सौ. सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – तीन ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)
*कथा न सुटलेलं ग्रहण भाग 3 एका सत्य घटनेवर आधारित! ती सत्य घटना भाग 6 आणि 7 मध्ये..(चेरी पत्रात आपल्या सासर बद्दलचे भयंकर अनुभव सांगत आहे. अस्तित्वातच नसलेले दाम्पत्य जीवन आणि तिचे वांझ हे विशेषण ती निमुटपणे सहन करत असते.) यापुढे…..
पाच वर्षापूर्वी बाबूजी वारले….खरं सांगू ,मला मनातनं या गोष्टीसाठी आनंद झाला की आता तरी या घरातलं विचित्र कर्मकांड बंद होईल .पण कसलं काय!….एकदा अर्ध्या रात्रीतच दीरांचा जोरजोरात हसण्याचा आवाज बंगला भर पसरला… आणि जावेचा रडण्याचा आवाज पण…. आम्हा सगळ्यांना तिथं बघून खोलीच्या एका कोपर्यात कडे बोट करून त्यांनी नमस्कार केला.
पुन्हा जोरात हसून ते सांगू लागले,”माताजी, अहो बाबूजी तिथं बसलेत.ते मला काहीतरी सांगणार आहेत.”… आणि
मग ‘बच्चू’ला दीरांना वडिलांचे ऐकू जाणारे बोलणे ,जे दीर मोठ्या आवाजात रिपीट करत होते, ते सगळे एका डायरीत लिहून काढायचे काम लावले गेले.
माझा आत्मा भटकतोय…. मला सद् गती मिळाली नाहीय…. असं करा, प्रत्येक मंगळवारी माझ्या देवाची पूजा करा ….आणि अन्नदान, वस्त्रदान ,सुवर्णदान, शर्करादान असं एका पाठोपाठ एक करत रहा .त्यानं मला मुक्ती मिळेल.”
त्याप्रमाणे सगळं सध्या केलं जात आहे .
आणखी सांगायचं तर ,तसं आमचं जीवन पण इतरांहून वेगळं आहे. आमच्या मेहता कुटुंबात स्त्रियांना एकटं बाहेर पडण्यास बंदी आहे .मोबाईल वापरण्यावर बंदी,….लँड लाईन,टीव्ही माताजींच्या खोलीत!…. सगळे नोकर चाकर त्यांचे हेर आहेत… आणि माझ्यावर तर घरातल्या लहानथोर सगळ्यांचंच बारकाईने लक्ष !
आम्हा बायकांचा टाइमपास म्हणजे- किट्टी पार्ट्यांना जाणं…मोठमोठ्या हॉटेलमध्ये आमच्या किट्टी क्लबांच्या पार्ट्या होतात. रमी, तंबोलाचे राऊंड ,सर्वांच्या पर्स भरण्याचं आणि रिकामं करण्याचं कामही करतात. शॅंपेनच्या बाटल्या रिकाम्या करणं, जेवताना तोंडी लावण्यासाठी गॉसिप , आपल्या किंमती वस्त्रांचं आणि ज्वेलरीचा प्रदर्शन करणं .हे सगळं ओघानं आलंच. आमचे शॉपिंग ,आमचे वाढदिवस… हे तेवढे सहपरिवार परदेशात साजरे होतात .सिंगापूर, दुबईला जाणं म्हणजे आम्हा लोकांच्या दृष्टीनं ,घरातून अंगणात जाण्या पैकी प्रकार आहे. हे सगळं असलं बेगडी आयुष्य माझ्या मनाला आनंद देत नाही. तिळ- तिळ तुटत मी जगतेय.
पुढे पत्राचा समारोप करताना तिनं लिहिलं होतं,
“तुला शेजारच्या बंगल्यात पाहिल्यावर आपलं माणूस भेटल्याचा मला आनंद झाला. शेजारी उभ्या असलेल्या नणंदे समोर तुला ओळख दाखवून मला निराधार व्हायचं नव्हतं. खरंच हे पत्र लिहून… माझ्या आयुष्याचं दुःख …माझी कुचंबलेली स्थिती..माझी फरफट तुला सांगून मी बंधन मुक्त झालेय. खरं तर तू मला स्वार्थीच म्हणायला हवंस.आपली कथा- व्यथा सांगताना मी साधं तुझं क्षेमकुशल ही विचारलं नाहीय… पण तुला बागेत प्रसन्न चेहऱ्याने, रिलॅक्स मुडमधे काम करताना मी पाहते ना, तेव्हा माझी खात्री पटते की तुला मनपसंत जीवनसाथी मिळालाय.. आणि तू आपलं जीवन मनसोक्त जगतेस…..
‘अभागी चेरी ‘हा पत्राचा शेवट सीमाच्या अश्रूंनी पुसून टाकला होता,पहिल्या वाचनातच!
अजय दुसऱ्या दिवशी पत्र वाचून म्हणाला,” बाप रे, सुशिक्षित, उच्चभ्रू समाजातील लोकअसेहीअसतात ?….सगळंच भयंकर आणि अघोरी वाटतंय. पुन्हा विचार करून तो म्हणाला ,”सीमा ही तुझी मैत्रीण ऍबनॉर्मल बुद्धीची तर नाहीये ना? नाही तर आपलं म्हणणं लोकांना पटावं म्हणून, त्यांची सहानुभूती मिळावी म्हणून लोक कुठल्याही थराला जाऊन वक्तव्य करतात.
“नाही रे, शाळेत पण ती तशी नव्हती. आता तर तिचं माहेरही संपलय .तिच्या दुःखावर फुंकर घालायला आहे तरी कोण? तिचं आयुष्य कसं रखरखीत वाळवंट आहे बघ. मला तर तिच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही याचं फार वाईट वाटतंय .”
थोड्या दिवसाने चेरीचा विषय सीमाच्या मनातून उतरून गेला .कारण ती कधी भेटू शकणारही नव्हती त्यामुळे ..पण आपण पत्र वाचले आहे हे कळावे म्हणून चेरीने पत्रात लिहिल्याप्रमाणे एक पांढरा रुमाल जास्वंदीच्या झाडाला बांधून तिने चेरीची खात्री मात्र करून दिली होती.
नंतर मेच्या सुट्टीत मुले आली .त्यांच्या सहवासात दिवस हां हां म्हणता पळाले. सुट्टी संपली. मुलं परत गेली अन् तिला घरात पूर्वीपेक्षा जास्त एकटेपणा जाणवू लागला.
क्रमशः…
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈