सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ एकुलती -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
पूर्वार्ध :हॉस्पिटलमधून बाबांना केतकीच्या घरी न्यायचं ठरलं. आता पुढे…..)
कार्तिक -केतकी कामापुरतंच बोलत होती. पण या आजारपणाच्या व्यापामुळे कोणाच्या ते लक्षातही आलं नाही.
गेस्टरूममध्ये बाबा आणि त्यांचा रात्रीचा अटेंडंट निळू झोपत असल्यामुळे आई केतकीबरोबर बेडरूममध्ये झोपत होती आणि कार्तिक हॉलमध्ये सोफा-कम-बेडवर.
आई मधूनमधून म्हणायची, “मी हॉलमध्ये झोपते ” म्हणून.पण कार्तिक -केतकी दोघंही घायकुतीला आल्यासारखे एकसुरात “नको, नको “म्हणून ओरडायचे.
वीकएंडला बराच वेळ तो घराबाहेरच असायचा. घरात असला, तर लॅपटॉप उघडून बसायचा.
आईचं चाललेलं असायचं,”अगं,जरा त्याच्याकडे बघ.थोडा वेळ त्याच्याबरोबर घालव.”
एकदा तर चक्क त्याच्यासमोरच म्हणाली, ” बाबा बरे आहेत. काशिनाथ आहे सोबतीला. तुम्ही दोघं बाहेर जा कुठेतरी. फिरायला, सिनेमाला.” केतकीला ‘नाही’ म्हणायला संधीच नाही मिळाली.
घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत दोघात चकार शब्दाची देवघेव झाली नाही.
केतकीला आठवलं, लग्नापूर्वी आणि नंतरही सुरुवातीच्या काळात केतकीची अखंड बडबड चालायची. कार्तिक कौतुकाने ऐकत असायचा. तिचा प्रत्येक शब्द झेलायचा तो तेव्हा.
मग शनिवारी-रविवारी दोघांनी बाहेर पडायचं, हा नियमच करून टाकला आईने.
यावेळी लॉन्ग ड्राइव्हला मुंबईबाहेर पडायचं, ठरवलं कार्तिकने. तसा ट्रॅफिक खूप होता, पण फारसं कुठे अडकायला झालं नाही.
एका छानशा रिझॉर्टच्या रेस्टॉरंटसमोर त्याने गाडी थांबवली.
‘अरेच्चा!बॅग गाडीत ठेवायची राहिली. आता वॉशरूममध्ये हूक असला म्हणजे मिळवली,’ केतकीच्या मनात आलं. पण कार्तिकने हात पुढे केला. तिने गुपचूप बॅग त्याच्याकडे दिली.
कोपऱ्यातल्या टेबलवर कार्तिक बसला होता. ती येताच तो उठून फ्रेश व्हायला गेला.
वेटर डिशेस घेऊन आला. तिच्या आवडीचा मेन्यू होता.
ही त्याची चाल नाहीय ना? ‘सावध, केतकी, सावध,’ तिने स्वतःला रेड ऍलर्ट दिला.
खायला सुरुवात केल्यावर तिच्या लक्षात आलं, की तिला खरोखरच खूप भूक लागली होती.
थोडंसं खाऊन झाल्यावर कार्तिकने अचानकच विचारलं, “भेटला कोणी? “
“म्हणजे?” त्याला काय विचारायचंय, हेच तिला कळलं नाही.
“म्हणजे आपला डिव्होर्स झाल्यानंतर ज्याच्याशी तू लग्न करशील, असा कोणी भेटला का?”
क्रमश:….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈