सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(मागील भागात….तशी अवती भवती मुलं होती पण एका रेषेच्या पलीकडे त्या दोघांना फक्त एकमेकांची सोबत होती..)
आक्का सकाळी घरी आल्या की सूनबाई आक्कांना विचारी..
“कसे आहेत नाना? रात्री झोप लागली का?”
“कसली झोप..? स्वत:ला झोप नाही, दुसर्यालाही झोपू देत नाहीत. डोक्यात विचारांचं नुसतं पोळं. मी म्हणते आजारी माणसाने विचारच कशाला करायचा? शांत पडून रहावं. अर्ध्या रात्री ऊठून म्हणतात, आज तू मला पेपर नाही वाचून दाखवलास… आता तरी काही वाचून दाखव…”
“मग..?”
“मग काय? उठले. दिवा लावला. आणि घेतला पेपर हातात.. वाचायला त्यांनीच शिकवलंना… आता अक्षर लागत नाहीत मला. पण त्यांच्यापुढे जायची सवय कुठे आहे… आयुष्यभर ऐकतच आले…..”
सुनेला हंसुही यायचं. आणि “कमाल आहे नानांची ” असंही वाटायचं. आक्कांची पण दया यायची… “आणि तुम्ही बायका.. नवर्याला पाण्याचा पेलाही देत नाही… भाऊ माझा तर सारं हातानं करतो.. वाढून घेण्यापासून ते ताट उचलण्यापर्यंत… तू घरी आलीस कधी त्याच्यानंतर तर चहाही तयार ठेवतो… मी म्हटलं त्याला “अरे मी टाकते की चहा.? तर म्हणाला, “पडली आहेस जरा, तर कर आराम…”
सुनेला वाटलं, म्हणावं, “नवर्याला हातात पाण्याचा पेला दिला म्हणजेच गृहिणीधर्म झाला का? आर्थिक, बौद्धिक मानसिकतेचा जो वाटा उचलला आहे त्याला काहीच किंमत नाही का? हे अंतर तुटणार नाही. काही बोलण्याआधी सुनेचा सुशिक्षितपणा आणि संस्कृती आड यायची. शिवाय ती आक्कांचं मन जाणत होती. अनेक वर्षं दडपलेल्या वाफा, त्यांचे फडाफड बोलणे हे सुनेसाठी नसेलही. हरवलेल्या अनेक क्षणांची खंत असेल ती…
जे मिळवण्यासाठी मनानं आतल्या आत धडपड केली असेल, तिथपर्यंत काळानने पोहोचू दिलं नसेल म्हणूनही आक्कांची तगमग असेल.
आक्कांचं बोलणं कडवट. विखारी. पण का कोण जाणे सुनेला राग यायचाच नाही. तिला आक्का एकदम लहान मुलासारख्या वाटायच्या. प्रवाहात पडलेल्या आणि पोहता येत नसलेल्या बालकासारख्या.
तिला वाटायचं, त्यांना या लाटेतून बाहेर काढावं. त्यांच्या पाठीवर हात फिरवावा. त्यांना आधार द्यावा.
आणि नेमकं, सुनेच्या या वागण्यापायीच आक्का चकित व्हायच्या. त्यांना वाटायचं, ही रागवेल, त्रागा करेल, भांडेल, भाऊला सांगेल.
त्यांना त्यांच्या एकत्र कुटुंबातील भांडणे आठवायची.वरवर गोडवा पण आतून नासलेली मनं. मग क्षुल्लक कारणावरून स्फोट व्हायचा. कधी कामांच्या पाळ्यावरून. कधी धान्य निवडण्यावरुन. मुलांवरुन. कपडे दागिने … एक ना अनेक. किती वेळा वाटायचं, पिशवीत कपडे भरावेत आणि माहेरी जावं… आता यांचे नवे संसार!!
चौकटीतले, आखीव. आपल्याला इतकी मूलं झाली.. त्यांची आजारपणं… गोंवर कांजीण्या वांत्या.. मांडीवर मुलं आणि परातीत एव्हढा मोठा कणकेचा गोळा!! कुणी शाळेत गेलं, कुणी अभ्यास केला,किती मार्क्स मिळाले, पुढे जाऊन कोण काय करणार… कसलं काय? कामाचाच रगाडा.. सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते शेवटच्या किरणापर्यंत दिवस ढकलायचा. जो ज्या मार्गाने जाईल ते ठीकच.. त्याचं खाणं पिणं सांभाळायचं. बाकी भविष्य घडवण्यासाठी निराळं काही करावं लागतं याची ना कधी भावना झाली ना कधी तसे विचार मनात आले…
सूनबाई तीन तीन तास मुलांचे अभ्यास घेते. एकेक गोष्ट समजेपर्यंत शिकवत राहते.. हीला कंटाळा कसा येत नाही? मग त्या म्हणायच्या, मुलीच तर आहेत!!काय करणार आहेस एव्हढं शिकवून.. एखादा मुलगा तरी होऊ द्यायचा.. दोनच आहेत म्हणून जमतंय्. आम्ही आठआठ मुलं वाढवली. इतका वेळच कुठे होता…??
सुनही गंमतीत म्हणायची,”खरंच आक्का कशी वाढवलीत हो तुम्ही इतकी मुलं… आम्हाला दोनच भारी वाटतात..”
कुठेतरी आक्कांना लगेच श्रेष्ठत्व प्राप्त व्हायचं..
“आणि काय सांगू? तुझ्या सासर्यांना घरात कुणी आजारी पडलेलं ही चालायचं नाही मुलांची दुखणी असायचीच. पण नानांनी कधी कुणाला सांभाळलं नाही. ते त्यांच्याच व्यापात.. मी आजारी पडलेलं तर त्यांना चालायचंच नाही. कधी कणकण वाटायची. डोक्याला घ ट्ट रुमाल गुंडाळून झोपू वाटायचं.. पण नानांना चालायचं नाही.म्हणायचे,
“असे अवेळी झोपायला काय झाले? घरात प्रसन्न चेहर्यांनी वावरावं.. औषधं, डाॅक्टर लागले कशाला..?”
आणि आता बघ, स्वत:साठी किती डॉक्टर. ही एव्हढी कागदांची आणि फोटोंची भेंडोळी झाली आहेत!! आणि त्या औषधाच्या बाटल्या तरी किती.. खरं सांगू ,ऊभ्या आयुष्यात मला दुखणं कधी माहीत नाही… एव्हढी बाळंतपणं झाली पण मी कशी धडधाकट….”
आक्कांच्या बोलण्याला किनाराच नसायचा.. नानांवर सतत राग. त्यांचं बोलणं ऐकलं की वाटायचं की आक्कांच्या आयुष्यांत वजाबाक्याच फार.
पण कधी नाना जेवले नाहीत तर स्वत: लसणीची खमंग फोडणी देऊन मुगाच्या डाळीची नरम खिचडी, कोकमचा सार बनवून दवाखान्यात डबा घेऊन जायच्या…
एक दिवस म्हणाल्या… “कारलं केलस का तू आज… घरी कारल्याच्या भाजीला हातही लावत नाही…”
“मग? काहीच खाल्लं नाही का त्यांनी?..”
“कशाला? चाटुन पुसून खाल्लं. तुझ्या हातचं कार्लंही कडु लागलं नाही..”
आक्कांच्या बोलण्याचा बोध होणंच कठीण… त्यांच्या मनस्थितीचा हा गोंधळ उलगडत नसे कधीकधी….
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈