श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ देवदासी लक्ष्मीपूजन …भाग 2☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

(तोच धागा पकडून मी त्याच्याकडे माझ्या प्रेमाचा विषय काढायचे ठरविले.) इथून पुढे —

” मला तुला काहीतरी सांगायच आहे. तुला वेळ असेल तर बोलू का ” मी धिटाईने बोलायचे ठरविले. 

” बोल ना”

” तू आत्ता ज्या देवदासींबद्दल बोललास त्यांना मी खूप जवळून बघितले आहे. वयाच्या १० वर्ष्यांपर्यंत मी त्यांच्यां बरोबर राहिले आहे. माझी आई देवदासी होती. महाराष्ट्र कर्नाटकाच्या वेशीवरच आमचे गांव आहे. त्या गावात आमची देवदासी घराणी खूप आहेत. पाच वर्षांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला. माझ्यासाठी ती खूप महान होती. नकारात्मक परिस्थितीमध्ये तिने माझ्यासाठी सगळ्या देवदाशींशी आणि समाजाशी लढा दिला आणि मला बाहेर काढून शिक्षण दिले. आज तुझ्यासमोर उभे राहून माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझा स्विकार करशील का असे विचारण्याची हिम्मत ही माझ्या आईमुळेच होत आहे. अजय माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझे उत्तर पाहिजे आहे.”

अजय हादरला होता. अनपेक्षितपणे मी त्याच्यासमोर टाकलेल्या बॉम्बने तो बिथरला होता. तो फक्त माझ्याकडे  बघत होता. दोन मिनिट्स शांततेत गेली आणि अजय काही न बोलताच उठून निघायला लागला. 

” हे काय अजय. ” मी त्याच्या हाताला धरून त्याला परत बसविले. 

“अजय असं तू काही न बोलता जाऊ नकोस.  जे काही मनात असेल ते स्पष्ट सांग” माझ्या आवाजाचा स्तर बदलला होता. 

” अजय गेल्या वादविवाद स्पर्धेत तू मोठ्या रुबाबात ‘सामाजिक रूढी आणि बदल’ ह्या विषयावर तावातावाने मनापासून बोलला होतास ते सगळे खोट होते का ? आज जेंव्हा प्रत्यक्ष जीवनात निर्णय घ्यायची वेळ आली तर असा पळून का जातोयस. मला माहिती आहे तुलाही मी आवडते पण माझ्या घराण्याविषयी माझ्या आईविषयी सगळे ऐकल्यावर असा मागे का जातोस. माझ्या नशिबात माझ्या  आईचे प्रेम जास्त नव्हते. तुझ्या आईला माझी आई मानून तिच्या कुशीत विसावण्याची मी स्वप्न बघितली आहेत. अजय खरंच मी आपला संसार सुखाने करीन माझ्या प्रेमाचा स्विकार कर.” माझ्या मनातले कळवळीने मी अजयला सांगितले. 

अजय तसाच काहीतरी विचार करत एकटक माझ्याकडे बघत  होता. त्याच्या तोंडावाटे काहीच शब्द बाहेर पडत नसले तरी त्याच्या मनात खूप काही चालले आहे असे मला जाणवत होते. त्याला मी आवडत असले तरी माझे देवदासी घराणे त्याच्या घरच्यांना, त्याच्या आईला पटेल का असा कदाचित तो विचार करत असेल असे मला वाटत होते. त्याच्या मनातील द्वंद्व त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. परत अजय टेबलावरून उठला आणि जायला निघाला. माझ्या तोंडावाटे अचानक शब्द बाहेर पडले ” अजय, नको रे जाऊस मला सोडून ” अजय तसाच पुढे चालत राहिला. दहा पावले पुढे गेलेला अजय अचानक थांबला आणि मागे फिरून परत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ” आज पर्यंत मी तुला कधीच माझ्या घरच्या गोष्टींबद्दल बोललो नाही. माझ्या घरी माझी फक्त आई आहे. आज जो काही मी आहे, माझे विचार, माझे आचार हे सर्व तिने दिलेले आहेत. तिच्या शब्दाबाहेर मी नाही आणि म्हणूनच परवा लक्ष्मी पूजन आहे तेव्हा तू मला भेट, मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन आणि आईच्या समोर उभी करीन. तुम्ही दोघी जो निर्णय घ्याल त्याला माझा होकार असेल. ” 

क्रमशः….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments