श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ जीवनरंग ☆ कर्तव्य – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
(“सगळं जमेल. मी आहे ना !” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.) इथून पुढे —–
“सर खूप करताय माझ्यासाठी”—
“अरे ते माझं कर्तव्यच आहे !” त्याला उठवत ते म्हणाले. ” माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत. तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?” गजूच्या डोळ्यात पाणी आलं.
दोन वर्षात गजू खुप पुढे गेला. फॅक्टरी वाढली. एकाची तीन दुकानं झाली. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के. फ्लॅटमध्ये रहायला गेला. भाऊ बहिणी चांगल्या शाळा काँलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो गायकवाड सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली.
इकडे गायकवाड सरांना निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. सर आता थकले होते. त्यांच्या मुलाने इंग्लंडमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.
एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांचा मुलगा, मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत. ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच, शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.
सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला, पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं, आणि ते गजूला बघवत नव्हतं, पण त्याचाही नाईलाज होता…
एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.
” सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत. आज मला अजून एक मदत कराल.?”
“अरे आता तुला मदतीची काय गरज? तू आता खुप मोठा झाला आहेस . बरं ठीक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे?”
“सर माझे वडील व्हाल?”
सर स्तब्ध झाले. मग म्हणाले, “अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय !”
“तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे !” गजू हात जोडत म्हणाला.
“अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?”
“सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की! “
“बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.”
“मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच. सर तो सारासार विचार करुनच मी आलोय !”
सर विचारात पडले. मग म्हणाले, “ठीक आहे, येतो मी. पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही.”
“मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो, तुम्हालाही तेच म्हणेन !”
सर मोकळेपणाने हसले.
“अजून एक अट, तुझ्यासारखे अनेक गजू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची !”
गजूला गहिवरुन आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते…
समाप्त
(सत्य घटनेवर आधारित—-शिक्षक हा असा असतो, आणि असाच असायला हवा.)
– अज्ञात
संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈