श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ बा.द.सातोस्कर….भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिलं,- त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत,
‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।
क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।। आता इथून पुढे – )
पुढे पुढे पुण्याला त्यांच्या मुलीकडे वृंदाकडे जाताना ते आमच्याकडे थांबत आणि मग पुढे पुण्याला जात. आमचा हा थांबा त्यांच्यासाठी फक्त एक-दोन दिवसांचा असे. पण तेवढ्या वेळात वाङ्मय क्षेत्रातील काही घडामोडी, त्यांचे काही नवीन संकल्प, प्रसिद्ध झालेले नवीन पुस्तक असं खूप काही कळत असे.
दादांना दोन मुली आणि एक मुलगा होता. आणि साहित्याच्या रेशमी धाग्याने जोडलेल्या आम्ही दोघी मुली —माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर, लतावर त्यांचा स्वतःच्या मुली असल्यासारखाच लोभ जडला होता. दादांनी म्हणजे बा.द.सातोस्करांनी आपल्या ९१ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात काय काय आणि किती किती केलं, हे सांगायचं तर एक ग्रंथच होईल. ते ग्रंथपाल होते. प्रकाशक होते. लेखक होते, संपादक, संशोधक होते आणि गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्तेही होते. गोवा मुक्ति लढा धगधगता ठेवण्यासाठी त्यांनी सन ५४ ते ६२ ‘दूधसागर हे पाक्षिक चालवले होते. गोवा मुक्त झाल्यावर त्यांना दैनिक गोमंतक वृत्तपत्राचे संपादन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी ती जबाबदारी ५ वर्षे सांभाळली आणि नंतर या जबाबदारीतून मुक्त झाले.
दादा सातोस्कर साधारणपणे १९३२-३४च्या दरम्यान मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात काम करत होते. तिथल्या अनुभवाच्या जोरावर, पुस्तकांचे शास्त्रशुद्ध व निर्दोष वर्गीकरण कसे करावे, हे शिकवणारी द्विबिंदू वर्गीकरण पद्धत त्यांनी शोधून काढली आणि त्यावर पुस्तकही लिहिले.
ते ग्रंथवेडे होते. त्यांनी ग्रंथ वाचले. ग्रंथांवर प्रेम केले. ग्रंथ लिहिले. ग्रंथप्रेमातून ग्रंथरक्षणाच्या म्हणजेच ग्रंथपालनाच्या शास्त्राकडे वळले. त्यावर पुस्तक लिहिले. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळही त्यांनी सुरू केली. उत्कृष्ट प्रकाशक हा ग्रंथवेडा असतो- नव्हे असायलाच हवा, असं ते बोलून दाखवत.
१९३४ साली दादा मुंबईत असताना, लक्ष्मणराव सरदेसाईंचे ‘ कल्पवृक्षाच्या छायेत ‘ आणि जयंतराव सरदेसाईंचे ‘ सुखाचे दिवस ’ ही पुस्तके विक्रीची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्याचवेळी त्यांच्या मनात आले, पुस्तकाशी संबधित असा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करावा. १९३५मध्ये बा.द. सातोस्कर पदवीधर झाले. त्या काळात त्यांना कितीतरी चांगल्या नोकर्या मिळाल्या असत्या. पण साहित्य प्रेमाने, त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आणि ‘ सागर साहित्य प्रकाशन ‘ ही प्रकाशन संस्था काढली. १९३५ ते १९८५ या ५० वर्षांच्या काळात त्यांनी हा प्रकाशन व्यवसाय अव्याहतपणे, उत्साहाने व आनंदाने केला. मराठी प्रकाशक परिषदेच्या पहिल्या संमेलन प्रसंगी, जुन्यातला जुना प्रकाशक म्हणून त्यांचा सत्कार झाला होता, तर ५व्या संमेलन प्रसंगी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
सातोस्करांनी प्रकाशनासाठी पुस्तक निवडताना प्रथितयशांच्या पुस्तकांबरोबरच नवोदितांची पुस्तके काढून त्यांना प्रोत्साहन दिले. सुजाण वाचकांकडून दर्जेदार पुस्तक काढले, अशी वाहवा मिळवून घेण्यापेक्षा, अधिकाधिक लोकांपर्यंत आपले पुस्तक पोचले पाहिजे, अधिकाधिक लोकांनी ते वाचले पाहिजे आणि अधिकाधिक लोकांना ते कळले व आवडले पाहिजे, असा त्यांचा दृष्टीकोन होता. म्हणूनच पुस्तकाची निवड करताना त्यांनी ‘क्लास’चा विचार न करता ‘मास’चा विचार केला. प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी दोन-तीन वर्षात स्वत:चा प्रेस घेतला. पुढे १९४३च्या दरम्यान कबूल केलेल्या लेखकांनी वेळेवर पुस्तके आणून दिली नाहीत, तेव्हा प्रेसला काम पाहिजे, म्हणून त्यांनी स्वत:च पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी पर्ल बकच्या ‘मदर’ कादंबरीचा ‘आई’ असा अनुवाद केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ‘द गुड अर्थ ‘ चा ‘धरित्री असा अनुवाद प्रसिद्ध केला. प्रकाशक सातोस्कर असे लेखक सातोस्कर झाले. त्यानंतर त्यांनी ‘जाई‘ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग ‘ मेनका ‘ लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या अशा अनेक कादंबर्या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.
क्रमश: ….
©️ श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈