श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ साप…. भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
`रमलू…ए रमलू… ऊठ. वाड्यातून मुकादम बोलवायला आलाय.
`झोपू दे ना आई! आज माझा सुट्टीचा दिवस आहे. सांग त्या मुकादमाला.’
`अरे, तो म्हणतोय, वाड्यात साप निघालाय. म्हणून शेठजींनी तुला बोलावलय. जा. मुकादमाच्या सायकलवर बसून जा.’
`आज मी मुळीच जाणार नाही आई! काही का होईना तिकडे. यांना आम्ही आमचा देव समजतो. पण या लोकांच्या दृष्टीने आमची किंमत कौडीची. नोकरच आम्ही फक्त. साप निघू दे, नाही तर आग लागू दे! आम्हाला काय त्याचं? रमलू उठून खाटल्यावर बसला. तो पुढेही भुणभुणत राहिला. `त्यांच्याकडे नोकरी करायला लागून दोन वर्षं झाली. आधी म्हणाले, ऑफीसमध्ये काम करावं लागेल. पण आता शेतात-मळ्यात मजूरी, ट्रॅक्टरवर हमाली, त्यांच्या मुला-बाळांचं हागणं-मुतणं सगळं करवून घेतात. बारा तास करा… नाही तर वीस तास करा. कधी पाच रुपये स्वतंत्र फेकणार नाहीत. ते तर झालंच, यांची सायकल पंक्चर झाली तरी पंक्चर दुरुस्तीचे पैसे पगारातून कापून घेणार. मोठे शेठ म्हणवतात स्साले….!
`असं नाही बोलायचं बेटा, कसं का असेना, ते आपले अन्नदाते आहेत. जा. मुकादम उभा आहे बाहेर.’
`आई, मी काल तुला सांगितलं नाही? काल पाच हजार रुपये मागितले होते. आपल्या मुनियाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी. मुनीम, शेठजी, मोठ्या सूनबाई, धाकट्या सुनबाई सगळ्यांची विनवणी केली. गयावया केलं. पायसुद्धा धरले. पण सगळ्यांनी तोंड फिरवलं. पैसे मागितले, तेसुद्धा दान म्हणून नाही. अॅडव्हान्स म्हणून. मी म्हंटलंसुद्धा… दर महिन्याच्या पगारातून पाचशे रुपये कापून घ्या, पण कुणाला पाझर फुटला नाही.’
`अरे, मोठ्या शेठजींना सांगायचंस ना! ते तुझ्या वडलांपासून आपल्याला ओळखतात.’
`त्या मुठल्ल्यालासुद्धा सांगितलं. काय म्हणाला माहीत आहे? ‘
`काय? ‘
`म्हणाला उगीचच पैसे फुकट घालवता तुम्ही लोक. म्युन्सिपालटीच्या शाळेत का प्रवेश घेत नाही? तुम्हा लोकांसाठी ती शाळाच ठीक आहे. ‘
`अरे बेटा, एकदा नाही म्हंटलं, म्हणजे प्रत्येक वेळी नाहीच म्हणतील, असं थोडंच आहे? त्यांचीही काही अडचण असेल. तुझे बाबा गेल्यानंतर त्यांनी तुला नोकरी दिली नसती, तर आज आपण कुठे असतो? आज त्यांच्यावर संकट आलय, आणि आपण घरात झोपून राहतो, हे काही ठीक नाही.’
एवढ्यात झोपडीसमोर एक मोटरसायकल उभी राहिली. त्यावरून मुनीम आले होते.
`चल बेटा रमलू, वाड्यावर भयंकर गोंधळ माजलाय!’
`पण मुनीमजी, मी येऊन काय करू? मला साप पकडता येत नाही.’
एव्हाना रमलू चुळा भरून उपरण्याला तोंड पुसत बाहेर आला होता.
`तुझे वडील साप पकडायचे. त्यांचा कुणी साथीदार असेल, तर त्याला घेऊन जाऊयात. शेठजींनी त्यासाठी मोटरसायकल पाठवलीय.’
`अरे, ते रम्मैया चाचा असतील. तुझ्या बाबांबरोबर ते पण साप पकडायला जायचे.’
मुनीम आणि रमलू रम्मैयाचाचाकडे गेले, पण तिथे कळलं, ते आपल्या मुलाकडे पुण्याला शिफ्ट झाले आहेत.
रमलू मुनीमजींबरोबर वाड्यावर पोचला. शेठ-शेठाणी आणि घरातील इतर सगळे सत्रा-अठरा लोक अंगणात, कुणा संकटमोचकाची प्रतीक्षा करत उभे होते. मुकादम वाड्यावर आधीच पोचला होता. त्याने रमलूचा हात धरला आणि ज्या खोलीत साप होता, तिथे त्याला ताबडतोब घेऊन गेले. खोलीच्या दरवाज्याशी डावी-उजवीकडे दोन नोकर हातात लाठी घेऊन उभे होते. त्यापैकी एक जण म्हणाला, `सहा-आठ फुटापेक्षा कमी नाहीये! सगळ्यात आधी मोठ्या सूनबार्इंना दिवाणखान्यात दिसला. त्या ओरडल्या. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत कोठीच्या खोलीतून इथे रश्मीतार्इंच्या खोलीत पोचला.’
`वाटतय, अस्सल नाग आहे.’ दुसरा नोकरम्हणाला.
`नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली.
भाग 1 समाप्त
मूळ हिंदी कथा – साप मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈