सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ बिच्चारे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
शुभमंगल… साSवSधाSन…
शेवटच्या ‘न’ बरोबरच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. ‘झालं बुवा एकदाचं…’ त्यावेळी प्रत्येक उपस्थिताच्या मनात आलेला हा विचारच जणू त्या कडकडाटातून घुमत होता. ‘‘चला, आता वधु-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घाला.”… आंतरपाट गोळा करत गुरूजींनी ऑर्डर सोडली… ‘‘हं, गोपाळराव, तुम्ही आधी घाला हार…”…. पण केव्हाचे हार धरून थांबलेले गोपाळरावांचे हात, नेमक्या त्या मोक्याच्या क्षणी मात्र त्यांचं ऐकायला तयार नव्हते… आणि त्याचं कारणही तसंच होतं… उपस्थित एका वेगळ्याच समाधानाने त्यांच्या डोक्यावर अक्षतांचा अक्षरश: मारा करत होते, आणि तो चुकवता चुकवता डोक्याबरोबरच, हार धरलेले हातही नुसतेच इकडे तिकडे हलत होते. खरंतर अशावेळी अक्षता डोक्याला इतक्या लागत नाहीत… केसात अडकतात… आणि गोपाळरावांचा नेमका हाच तर प्रॉब्लेम झाला होता…अक्षतांचा मारा थोपवायला त्यांच्या डोक्याच्या नेमक्या मध्यभागीच केस शिल्लक नव्हते. आणि तेही निसर्ग नियमानुसार योग्यच होतं. वयाला साठी पार करण्याची उत्सुकता लागली, की डोक्यावर ‘कुंडल-कासार’ तयार होणारच की…
आता ही गोष्ट आश्चर्यात पाडणारी आहे, यात शंकाच नाही. म्हणजे हातात वरमाला घेऊन चतुर्भुज होण्यासाठी अधीर झालेल्या एका वराची साठी जवळ आलेली असणं, ही ‘स्वाभाविक’ बाब कशी म्हणता येणार? ——-
खरंतर अगदी लग्नाच्या वयात आल्यापासूनच गोपाळरावांनी इतरांसारखी वधू-संशोधनाची मोहीम अगदी वाजत-गाजत, सर्व तयारीनिशी सज्ज होऊन सुरू केली होती… सर्व तयारी म्हणजे… चार वर्षात मिळू शकणारी पदवी, निवांतपणाने सहा वर्षात का होईना, पण मिळवली होती. जोडीला टायपिंगची ४० स्पीडची परिक्षाही नशीब बलवत्तर असल्याने ते लगेच पास झाले होते. त्याच नशिबाच्या जोरावर, फार महिने वाट पहात थांबावे न लागता, एका खाजगी कंपनीत ‘ टायपिस्ट-कम…साहेब सांगतील ते सगळं ‘… या पोस्टवर नोकरीही मिळाली होती. म्हणजे आता त्यांना ‘उपवर’ असायला काहीच हरकत नव्हती. ते लहान असतांनाच एका अपघातात त्यांच्या वडलांचे निधन झाले होते. एक मोठा भाऊ होता… पण कुठल्याच अर्थाने त्यांना न शोभणारा. अपघाताची नुकसान भरपाई म्हणून मिळालेले थोडेफार पैसे, आणि आईने नाईलाज म्हणून स्विकारलेली अनेक घरच्या स्वैंपाकाची कायमस्वरूपी नोकरी, या दोन चाकांवर तिने बिचारीने संसाराचा गाडा चालता ठेवला होता… अगदी गोपाळरावांना नोकरी लागेपर्यंत. दरम्यान मोठ्या भावाने ब-यापैकी नोकरी, आणि पाठोपाठ तिथलीच एक छोकरी पटकावून, स्वत:ची वेगळी चूल मांडली होती. हळुहळू शरिराबरोबरच, किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगाने, तो मनाने स्वत:ची आई आणि हा धाकटा भाऊ यांच्यापासून बराच लांब गेला होता. अतिकष्टाने आणि ‘गोपाळचे कसे होणार?’ या व्यर्थ चिंतेने केव्हापासूनच खचून गेलेली आई, गोपाळला नोकरी लागल्यानंतर, ‘आता इतिकर्तव्यता झाली’ असे समजून की काय, हे जग सोडून गेली. त्यावेळी भाऊ आला होता, पण त्यानंतर आजतागायत गोपाळला तो दिसलाही नव्हता… आणि आता आपल्याला एक मोठा भाऊ असल्याचं जणू तो विसरूनच गेला होता.
… आता अशा परिस्थितीत त्याच्यासाठी बायको शोधणार तरी कोण? नाही म्हणायला एक मावशी, आणि काही मित्र, जे त्याच्या गरीब स्वभावामुळे नकळत जोडले गेलेले होते, त्यांनी ४-५ वर्षं खटपट केली. पण मग मावशीही देवाघरी गेली, आणि मित्रही कंटाळले… तरी गोपाळ मात्र प्रयत्न करतच होता… पण कितीतरी मुलींचे पालक त्याच्या ‘सडाफटिंग’ या स्टेटस् मुळे साशंक व्हायचे आणि हे ‘स्थळ’ पहायचेच नाहीत. त्याच्या सर्वांगिण सामान्यपणामुळे काही ‘अतिशहाण्या’ (त्याच्या मतानुसार) मुली त्याला नकार द्यायच्या. काही मुली ‘चालेल’, असं नाईलाज झाल्यासारखं म्हणायच्या, आणि त्यांच्या चेहे-यावरचे ते भाव पाहून गोपाळचा ‘अहंकार’(?) डिवचला जायचा, आणि तोच त्यांना नकार द्यायचा.
एकूण काय? तर ‘बाशिंग बळ’ कमी पडतंय्, असे शेरे ऐकू यायला लागले. त्या बिचा-याने स्वत:हून ‘अनुरूप वधू’ ही व्याख्या खूपच ढोबळ करून टाकली होती… कधीच… म्हणजे वयाने पस्तिशी ओलांडल्यावर… तसाही ‘त्याचं लग्न’ हा कुणासाठीच फारसा इंटरेस्टचा विषय कधी नव्हताच. पण तरीही जे मित्र थोडीफार मदत करत होते, तेही एव्हाना स्वत:च्या संसाराच्या व्यापात गुरफटून गेले होते. पण गोपाळची चिकाटी मात्र, इतर कुठल्याही बाबतीत नसेल, इतकी याबाबतीत दांडगी होती. आणि ते अगदीच स्वाभाविक होतं… नाईलाजाने अगदी एकटा पडलेला माणूस सोबतीसाठी आसावलेला असणारच. तरीही तो आनंदी-शांत रहाण्याचा प्रयत्न करत होता… निदान वरकरणी तसं दाखवत तरी होता. आता स्थळाकडूनच्या आधीच्या अपेक्षाही खूप बदलल्या होत्या…. कमी झाल्या होत्या. बघता बघता पन्नाशी उलटली होती त्याची. आता फक्त अशी बायको हवी होती, जी दोनवेळेला त्याला साधंच पण घरचं खाऊ घालेल, क्वचित् कधी दुखलं-खुपलं तर आस्थेने विचारेल.. जमेल तेव्हढी काळजी घेईल… बस्. स्वत:चं मूल आणि इतर समाधानाच्या अपेक्षा कधीच्याच बारगळल्या होत्या. आता फक्त सोबत हवीशी वाटत होती… रंग-रूप–उंची-जाडी, हीसुद्धा अगदी गौण बाब ठरली होती.
… आणि अशातच आता अचानक एक मुलगी… म्हणजे बाई, त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होती… आता लोक त्याला ‘गोपाळराव’ म्हणायला लागले होते… गोपाळराव अगदी खूष होते— कृतकृत्य झाल्यासारखे — आणि आज गोपाळराव चक्क बोहल्यावर चढलेही होते…
…… गुरूजींचे मंगलाष्टक संपले, अंतरपाट दूर झाला, गोपाळरावांच्या हातातला हार आणि समोरची ‘वधू’ही गळ्यात तो हार कधी घातला जातोय् याची वाट पहात ताटकळले होते. वधूच्या हातातला हारही त्याच्या गळ्यात पडायला उत्सुक होता…
… पण डोक्यावर होणा-या अक्षतांच्या माराने गोपाळराव गांगरून गेले होते, त्यांचे फक्त हातच नाही, तर पायही हळुहळू लटपटायला लागले होते… आणि त्यांच्याही नकळत, बारीकशी चक्कर येऊन ते धाडकन् खाली पडले……
———लोखंडी सिंगल कॉटवर उशी छातीशी कवटाळून,… पाय पोटाशी घेऊन…. केविलवाण्या चेहे-याने गाढ झोपलेले गोपाळराव चक्क कॉटवरून खाली पडले …. …आणि त्यांना ते कळलंही नाही. त्यांनी शांतपणे फक्त कूस बदलली.
——– आता छातीशी कवटाळलेली उशी दूर करूच नये इतकी सुखकारक असल्यासारखं वाटत होतं त्यांना—- आणि फरशी तर इतकी उबदार.. जाड आणि मऊमऊ ….खिडकीतून दिसणाऱ्या डोंगरामागून डोकावणारा पौर्णिमेचा चंद्र जणू फक्त त्यांच्याचकडे पहात खट्याळपणे हसत होता, आणि इतक्या वर्षांत- झोपेत का होईना – पहिल्यांदाच गोपाळराव अतिशय खूष होऊन चक्क गोड लाजत होते…..
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈