जीवनरंग
☆ एक ‘सोल’ कथा ☆ श्री विनय माधव गोखले ☆
तर मंडळी, मौजेची घटना अशी घडली की ‘त्रिवेणी’ आश्रमाच्या कार्यालयापाशी पोहोचताच लक्षात आले की माझ्या उजव्या बुटाचा सोल (sole) पुढून निघून लोंबायला लागलाय. सकाळपासून आळंदी मंदिर, ‘ज्ञानेश्वरी’ मिसळ मध्ये ब्रेकफास्ट घेईपर्यंत व्यवस्थित वागणार्या सोलने ऐनवेळी समारंभाच्या सुरुवाती- सुरुवातीलाच मान टाकलेली पाहून माझ्या soul मध्ये धस्स! झाले.
पुढील दोन तास तरी सोलने तग धरावे, अशी मनोमन प्रार्थना करीत मी पुढे निघालो. आणखी दहा पावले पुढे जातो न जातो तोच “घडू नये तेच घडले” आणि सोल बुटापासून तुटून चक्क बाजूला पडला. मी तळपाय तिरपा करून पाहिला असता माझा साॅक थेट दृष्टीस पडल्यावर तर मला ब्रह्मांडच आठवले. आली का आता पंचाईत!
मग अजयचा मित्रत्वाचा सल्ला मानून तो सोल तिथेच बाजूच्या एका वाफ्यामध्ये ठेवून दिला, परत येताना घेऊयात ह्या विचाराने. तिथली एक सफाई कामगार स्त्री काम थांबवून माझ्या सर्व हालचाली टिपत उभी होती. माझी अवस्था पाहून तिने पदर डोळ्यांना लावण्याऐवजी नाकाला लावलेला माझ्या नजरेतून सुटले नाही. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा!
तिच्याकडे पाठ करून मी येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या निर्धाराने, जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात चालत पुढे निघालो. माझ्या आजूबाजूने नवनवीन चपला आणि बूट घातलेली लोक घाईघाईने लग्नमंडपाकडे निघाली होती. मी मात्र साॅकला बोचणारे दगड, फरश्यांमधील फटींचा स्पर्श आदींचा ‘उजव्या’ पदोपदी अनुभव घेत हळूहळू मार्गक्रमणा करीत होतो. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी चप्पल स्टँडवर बूट-चपला काढायच्या होत्या ते पाहून मात्र माझ्या बुटात नव्हे पण जिवात soul आला!
पुढे सर्वत्र मी ‘पांढर्या पायाने’ नव्हे पण ‘सावळ्या पायाने’ तसाच अनवाणी फिरत राहिलो…डायनिंग हाॅलच्या बाहेरील लाॅन, रेलिंग, पायर्या, पुन्हा लग्नाचा हाॅल असा सगळीकडेच. तशीही बूट घालायची सवय गेली दोन वर्षे मोडली होतीच. त्यामुळे बुटाचे लोढणे न घेता फिरणेच मला छान हलकेहलके, मौजेचे वाटू लागले होते.
‘त्रिवेणी’ आश्रमात अनवाणी फिरणार्या ह्या भक्ताला पाहून इतर भक्त मंडळींचा माझ्याबद्दल आदर वाढतोय, असे मला उगीचच भासू लागले. पण तसा काही चमित्कार घडला नाही. माझ्या पायाकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आश्रमात बुटाच्या sole ला नव्हे तर “जय गुरुदेव!” ह्या विश्वव्यापी soul च्या पूजनालाच महत्व होते, हे अधोरेखित झाले.
बूटात पाय अडकवून कारपर्यंत ‘वाकडी’ पावले टाकत आलो. तत्पूर्वी परतीच्या मार्गावर मालकाची वाट पाहत पडलेल्या माझ्या उजव्या सोलला वाफ्यामधून उचलून कारमध्ये आणून टाकले. पुढे एखाद्या चांभाराचे दुकान दिसले तर “बुटाला सोल शिवून घेऊयात” असा एक पोक्त पण कळकळीचा सल्ला ड्रायव्हर सतीशने दिला.
आश्रमातून बाहेर पडून आळंदीजवळील एका छोट्या चपलांच्या दुकानात कामचलाऊ पण बरोबर मापाच्या सँडल्सचे शाॅपिंग झाले. तळपायांना sole आणि solace मिळाला आणि त्यासरशी तिथेच माझ्या ‘बाटा’ना करायचे ठरवले कायमचा टाटा! ??
© श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈