सौ. अर्चना सुरेश देशपांडे
जीवनरंग
☆ नवा संदेश….भाग 2 ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
अविनाश येताच दोन्ही गाड्या पाठोपाठ बाहेर पडल्या.नुकताच पावसाळा संपत आल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेते वाऱ्याबरोबर डुलत होती, हिरवीगार सृष्टी मन लोभवीत होती.थंडगार हवेमुळे वातावरण प्रसन्न होते, निसर्ग सौंदर्य पाहता पाहता वसुला मागील दिवसाआठवले. गेल्या वर्ष दीड वर्षात कोरोना ने धुमाकूळ घातला होता अख्ख्या जगाची उलटापालट करून टाकली, लॉक डाऊन मुळे शाळा कॉलेज बंद, छोटे उद्योगधंदे बसले, बेरोजगारी वाढली काही लोकांवर उपासमारीची पाळी आली तर काही ना आपले नातेवाईक कायमचे गमवावे लागले.शेखर व वसुधा ने या काळात जमेल तेवढी मदत केली होती आर्थिक आणि शारीरिकही. शहरात या संकटाने हाहाकार माजवला तर छोट्या-छोट्या गावची काय कथा? असा विचार तिच्या मनात तरळून गेला. एवढ्यात विमलमावशींचं गांवआले. गावाच्या सुरुवातीला विमलमावशींनी सांगितल्याप्रमाणे सुविधा दिसत होत्या. जवळच त्यांचं घर होतं.
विमल मावशींचा मुलगा या गावात वडिलोपार्जित मडकी बनविण्याचा धंदा करत होता शिवाय दीड एकर शेत होतं त्यामध्ये जमेल तेवढे पीक काढून घर चालवत होता. त्याला उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या वेळी बऱ्यापैकी काम असे ते सांभाळत सांभाळत आहे त्या परिस्थितीत समाधानात जगत होता.
घरी पोचल्यावर विमल मावशींनी व त्यांच्या सुनेने सर्वांचे आदरातिथ्य छान केले. दुपारी अंबाडीची भाजी व गरम गरम भाकरी असा बेत त्याबरोबर वसूने आणलेला शिरा होताच. दुपारी गावचे सरपंच गणेश भेटायला आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चहा पिता पिता गावच्या सुधारणे बद्दल शेखरने त्यांचे कौतुक केले पण त्यावर ते म्हणाले,” साहेब, पण या कोरोना काळात मात्र मी हतबल झालो . गावात एवढ्या सुखसोयी असून सुद्धा गावातले बरेच लोक दगावले, आमच्या गावात ऑक्सिजन सिलिंडरे कमी पडली. काही मुलांनीआपल्या आईला गमावले तर काहींनी आपल्या बापाला. सविता तर उघड्यावर पडली, कोरोनाने तिच्या आई-वडिलांचा बळी घेतला, ती अगदी पोरकीझाली. हे ऐकून शेखर व अविने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शेखरने आपल्या गावात तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा मानस बोलून दाखवला सरपंच म्हणाले,”ठीक आहे, आपण तिला विचारू”विमल मावशी सविता ला घेऊन आल्या. गोरी, बोलक्या डोळ्यांची, साधेच पण नीटनेटके कपडे घातलेली सविता मावशी बरोबर आली. तिने सर्वांना”नमस्ते” म्हटले. वसुधाला तिचा चुणचुणीत पण आवडला. अशा या मुलीवर अशी आपत्ती यावी याचे तिला वाईट वाटले. सरपंचांनी तिला शेखरचा मनोदय सांगितला. थोडा विचार करून ती म्हणाली,” काका, या तुमच्या मदतीसाठी मी खूप आभारी आहे तुमच्यासारखे खूप कमी लोक आहेत जबाबदारी स्वीकारणारे.,…. पण या ठिकाणी बरेच जण आहेत की ज्यांनी आई किंवा वडील गमावले आहेत. ते माझे सवंगडी आहेत त्यांनी मला माझ्या दुःखात साथ दिली त्यांना सोडून मी कशी येऊ ? मी तुमच्याबरोबर एकटीच आले तर परमेश्वर मला माफ करणार नाही. इथले गावकरी आणि गणेश काका नक्कीच माझी काळजी घेतील. या बिकट परिस्थितीत एकत्र लढण्याची हिम्मत व ताकद आम्हाला इथल्या गावकऱ्यांनी दिली. माझ्या एकटीची सोय करण्याऐवजी गावाच्या वैद्यकीय सोयी वृद्धिंगत करण्यास मदत करू शकाल का? त्यामुळे गावातील अनेक जणांना त्याचा फायदा होईल. तसेच महिन्या-दोन महिन्यातून आम्हाला मार्गदर्शन केले तर आम्हाला सर्वांनाच त्याचा फायदा होईल हीमाझी इच्छा तुम्ही पूर्ण करू शकाल का? तिच्या या प्रगल्भ विचारांनी शेखर व अविनाश स्तंभित झाले. शेखर,वसु,अवि व अनु यांनी ” आम्ही तुझी मागणी पूर्ण करू” असा तिला शब्द दिला
काही वेळाने ते परतीच्या प्रवासाला निघाले. सविताने विचारलेल्या वचनांची पूर्तता करायची ठरवूनच. त्यांनी हा वसा घेतला आणि पूर्ण करण्याचा निश्चय केला.’ मुलं वयानं लहान असलीतरी कधीकधी ती आपल्याला नवीन काहीतरी सुचवीत असतात, हा विचार मनात येऊन त्यांना सविताचे कौतुक वाटले.
सविताने त्यांना समाजसेवेची नवी दिशा दाखवली होती ,समाजसेवेचा नवासंदेश त्यांना सविता कडून मिळाला होता.
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈