श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ संकट (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
कुसुमताई आता म्हातार्या- होत चालल्या होत्या. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी. आता त्यांना आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी मुलाकडे राहणे गरजेचे होते, पण त्यांना ठेवून घ्यायला कुणीच तयार नव्हते. प्रत्येकाची स्वत:ची काही कारणे-बहाणे होते. आपल्याला स्वत:च्या घरी ठेवून घ्यावं, म्हणून ती मुलांपुढे सतत गयावया करायची. पण कुणाच्याच मनाला पाझर फुटत नव्हता. शेवटी आपल्या जावयाने तरी मुलांची समजूत घालावी, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला आणि जावायला बोलावून घेतले. मुलगी आली, ती रडत रडतच. जावई या सगळ्याचे मूक दर्शक होते. ते गप्प बसलेले पाहून कुसुमताई म्हणाल्या, ‘जावईबापू तुम्ही तरी यांना समजावा ना! आता या वयात मी कुठे जाऊ?’
यावर जावईबापू म्हणाले, ‘आई, आपल्याला कुठेही जायची जरूर नाही. आपण माझ्याबरोबर चला. तीन वर्षापूर्वी माझे वडील गेले पण माझी आई तर मी जन्मल्यावर लगेच गेली. मी तिचा चेहराही पाहिलेला नाही. तुमच्या मुलीशी लग्न झाल्यापासून मी तुमच्या चेहर्यावतच माझ्या आईचा चेहरा पहातोय. चला माझ्या घरी. मी समजेन, माझी आईच पुन्हा मला मिळाली.’
कुसुमताईंना कळेना, या प्रस्तावावर काय बोलावं? हे ऐकल्याबरोबर मुलीचं रडणं थांबलं होतं आणि मुले गदगद झाली होती, जशी काही कुठल्या तरी प्रचंड संकटातून त्यांची सुटका झालीय.
मूळ हिंदी कथा – संकट मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈