श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ देवदासी लक्ष्मीपूजन …भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(तुम्ही दोघी जो निर्णय घ्याल त्याला माझा होकार असेल. ” ) इथून पुढे—-
दोन दिवस माझ्या मनात चलबिचल चालूच होती. जो निर्णय अजयने स्वतःने घ्यायला पाहिजे होता तो निर्णय त्याने त्याच्या आईवर का सोडला. त्याच्या आईने नाही सांगितले तरीही त्याचे माझ्यावर खरेच प्रेम असेल तर त्याने त्याच्या आईला समजावयाला पाहिजे. काळ बदलला आहे. काळानुसार जाती, रूढी ह्यांना मागे टाकत पुढे जायला पाहिजे असे त्याने आईला समजावून दिले पाहिजे.
तो दिवस उगवला. लक्ष्मीपूजनाचा दिवस. ठरल्याप्रमाणे अजय मला भेटला आणि त्याने मला त्याच्या घरी नेले. त्याच्याकडच्या चावीने त्याने दरवाजा उघडला आणि मला हॉल मधल्या सोफ्यावर बसवत म्हणाला “आई …. बघ कोण आली आहे. आई सखी आली आहे. बाहेर ये. “
त्याची आई आतल्या स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि मी बघतच राहिली……आता सावरण्याची वेळ माझी होती. त्याची आई येणार म्हणून मी उभी राहिलेली माझ्या नकळत मी परत सोफ्यावर बसली गेली——त्याची आई तृतीयपंथी होती.
—-” हो सखी. हीच माझी आई आहे. सखी मी अनाथ आहे. माझे खरे आई वडील कोण आहेत हे मला माहित नाहीत आणि त्यांचा शोध घ्यावा असेही मला वाटत नाही. लक्ष्मीआई हिनेच माझा लहानपणीपासून सांभाळ केला आहे. लहानाचे मोठे मला हिनेच वाढवले आहे. प्रत्येक वेळी स्वतःच्या आधी ती माझा विचार करते. माझ्या आयुष्याच्या लढाईत, माझ्या नशिबी बाबा नावाची तलवार आणि आई नावाची ढाल सोबत नव्हती पण आयुष्याच्या माझ्या प्रत्येक संघर्षात लक्ष्मीआई माझ्यासाठी ढाल तलवार बनून उभी राहिली. माझ्यावर चांगले विचार, आचार, संस्कार हे सगळे हिनेच केले आहे आणि जिला माझ्याशी नात जुळवायचे तिला माझ्यासकट माझ्या ह्या महान आईशीही नातं जुळवावे लागेल.”
आता अजयच्या आईने बोलायला सुरवात केली. ” ये सखी ये. अग अजय रोज माझ्याकडे तुझ्याबद्दल बोलत असतो. त्याचे तुझ्यावर प्रेम आहे पण मी ही अशी असल्याने तो तुझ्याशी त्याबद्दल बोलू शकत नाही. त्याला तुझ्या देवदासी घराण्याची माहिती आहे आणि त्याला त्याबद्दल काही तक्रारही नाही किंवा त्यात काही खटकण्यासारखे वाटत नाही. त्याला भीती वाटते ती तू आमच्या नात्याचा स्विकार करशील की नाही त्याची. त्यामुळे आता तुला निर्णय घ्यायचा आहे. तू घाई घाईत निर्णय न घेता सावकाश विचार करून निर्णय सांग.”
मी भानावर आले. दोन दिवसांपूर्वी जसा अजय गप्प होता तशी आता मी एकटक अजय कडे बघत गप्प बसली होते. अजय आणि लक्ष्मीआई दोघेही माझ्याकडे बघून माझ्या उत्तराची, काहीतरी बोलण्याची उत्कंठपणे वाट बघत होते. अचानक माझ्यातली देवदासी जागी झाली. मी उठली आणि चार पावले मागे गेली आणि त्या महान आईला जिने एका अनाथ मुलाचा नुसता सांभाळ न करता त्याला चांगल्या विचारांची बैठक बसवून दिली तिला माझ्या आईच्या जागी बघून, साष्टांग नमस्कार घातला. तिला माझी सासू असली तरी माझीही आई होण्याची विनंती करून तिला ह्या देवदासीला तुमच्यासारख्या देवीची दासी होण्याचा माझा मानस बोलून दाखवून मी आणि अजय तिच्या उबदार अशा मायेच्या कुशीत शिरलो.
नंतर अजयने त्याच्या दरवर्षीच्या प्रथेनुसार लक्ष्मीआईला एका टेबलावर बसवून तिचे पाय धुऊन यथासांग पूजा केली आणि आम्हां दोघांना लक्ष्मीआईनी आमच्या पुढील आयुष्यासाठी आशिर्वाद दिला.
——अजयच्या घरात आज खरोखरचे एक आगळे वेगळे असे लक्ष्मीपूजन झाले.
समाप्त
क्रमशः….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
अतिशय उत्कृष्ट रचना, अभिनंदन