सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ ऋण….भाग 2 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

(‘अरे आप्पाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छापत्र आहे हे..आरती नावाच्या…’) इथून पुढे —-

आप्पा विचारात पडले. पस्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकीर्दीत, आरती नावाच्या अनेक मुली त्यांच्या विद्यार्थिनी होत्या.  तीन चार विद्यार्थिनी त्यांना आठवतही होत्या.  पण ‘ही’ त्यातली नक्की कोण हे त्यांना लक्षात येत नव्हते. 

‘ते बघ आत एक चिठ्ठी देखील आहे ती वाच..’ 

आतून एक छान गुळगुळीत पण उच्च प्रतीच्या स्टेशनरीचा कागद बाहेर आला व त्यावर सुवाच्य अक्षरात एक पत्र लिहिले होते. आश्रमात ‘पत्र वाचन’ हा बापू देशपांडेंचा प्रांत.

आप्पांनी त्यांच्याकडे ते पत्र वाचायला दिले. 

बापू देशपांड्यांनी आपल्या खणखणीत आवाजात पत्र वाचायला सुरु केले..

‘प्रिय सर,

मी तुमची विद्यार्थिनी आरती देसाई. 

मला ठाउक नाही की तुम्हाला मी पटकन चेह-यानिशी आठवेन की नाही. कारण ‘देसाई बाल अनाथ आश्रमा’ त वाढलेल्या माझ्यासारख्या  बहुतेक मुला मुलींची आडनावे ही देसाईच असायची व अशी बरीच मुले मुली आपल्या शाळेत होती. तुमच्या हातून कुठल्या न कुठल्या इयत्तेत इंग्रजी शिकला नाही असा एकही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून बाहेर पडला नसेल. त्यातली एक भाग्यवान विद्यार्थिनी मीही होते. 

सर, आम्ही अनाथालयात राहणारी मुले. इतर मुलांसारखे मधल्या सुट्टीत डबे नसायचे आम्हाला. मला अजूनही आठवतं..वर्गातल्या प्रत्येक देसाई आडनावाच्या मुला मुलीला तुम्ही रोज मधल्या सुट्टीत पाच रुपये द्यायचात. खरे तर आम्हीच मिळून तुमच्याकडे यायचो व ते तुमच्याकडून हक्काने घ्यायचो. आपल्याच गुरूकडून पैसे मागायला भीड नाही वाटायची तेव्हा आम्हाला. त्यात तुम्ही आम्हाला जवळचे वाटायचात. 

तुम्ही दिलेल्या त्या पैशातून आम्ही ‘देसाई मुले मुली’ मिळून कधी चिरमुरे, कधी बिस्कीटे, कधी भडंग पाकीट असे काही एकत्र घेउन खायचो. बिकट परिस्थितीला एकत्र लढण्याची ताकत व हिंमत, दोन्ही, तुम्ही आम्हा मुलांना त्या न कळत्या वयात दिलीत. तुमच्यामुळेच आज ही मुले कुठे ना कुठे सुव्यवस्थित पोझिशनवर कार्यरत आहेत.

मला तुम्ही मी आठवीत असताना  शिकवलेली ती कविता,  जशी तुम्ही शिकवली, तशीच अजूनही आठवते

‘The Woods are lovely dark and deep

But I have promises to keep 

And miles to go before I sleep..’

या कवितेतून तुम्ही दिलेली प्रेरणा मला आजन्म पुरणारी होती..आहे. मी आता गेल्यावर्षी  IAS ची परिक्षा उत्तीर्ण होउन दिल्ली मधे अर्थखात्यात Planning Department मधे Assistant Secretary या पदावर गेल्या सहा महिन्यांपासून रुजु झाली आहे. इथे आल्यापासून मी तुमचा शोध सुरु केला व मला काही जुन्या मित्रांकरवी ही माहिती मिळाली की तुम्ही..’इथे’ आहात. 

सर, मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या बाबांच्या जागी असलेल्या माझ्या सरांना आज वृद्धाश्रमात रहावे लागत आहे, ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही.  या लिफाफ्यात एक विमानाचे तिकीट पाठवत आहे. तुम्ही दिल्लीला माझ्याकडे, आपल्या मुलीकडे या, हवे तितके दिवस, महिने माझ्याबरोबर रहा. कायमचे राहिलात तर सर्वात भाग्यवान मुलगी मी असेन..

असे समजू नका की मी तुमचे ऋण फेडत आहे. कारण मला कायम तुमच्या ऋणातच रहायचे आहे…

खाली माझा ऑफीस व मोबाइल दोन्ही नंबर आहेत.

मला फोन करा सर..

वाट बघते आहे..

याल ना सर………बाबा…?

तुमचीच, 

– आरती देसाई

पत्र वाचताना नानांचा आवाज कधी नव्हे ते कापरा झाला..

त्यांनी आप्पांकडे पाहिले..

आप्पा ते पाकीट छातीशी धरून रडत होते…

शेवटी एवढेच म्हणेन  

माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला

            दुःख किती आहे.

संस्कार सांगतात कुटुंब कसे आहे.

    गर्व सांगतो पैसा किती आहे.

   भाषा सांगते माणूस कसा आहे.

 ठोकर सांगते लक्ष किती आहे.

    आणि सर्वात महत्त्वाचे —

वेळ सांगते नाते कसे आहे..!

समाप्त 

प्रस्तुती : संग्रहिका अंजली गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments