श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-1 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली, म्हणून त्याने आपली मान वर केली. “अरे ही चप्पल शिवायची आहे ?” समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.
“तुम्ही गायकवाड सर ना?”
त्याने विचारलं.
“हो ! तू?”
“मी गजानन. गजानन लोखंडे. झेड.पी. च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे.”
“बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये !” गायकवाड सर त्याला निरखत म्हणाले.
“असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो, की तुमच्या लक्षात राहीन !”
“पण तू हा व्यवसाय का…..?”
“सर हा आमचा पिढीजात व्यवसाय! आजोबा, वडील दोघंही हेच करायचे. दहावी सुटलो, तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय.”
“काय झालं वडिलांना?
“सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात.”
“ओह! आणि तुझे भाऊ?”
“दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत. शिकताहेत. आई अशिक्षित.”
“अच्छा” गायकवाड सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही, त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.
काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले “अरे माझ्या मापाचा एक बूट तयार करुन देशील?”
गजू तयार झाला. त्याने माप घेऊन दोन दिवसात बूट तयार करुन दिला. सरांना तो आवडला. त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले. गजूला खूप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.
आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. सगळे गायकवाड सरांनी पाठवलंय असं सांगायचे.
काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले, “गजू तुझ्या हातात कला आहे. तू असं का करत नाहीस, इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपला बूट ठेवले तर गिऱ्हाईकाला थांबावं लागणार नाही.”
” सर कल्पना चांगली आहे, पण त्याला दहा पंधरा हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ!”
“हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे. चालेल?”
गजू तयार झाला. आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहिली. महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. गायकवाडसर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले. त्यांनी ते त्याला परत केले.
“मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती. सहा महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर.”
गजूचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला.
सहा महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.
“सर खूप चांगलं चाललंय. पण आता पुढं काय करायचं ?”
“गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि हो! स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. एम.आय.डी.सी. मध्ये फँक्टरी टाकून दे!!”
“काय? फॅक्टरी ?” गजू थरारला. “सर मला जमेल का?”
“सगळं जमेल. मी आहे ना !” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.
क्रमशः ….
– अज्ञात
संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈