श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ शारदारमण यांची सेटी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मित्र हो, शारदारमणांची सेटी बघितलीत आपण ? थोडी-थोडकी नाही, चांगली पन्नास हजारांची सेटी आहे. एकदा तरी बघून याच आपण!

शारदारमण म्हणजे आपले ते हो, गेल्या वर्षी सर्वाधिक शब्द (४०,४०, ०००) वर्षात लिहिले, म्हणून गिनीज बुकमध्ये ज्यांचं नाव नोंदवलं गेलं. होतं ते. त्यानंतर गप्पा-टप्पा करताना त्यांची मित्रमंडळी म्हणाली, ‘तुमचा कविता संग्रह छापलेला नाही आहे, हे काही बरोबर नाही. जर तो छापला गेला असता, तर जास्तीत जास्त कविता लिहिणारा कवी म्हणून तुमचं नाव गिनीज बुकात छापलं गेलं असतं.’ त्याच बैठकीत शारंचा कविता संग्रह छापण्याची गोष्ट नक्की केली गेली. कविता संग्रह छापायचा आणि त्याचा प्रकाशन समारंभही धुमधडाक्यात करायचा, हे मित्रांनी नक्की केलं. सर्व मित्रांनी आपणहून ती जबाबदारी पत्करली.

शारंच्या १५० कवितांच्या १५-१६ झेरॉक्स प्रती काढल्या गेल्या. वेगवेगळ्या प्रकाशनांकडे पाठवण्यासाठी. त्या मौज, मेहता, राजहंस इ. प्रकाशकांकडे पाठवल्या गेल्या. हे मराठीतले दर्जेदार प्रकाशक मानले जातात ना!

त्यांचे सगळे दोस्त त्यांच्या कवितांच्या झेरॉक्सचा एक एक सेट घेऊन आपल्या परिचयाच्या प्रकाशनाला दाखवायला घेऊन गेले आणि शारं, पुढच्या संग्रहासाठी कविता लिहायला बसले. झेरॉक्सचा आणि दोस्तांच्या जाण्या-येण्याचा खर्च शारंनी करणं भागच होतं.

दुसर्‍या दिवसापासून शारं. रोज प्रकाशकाकडून येणार्‍या स्वीकृतीपत्राची वाट बघू लागले.त्यांनी ३६५ x २४ =८७६० इतके तास उत्तराची प्रतीक्षा केली परंतु ‘साभार परत’ शिवाय पोस्टातून काहीच येत नव्हतं. त्यांनी यापल्या दोस्तांना कविता संग्रहाचं काय झालं, म्हणून विचारलं. त्यांनी पुन्हा प्रकाशकांकडे जायचं ठरवलं. यावेळी त्यांनी शारं.कडून भाड्याची अर्धी रककांच घेतले होती. सगळी जण प्रेस कॉपी जशीच्या तशी घेऊन परतले. सगळे प्रकाशक म्हणाले, आम्ही कविता सग्रह फुकट छापत नाही. सुप्रसिद्ध कवींचाही… अगदी साहित्य अ‍ॅकॅडमीचे अवॉर्ड मिळालेल्यांचाही फुकट छापत नाही.‘

आता पैसे घालूनच काढायचा तर आपण आपल्या इथेच काढू ना!’ त्या दिवशी जोरजोरात चर्चा झाली आणि नक्की झालं, की आपण आपल्या इथेच संग्रह काढायचा. हजार प्रतींसाठी जास्तीत जास्त बारा- चौदा हजार खर्च येईल. प्रत्येक प्रतीची किंमत २५ रु. ठेवावी. प्रत्येक जण २५ प्रती विकेल. खर्च तर निघून जाईलच, काही फायदाही होईल. सगळ्यांनी सर्व प्रकारच्या सहकार्याचं आश्वासन शारं.ना दिलं कोणी मुद्रकाचा शोध घेईल, कुणी चित्रकाराचा. मुखपृष्ठाबरोबरच आतल्या प्रत्येक कवितेवर रेखाचित्र टाकायचे ठरले. त्यामुळे पुस्तक आकर्षक होईल आणि सहजपणे विकला जाईल. कोणी प्रेस कॉपी तपासण्याचे आश्वासन दिले।

शारं.नी पी.एफ. मधून नॉन रिफंडेबल कर्ज घेतले. नंदू मोरेने नवा नवा धंदा सुरू केला होता. त्याच्याकडे पुस्तके छाण्यास दिली. चर्चा अशी झाली, नवखा आहे. पैसे कमी घेईल. सावलतीने पैसे दिले तरी चालतील. पण नंदू धंद्यात बच्चा नव्हे, त्यांचा बाप निघाला. त्याने  कधी कागदांसाठी, कधी प्लेटससाठी, कधी स्कॅनिंगसाठी अ‍ॅडव्हान्स म्हणून जवळ जवळ सार्‍या पुस्तकांचे पैसे आधीच उचलले. 

सहा महिन्यांनंतर पुस्तक निघालं प्रकाशन समारंभ संपन्न झाला. हा समारंभ बाकी काही नाही तरी दहा-बारा हजार खाऊन गेला. प्रकाशन समारंभानंतर कवि संमेलंन झाले. त्यासाठी आस-पासचे शंभर कवी उपस्थित  होते. उपस्थित कवींना शारं.चे कविता संग्रह भेट दिले गेले. विविध मासिकांना आणि नियतकालिकांना अभिप्रायासाठी पुस्तके पाठवली गेली. २०-२५ पुस्तके परिचितांना नातेवाईकांना भेट दिली गेली. ८००-९०० पुस्तके शारं.च्या बाहेरच्या खोलीत, कोपर्‍यापासून खोलीची अर्धी जागा अडवून राहिली, शारं.चे आत्तापर्यंत पुस्तकासाठी   ५०,००० रुपये खर्च झाले होते. आम्ही तुमची २५ पुस्तके तरी विकूच विकू, असं म्हणणारे त्यांचे दोस्त आता तोंडही दाखवत नव्हते. वितरकांशी संपर्क केल्यावर त्यांनी ८५ते ९५ टक्के कमिशननी  पुस्तके मागितली. कुणी तरी तर दीड रुपया किलो या रद्दीच्या भावात पुस्तके मागितली.

 दिवस सरत होते. शारं.च्या दहा बाय दहाच्या खोलीत पुस्तकांचा डोंगर उभा होता. शारं.  रोज ऑफिसमधून आले की तिकडे पाहून सुस्कारे टाकत.

काही दिवसांनंतर शारं.चं लक्ष त्या डोंगरावरून उडालं. मग त्यांच्या रमणीने मुलांच्या मदतीने तो डोंगर उतरवला. एकावर एक पुस्तक ठेवून, तीन लोक आरामात बसू शकतील, इतकी लांबी, रुंदी आणि ऊंची धरून पुस्तकांच्या ओळी बनवल्या.त्यावर प्लायवूडची पट्टी ठोकली. त्यावर फुलाफुलांचं डिझाईन असलेलं रेक्झीन ठोकलं.

आता कोणी  शारं.च्या घरी गेलं, तर गंज चढलेल्या पत्र्याच्या खुर्चीवर बसायची पाळी त्यांच्यावर येत नाही. ते आरामात ५०,००० च्या सेटीवर बसू शकतात.

कुणी विचारतं, ‘काय नवी सेटी घेतलीत?’

‘हो ना!’ शारं.ची रमणी उत्तर देते.

‘पुस्तकांची चांगली कमाई झालेली दिसतीय!’

हो ना! ती उद्गारते. आपण बसलेली सेटी, ५०,००० ची आहे.

तेव्हा, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण एकदा तरी शारदारमणांच्या सेटीवर बसून याच!     .

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments