सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ एका रेषेच्या पलिकडे..भाग 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
सकाळी घरी आल्यापासून आक्का कधी नव्हे त्या शांत होत्या. चहा नाश्ता नकोच म्हणाल्या. आंघोळ करुन रोजच्याप्रमाणे मंदीरातही गेल्या नाहीत. घरातच खिडकीजवळ बसून होत्या.
खिडकीच्या एका कोपर्यात चिमणी ये जा करत होती. चोचीत बारीक बारीक काड्या घेऊन येत होती.घरटं बांधत होती.
एरव्ही आक्का म्हणाल्या असत्या “काय कचरा करुन ठेवलाय…
या चिमण्यांनी..”पण या क्षणी मात्र त्या घरट्याकडे एकटक पाहत होत्या..
सुनबाईला थोडं विचीत्र वाटलं. त्यांच्या कडवट बोलण्यानं ती दुखावयाची पण आक्कांचं शांत बसणंही तिला मानवत नव्हतं…
“आक्का नाना बरे आहेत ना?”
“छाssन आहेत…”
“तुम्हाला बरं नाही का..?”
“मला काय झालंय्… चांगली आहे मी..?”
संवाद लांबतच नव्हता…
“तुम्ही गावी जाऊन येणार होतात ना…?”
“कां ग बाई कंटाळा आला का तुला सासुचा? तुम्हाला स्वातंत्त्र्य हवं… चार माणसं आलेली खपायची नाहीत.. आणि आम्ही का नेहमी येतो? आता देवानंच हा प्रसंग आणलाय् .. कोण काय करणार…?”
आक्का आता ठीक रेषेवर आल्या.
“कांग सुनबाई .. नाना आता असेच राहणार का? काल विठाबाई आल्या होत्या. त्यांच्या नात्यांतले कुणी, गेली तीन वर्ष झोपूनच आहेत म्हणे… हळुहळु त्यांचे एकेक अवयव निकामी होणार म्हणे…
असं काही ऐकलं की जीव ऊडुन जातो माझा.. भीती वाटते.
अग! सगळं आयुष्य रगाड्यात गेलं. एकीकडे मी. एकीकडे नाना..
मुलं आठ झाली पण संसार झाला असं वाटलंच नाही. पण आता संसार सुरु होतोय् असं वाटत असतानाच वाट संपून जाणार का..? अजुन गंगोत्री जम्नोत्री राहिलं आहे… नानांनी मला वचन दिलंय्.. पण ते असेच राहिले तर…?
“आक्का मी नेईन तुम्हाला…आपण जाऊ. आणि नाना बरे होणारच आहेत…”
आक्कांनी सुनेकडे एकवार पाहिलं. त्यांचे डोळे भरुन आले.
त्यांनी सुनेला जवळ घेतले. अन् त्यांच्या डोळ्यांतली नदी भळभळ वाहू लागली. सुनबाई त्यांच्या विरळ केसातून हात फिरवत राहिली..
नानांच्या दुखण्यापायी आक्का सैरभैर झाल्या होत्या. त्यांच्या कणखरपणाला टक्कर देताना त्या घायकुतीस आल्या होत्या.
मनांत एक सुंदर रांगोळी रेखाटली होती. ती विस्कटण्याची त्यांना भीती वाटत होती…
नानांना म्हणावा तसा आराम पडला नव्हता.. कुठेतरी त्यांची इच्छाशक्तीच कमी पडत होती..
पण आज सुनेनं काहीतरी वेगळंच ठरवलं होतं..
“हे बघा आक्का ,आज मला थोडा वेळ आहे. आपण पिक्चर बघायला जाऊ..मराठी चित्रपट आहे. मी नानांना सांगीतलंय् ते हो म्हणालेत…”
संध्याकाळ चांगली गेली. पिक्चरही छान होतं. आक्का मनमुराद हसल्या. अवतीभवती माणसं आहेत हेही त्या विसरल्या.मध्यंतरात आईसक्रीम घेतलं. पिक्चर सुटल्यावर मोगर्याचे गजरेही घेतले.. ताजे सुवासिक..
संध्याकाळ गडद झाली. आकाश जांभळटलं. वारं सुटलं आक्का कासावीस झाल्या…
“चल सुनबाई.. ऊशीर झाला. नाना वाट पहात असतील.
मुलं असतील जवळ. पण त्यांना मनातलं सांगणार नाहीत..
मीच लागते त्यांना.. नानांनी चहासुद्धा घेतला नसेल… उगीच गेलो आपण… आता अपराधी वाटतंय्…”
सुनबाईंला रात्री आवरुन झोपताना वाटलं, आक्का कशा आहेत? रागीट की प्रेमळ..
कठोर की हळुवार..
आक्कांनी नानांच्या अंगावर शाल पांघरली असेल..
नाना विचारतील”बरा होईन ना मी?”
आक्का म्हणतील,
“मग.. चांगले बरे होणार तुम्ही. काहीही झालेलं नाही तुम्हाला..
अजुन तर कितीतरी वाट उरलीय आपल्या दोघांची… काही कण घट्ट मुठीत जपलेत…ते कसे घरंगळतील…..??
समाप्त
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈