श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ भाजी मंडई – क्रमश: भाग (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिले, – दोन रमा होत्या. दोघी शर्मा होत्या. दोघींना एकच सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे कुणीही मंचावर यावं, काही फरक पडणार नव्हता. आता इथून पुढे – )

समारंभ सुरू झाला. स्वागताचे भाषण झाल्यानंतर मुख्य अतिथि आणि अध्यक्षांचा परिचय,  स्वागत झाले. अशांत जी नावे अनाऊन्स करत होते. त्यांचे  चेले-चपेटे फोटो काढत होते. या दिवसात कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमात पन्नास लोक येतात आणि कमीत कमी पंचेचाळीस कॅमेरे ऑन असतात. सगळे फोटो शूट करत असतात. बघत कोणीच नाही. सगळे दाखवतच असतात. म्हणजे त्यांनी कॅमेर्‍यात जे कैद केलं, ते दाखवत सुटतात. इथे तर या क्षणांचं नातं आयुष्यभराशी जोडलं जाणार होतं. विदेशी भूमीवर सन्मान मिळण्याची संधी काही वारंवार येत नाही. प्रत्येक कॅमेरावाल्याला विनंती करण्यात येत होती की फोटो घेऊन जरूर पाठवा. अनेक फोटोंमधून सगळ्यात चांगला फोटो निवडून आपल्या संग्रहासाठी घेतला जाणार होता.

सन्मान विकले जातात. सन्मान खरीदले जातात. सन्मान परतही केले जातात. सन्मान परत करणार्‍यांचं नाव सगळ्यात जास्त होतं. मिळण्याचा प्रचार तर वेगळाच होतो. आपल्या योग्यतेचा गर्व होतो आणि अशी ठसकही की आम्हाला तुमच्या सन्मानाचं काही पडलेलं नाहीये. मिळाला तर होताच. परत केला. सन्मानाचं रक्षण करण्यासाठी घेतला होता. आता आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी परत केला. महानतेचा भाव, रक्षण करण्याचा भाव दोन्ही बाजूत होता. मोहिनीने उचललेलं हे पाऊल परिणामकारक होतं. जो कार्यक्रमात येईल, तो सन्मानित होईल. साहित्य गौरव, साहित्य शिल्पी,  साहित्य सृजक, साहित्य रत्न…. सगळ्यात खास  सर्वोच्च सन्मान- भारत रत्नप्रमाणे “प्रवासी भारत रत्न” हा होता.  

सन्मान करण्यासाठी देणार्‍या या पदव्यांसाठी, आयोजकांना खूप परीश्रम करावे लागले होते. जो साहित्याकार कार्यक्रम स्पॉन्सर करेल, त्याचं नाव लिस्टमध्ये पहिलं होतं. पण चांगल्या साहित्यिकांचा, त्यांना सन्मानित होण्यासाठी कुठलाही कार्यक्रम स्पॉन्सर करण्याची गरज वाटत नाही, असा पोकळ, कुचकामी विचार अडथळे आणत होता. बॅक स्टेजवर काम करणारे, मंचाच्या सक्रियतेवर टिपणी करत होते, ‘हा सगळा मूर्खपणा आहे. सन्मानासाठी साहित्याची काय गरज आहे?’

‘मित्रा, तू ईमानदारीची कदर करायला कधी शिकणार?’

’कसली ईमानदारी, ‘र ला र’ आणि ‘त ला त’ जोडला की त्याला तुम्ही कविता म्हणणार. एखादी घटना लिहिली की त्याला तुम्ही कथा म्हणणार. अशा दहा घटना एकत्र केल्या  की कादंबरी होईल. मी अशी रोज एक कादंबरी लिहीन.’

 “लेखन मनातल्या मनात नको. कागदावर दिसायला हवं. हे सारे हिंदीचे भक्तगण, हिंदीची सेवा करताहेत. सन्मानासाठी तर हिंदी सेवा. एरवी घरातही मुलांबरोबर बोलणं इंग्रजीतूनच होतं!”

“ठीक आहे. आपल्याला काय? आपला आपल्या कामाशी संबंध. सध्या आपण आपल्या सन्मानाच्या छापखान्याकडे लक्ष देऊ या.“ 

एकाएकी मोठी समस्या निर्माण झाली. जे आले नव्हते, त्यांचीही नावे छापली गेली. बहुतेक चुकीची यादी हातात पडली होती. मंचावरून नाव पुकारलं जात होतं पण तिथे कोणीच नव्हतं. जे होते, ते आपलं नाव येण्याची वाट बघत होते. त्यांचा धीर सुटत चालला होता. समोर बसलेल्यांमध्ये गडबड सुरू झाली.

‘केवढी अव्यवस्था आहे इथे!’

‘बघुयात तरी पडद्याच्या मागे काय गोंधळ चाललाय ते!’ भारतातून आलेल्या उन्मुक्तजींना रहावले नाही. ते घाईघाईने पडद्याच्या मागे काय चाललय, ते बघण्यासाठी गेले.

क्रमश:…….

मूळ कथा – भिंडी बाजार    मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments