सौ. सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ कथा न सुटलेले ग्रहण – भाग – चार ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
(एका सत्य घटनेवर आधारित….ती सत्यघटना भाग 6 आणि 7 मध्ये)
चेरीच्या पत्रावरून सीमाला तिचं अभागीपण जाणवलं आहे. आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही ,याचे तिला वाईट ही वाटत आहे .मे महिन्याची सुट्टी संपून गेल्यामुळे मुले पुण्याला परत गेलीत.आणि तिला फार एकाकीपण जाणवत आहे. आता पुढे…..
पावसाळ्यातील कुंद वातावरण… रोगट हवा…. पावसानं ओल्या झालेल्या गवताचा विचित्र उग्र वास…. त्यामुळे सीमाच्या मनातही मळभ साचलं होतं. विमनस्कपणे ती खिडकीजवळ उभी होती …रस्त्यावरची रहदारी न्याहाळत ! घरासमोरच्या सार्वजनिक पार्कमध्ये शुकशुकाट होता .सुट्टीतली गर्दी, वडा पिंपळाच्या पारावरची
धक्का- मुक्की, वडाच्या पारंब्यावर लोंबकाळत झोका घेण्याच्या लायनीत तर तिची मुलेही सामील असायची .तिला सगळं आठवलं आणि मन फारच हळवं होऊन गेलं.
अचानक कोणीतरी दारावर पुन्हा पुन्हा धक्के देतय आणि बेलही जोरजोरात वाजवतय हे लक्षात आल्यावर पुढं होऊन सीमानं दरवाजा उघडला…..अन् तुफानी वाऱ्याच्या वेगाने आत येऊन चेरी तिच्य्या गळ्यात पडली. “सेव्ह मी सीमा!”म्हणत रडू लागली.
सीमाला काय करावं सुचेना. आपल्या हातातली एक डायरी सीमाच्या हातात देऊन चेरी न थांबता बोलत राहिली, ” सीमा तुझ्या मोबाईल कॅमेऱ्यामधून डायरीतल्या या पानापासून मागे- मागे जात जितके जास्तीत जास्त फोटो काढता येतील तेवढे काढ, प्लीज माझ्यासाठी !जास्त वेळ नाहीये माझ्याकडे…. अन् फोटो काढून झाल्यावर मी काय सांगेन ते ऐक…. प्रश्न न विचारता!
आधी धापा टाकणारी ती, दीर्घ श्वसन करत खुर्चीवर बसली. डायरी पुन्हा आपल्या हातात घेतल्यावर जरा सावरल्यासारखी झाली.. अन् बोलू लागली,”थँक गॉड !तू आता घरातच होतीस .आता सगळं चांगलंच होणाराय.माझं मन मला ग्वाही देतय….फक्त तुझी मदत हवीय आणि ती मिळणारच आहे .”
चेरी आश्वस्त होऊन बोलत होती. पण सीमाला तिच्या बोलण्यावरून काहीच बोध होत नव्हता.
“सीमा लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच मी घरात एकटी आहे.माझ्या सोबतीला ठेवलेल्या ‘मेड’ला मी पिक्चरला पाठवून दिलंय. पुरुष मंडळी कामावर, तर इतर सर्वजण बारशाला गेलेत. मी वांझ म्हणून घरीच! देवानं जणू मला ही संधीच दिलीय.”
एक दीर्घ श्वास सोडून ती पुढे म्हणाली,” अगं वड-आवसे पासून वडपौर्णिमेपर्यंत , एक विचित्र असं व्रत आमच्याकडे चालू झालंय. ते सांगताना सुद्धा अंगात कापरं भरतंय. मंगळवारी वटपौर्णिमेला व्रत संपेल…. आणि बहुतेक आम्ही घरची सर्व मंडळी सुध्दा!”
सीमाच्या प्रश्नार्थक चेहर्याकडे पाहून ती पुढे सांगू लागली,” माझ्या त्या मोठ्या पत्रात मी जे सांगितलं होतं तेच ते गं……मोठ्या दीरांना बाबूजी दिसतात, बोलतात हे सगळं….आणि आता नशीब पण अशी खेळी खेळतंय बघ, की ते डायरीत लिहिले गेलेले बरेच बोल खरे होताहेत. आमचे सगळे छोटे-मोठे उद्योग खूप भरभराट करत आहेत. ज्वेलरी, टेक्स्टाईल ,रिअल इस्टेटमध्ये तर बघायलाच नको…!त्यामुळे घरदार भारावून, झपाटून गेल्यागत वागतंय. दीरांना देवाचा दर्जा दिला जातोय. त्यांच्यामुळंच हे मिरॅकल घडतंय असं सर्वांना वाटतंय.या भयंकर वडव्रताचं उद्यापन तर आणखीच भयानक आहे. घरातली मोठी माणसं तर सोडाच ,पण ‘टीन एजर्स कंपनी’ पण ब्रेन वॉश केल्यागत वागते आहे.
हेच सगळं तुला सांगून तुझी मदत घ्यायला मी आलेय. वीस दिवसांपूर्वी रात्री एक अतिभयंकर ,अकल्पनीय प्रकार घडलाय .बाबूजी म्हणे रात्री ओक्साबोक्शी रडत प्रकट झाले…अगं त्यांचं बोलणं’बच्चूनं’ डायरीत पण लिहून काढलंय.”
बाबूजी म्हणत होते,..असं दीर म्हणताहेत हं….” बेटा मला ही भूत योनी सहन होत नाहीये…. मला सद्गती, मोक्ष हवाय. माझ्याप्रमाणेच लाजो मावशी,बिट्टू राजेश,सोहनलाल ,तिवारीजी, निमा, कल्पना,हितेश असे आम्ही नऊ जण इथं घुटमळतोय. तुला शेवटचं मागणं मागतोय ….वडव्रत कर. आम्हाला मोक्ष मिळेल. आणि तुम्ही पण दीर्घायुषी व्हाल.”
” डायरी प्रमाणे सगळे विधी संपन्न करण्यासाठी ही मूर्ख माणसं कामाला लागलीत….अगं बाबूजींनी दीरांना सांगितलेल्या नावापैकी चार जणं अजून जिवंत आहेत. भूत योनीत कुठली घुटमळला?मला वाटतंय बहुतेक माझे दीर सायको झालेत.त्यांना होणारे विचित्र भास अन् ऐकू येणारा बाबूजींचा आवाज ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात?.. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. पण माझं म्हणणं कोण ऐकणार ?” पुन्हा प्रत्येक शब्दावर जोर देत चेरी म्हणाली,
“पुढे ऐक ,न घाबरता…तुझ्या हिंंमतीवरच आता सगळं अवलंबून आहे… …. विधीप्रमाणे वरच्या मजल्यावरच्या गच्चीकडील भिंतीला नऊ आरपार भोकं पाडली गेलीत ..त्याला चांगला गिलावा ही केलाय.त्याच्या शेजारी अशाच आरपार नऊ पाईप फिट केल्यात. हॉलमध्येआठ बार आणि माता जींच्या खोलीत एक बार जरा कमी उंचीवर फिट केलाय.
वड आवसे पासून सर्वांचे रात्री पूजा प्रकरण,.. आणि तामसी खाणे पिणे चालू झालेय …उद्या पासून सगळ्या नोकर चाकरांना सुट्टी!….. परवा दोरखंड आणून त्याचे नऊ गळफास तयार करायचेत….इकडे नणंदबाई आणि जाऊ दोघी मोठ्या उत्साहाने पायाखाली घ्यायची नऊ स्टुलं घेऊन आल्यात…. आता फक्त पौर्णिमेची वाट बघायचं काम बाकी. पौर्णिमेला संध्याकाळी खग्रास चंद्रग्रहण लागेल… ग्रहण स्पर्श झाला की सगळ्यांनी स्टुलावर उभे राहायचं… गळ्यात फास अडकवून घ्यायचा….अन् दीरांची शिट्टी ऐकली की पायाखालची स्टुलं ढकलून देऊन सगळ्यांनी फाशीवर
लोंबकाळायचं…….”
क्रमशः…
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈