झालं गं सुमी?.. तू बरी आहेस ना…!”
“मला काही नाही झालं .ह्यानांच भयानक स्वप्न पडत आहेत.”
“हत्तेच्या एवढंच ना ..!त्यात काय एवढं ओरडण्या सारखं?”
“तसं नाही मामांजी. तीच तीच भयानक स्वप्न सारखी सारखी येत आहेत. ऐकल्यावर जीव घाबरा होऊन जातो माझापण.”
अजित अजून भारावल्या अवस्थेतच. शून्य नजरेन एकटंक जमीनीकडे बघत बसलेला.
“तुम्ही दोघंपण थोडावेळ बसा इथंच मलापण खूप भीती वाटतेय.” तिने विनंती केली. तशी दोघ बाजूच्या बाकड्यावर बसली. रात्र अशीच संपून गेली.
सकाळी नेहमीप्रमाणे तो अॉफीसला जाण्यासाठी निघाला. रात्रीच्या गोंधळाची झलक डोळ्यात अजून तरळत होतीच. मनाच्या एका कोपऱ्यात भीतीच सावट मूळ धरत होतं.
सुमित्राला दिवस गेले होते. डॉक्टरांनी मुलगा असल्याची खात्री दिली होती .त्यामुळे सगळी खूप आनंदात होती. पहली मुलगी होतीच पाच वर्षांची. आणि आता मुलगा आहे म्हटल्यावर सगळे तिची खूप काळजी घेत होते. सासू,सासरे,नवरा अन् माहेरचीपण सगळीच तिला तुपात घोळत होती. तीपण आनंदात होती नव्या पाहुण्याचे स्वागत कसं करायचं याच विचारात ती गूंग असायची.
पण आता अजितच्या स्वप्नांमुळे ती थोडीशी चिंतीत झाली होती. एकसारखीच भयानक स्वप्नांमुळे त्याच्याइतकच तीपण घाबरली होती. यामाग काहीतरी कारण आहे हे नक्की पण काय हे काही कळेना त्यामुळे जास्तच भय निर्माण झालं होतं.
दिवसेंदिवस अजितच्या स्वप्नांची भयानकता वाढू लागली. कधी ती बाहुली वरून एकदमच त्याच्या अंगावर येऊन पडायची,तशीच रक्ताळलेल्या अवस्थेत, कधी तिचे तुकडे,तुकडे होऊन त्याच्याभोवताली गोल गोल फिरत असल्याचा भास त्याला होत होता. तर कधी तोच बाहुलीच्या शरीराचे एकेक अवयव तोडून टाकताना तो स्वतःला पहायचा. किती भयानक, किती विक्षिप्त, किती अवर्णनिय…..
त्या दिवशी तर कहरच झाला. नेहमीप्रमाणे तो अॉफीस मध्ये बसून काम भरभर संपवण्याच्या घाईत होता. जवळच्या टेबलावरचे चव्हाण त्याला सारखं वेळ संपत आल्याची जाणीव करून देत होते. “अरे आवर लवकर, अॉफीस सुटायची वेळ झाली. तरी तू आपला फाईलीत तोंड खुपसून बसला आहेस.”
“अरे झालंच रे, फक्त दोन मिनिटं” तो उत्तरला
अन् पुढच्याच क्षणी पेनमधून रक्ताचे थेंब ओघळताना दिसू लागले अन् बघताबघता संपूर्ण कागद रक्ताळून गेला. तो किंचाळून उठला आणि अॉफीसभर सैरावैरा पळू लागला. तो जाईल तिथं रक्ताळलेला कागद त्याच्या पुढ्यात हजर… काय करावे सुचेना …..या दारातून त्या दारात असा तो पळतच राहिला. अॉफीस मधील सगळेजन मात्र त्याची अवस्था बघून अचंबित झाली. काय झालय कोणालाच काही कळेना. कारण तो रक्ताळलेला कागद फक्त त्यालाच दिसत होता. बाकीतर सारे फक्त त्याला सैरावैरा पळताना बघत होते. शेवटी एकाने त्याचा हात धरून थांबण्याचा प्रयत्न केला अन् तो तिथेच भोवळ येवून खाली पडला. सगळ्यांनी मिळून त्याला दवाखान्यात नेले.
काही दिवस दवाखान्यात उपचार घेतल्यावर तो घरी आला. पंधरा दिवसाची सुट्टी घेतली होती. आराम करण्यासाठी. पण त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. दवाखान्याच्या औषधाबरोबर बुवा बाबाचा इलाजपण चालू होता. पण कशालाच यश येईना अन् कारण काही कळेना.
त्या रात्री मात्र अघटीत घडलं. रात्रीचे दोन वाजले असतील. अजितला अचानक जाग आली ….नव्हे कोणीतरी हलवून हलवून उठवत होतं त्याला. तीच होती. ती बाहुली.
“उठा झोपताय काय…..मला कायमचं झोपवलत..पण मी नाही तुम्हला झोपू देणार….”
ती बोलत होती आज…..त्याला काहीच कळेना…तो स्वप्नात आहे का जागेपणीच ती त्याच्याशी बोलत आहे…… तो पार घाबरलेला…..
“अगं कोण तू…का छळतेस मला…काय वाईट केलय मी तूझं ???” प्रश्नच प्रश्न…आणखीन काय बोलणार तो..?
“काय वाईट केलय ? जीव घेतलात तुम्ही माझा…. “रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिच्या डोळ्यातून रक्त मिश्रीत अश्रू गालावर ओघळत होते.
“मी आणि जीव घेणार, कसं शक्य आहे. साधं मछर सुद्धा मारायचं धाडस होत नाही माझ्याच्यानं अन् तुझा जीव काय घेतोय मी….?”
ती हसू लागली. तिच्या विकट हास्याने खोली हादरून गेली.
“विसरलात इतक्यात…… मागच्याच वर्षी तुम्ही माझ्या शरीराची खांडोळी खांडोळी करून मारून टाकलंत मला. माझ्या आईच्या पोटातच. आईने किती विरोध केला. पण ऐकला नाहीत तुम्ही. मुलगी नको म्हणून…आणि आता मुलगा आहे म्हणून तिची काळजी घेताय…जपताय तिला….मी त्याला जन्मूच देत नाही. माझी जशी खांडोळी झाली तशी त्याची पण करून टाकते.” असं म्हणतं ती उंचावरून वेगाने सुमीच्या पोटावर वार करण्यासाठी बाणासारखी कोसळू लागली. तसा तो लगेच आडवा झाला. तिला थांबवलं. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो ओरडला “थांब…..थांब…मला…..मला….. वेळ दे थोडा.”
ती थांबली. “आता बोला… मी काय वाईट केलतं तुमचं की जन्मायच्या आधीच तुम्ही मला संपवून टाकली. काय गुन्हा केलाय मी सांगा…? मला जन्मायचं होतं, हे जग बघायचं होतं, आईच्या कुशीत लपायचं होतं, तुमच्या बोटाला धरून चालायचं होतं… किती स्वप्न पाहिली होती मी…पण …काय केलंत तुम्ही……माझ्या शरीराबरोबर माझ्या स्वप्नांच्या सुद्धा चिंध्या करून टाकलात…..काय वाईट केलतं मी तुमचं….. ?” तिला पुढचं बोलवेना…ती ओक्साबोक्षी रडू लागली…..
अजितला त्याची चूक उमगली. भयंकर गुन्हा त्याच्या हातून घडला होता. आपण सुशिक्षित, सुसंस्कृत असून देखील कसं रानटी राक्षसासारखं वागलो !……त्याचं त्याला हे सगळं अपमानास्पद वाटू लागलं…..तो रडू लागला..त्या छोट्याशा बाहुलीसमोर कळवळून बोलू लागला……” बाळा मी अंधळा झालो होतो. मुलगाच पाहिजे म्हणून हट्टाला पेटलो होतो. चुकलं माझं, माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला. मी तुझा गुन्हेगार आहे. मला हवी ती शिक्षा कर. मी तयार आहे…….”
तो दोन्ही गुडघे टेकून तिच्या पुढे हात जोडून रडू लागला…. “हं…मी काय शिक्षा करणार , तुमच्यासारख्या कित्येक हट्टी माणसांमुळे माझ्या सारख्या अनेक मुली शिक्षा भोगत आहेत. कोणताही गुन्हा न करता…मी काय शिक्षा करणार…!”तिचा खिन्न आवाज त्याच्या जिव्हारी लागला. तिची जगण्याची तळमळ त्याला जाणवत होती. तो म्हणाला…”पोरी…. परत ये…..तुझ्या आईच्या कुशीत परत ये…..मी तुला कधीच अंतर देणार नाही…..परत ये पोरी…. परत ये……..!”तो बोलत राहिला…..
त्याच्या विनवणीने ती कासावीस झाली…..तिने आकाशाकडे पाहिले तसं..गडगडाट सुरू झाला….विजा चमकू लागल्या…..बेभान पाऊस बरसू लागला…..जणू…त्याच्या विनवणीने नियतीला सुद्धा पाझर फुटला……क्षणातच त्या बाहुलीचे रुपांतर एका तेजस्वी ज्योतीत झाले अन् ती ज्योत हळूहळू सुमीच्या पोटाजवळ जावून तिच्या उदरात सामावून गेली………
असेच काही दिवस गेले. अजित आता पूर्ण बरा झाला होता. ती रात्र फक्त त्याने अन् त्याच्या जन्माला येणाऱ्या कन्येनेच अनुभवली होती. तो शांत होता. तिच्या येण्याची वाट पाहत होता.
आज पहाटेच सुमीला कळा सुरू झाल्या. दवाखान्याची लगबग चालू झाली. तातडीने तिला अॉपरेशन थेटर मध्ये घेण्यात आले. काही वेळातच एक छोटंसं बाळ हातात घेऊन एक नर्स बाहेर आली. “मुलगी झाली..किती गोड आहे बघा…!” ती म्हणाली. तसे घरातली सगळी एकमेकांकडे थोड्याशा नाराजीने अन् प्रश्नांकित नजरेने पाहू लागले. अजितने मात्र आनंदाने, उत्साहाने बेभान होऊन तिला कुशीत घेतले. इतरांच्या नाराजीची त्याला बिलकूल पर्वा नव्हती. तो तिला हातात घेऊन निरखू लागला. ती तशीच होती,अगदी बाहुली सारखी…गोड…सुंदर….लाघवी… ! त्याने कुशीत घेताच ती गोड हसली..अन् तो प्रेमाने तिचे पापे घेऊ लागला. डोळ्यातूनपण अश्रूरुपाने आनंद ओसंडून वाहत होता. त्याच्या मागून येणाऱ्या डॉक्टरच्या माथ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. बाबाची बेबी कशी झाली याचं रहस्य काही त्यांना उलगडत नव्हतं. ते अजित कडे बघून म्हणाला, “मला काही कळेना तुम्हाला काय सांगावं,हे कसं काय झालं?”
“डॉक्टर साहेब, मी फार खूश आहे. माझ्या मुलीनं माला माफ केलं. मी आता गुन्हेगार नाही.” अजित उत्तरला.
बाप लेक एकमेकांकडे बघून हसत होती.अन् डॉक्टर आळीपाळीन त्या दोघांकडे बघत होते.पण ते रहस्य मात्र कुणालाच कळू शकलं नाही…शेवट पर्यंत…!
जल है तो कल है।
बेटी है तो फल है।।
© सौ. जस्मिन रमजान शेख
मिरज जि. सांगली
9881584475
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈