श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ नारायणी नमोsस्तुते – भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिलं – `तसं नाही बेटा, मलाही वाटतं ना, पण हे कामच असं आहे, की मी नसलो, तर सगळं एकदम ठप्प होऊन बसतं.’ आता इथून पुढे )
खरं सांगायचं, तर मला काही तरी वेगळंच सांगायचं होतं, पण सांगू शकलो नाही. मी आणि माझी पत्नी कौसल्या, आम्हा दोघांना असे काही अनुभव आले आहेत, की लग्न-बिग्न अशा समारंभाला जाणं आम्ही टाळू लागलोय.
`या वेळी मात्र असं चालणार नाही. आम्हा भावंडांच्यातलं हे शेवटंचं कार्य. आपल्याला केवळ साखरपुड्यालाच नाही, तर लग्नालासुद्धा यायचय आणि गरज पडली, तर कन्यादानसुद्धा करायचय. आमचे पालक आता नाहीत. या परमुलखात आपल्याइतकं जवळंचं आम्हाला दुसरं कुणीच नाही. नात्यामध्येसुद्धा आमची ही चुलत बहीण नारायणी आम्हा बहिणींच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे.’
`नारायणभाऊ तर आहेत ना! आपल्या तिघा बहिणींचं कन्यादान तर त्यांनीच केलय ना!’
`आपण तर लग्नाला आला नव्हतात, मग आपल्याला कसं कळलं?’
`अग मुली, डोळे-कान उघडे असले, की जगात काय चाललय, हे घरबसल्यासुद्धा कळू शकतं. मी भले आलो नाही, पण अनुमान तर बांधू शकतो नं? नारायणभाऊंनी तुम्हा तिघी बहिणींसाठी जे काही केलं, तसं आज-काल क्वचितच बघायला मिळतं.’
`होय काका, नारायणभाऊ आमच्यासाठी भाऊच नाहीत, आमच्या वडलांसारखेच आहेत ते आम्हाला. आमच्या घरी दरोडा पडला, तेव्हा आम्ही अहमदाबादला राहत होतो. आमच्या आईला दरोडेखोरांनी सुरा भोसकून मारलं. बाबांचं डोकं कुर्हाडीच्या वाराने फुटलं होतं. दरोडेखोरांना विरोध करताना शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. हॉस्पीटलमध्ये अनेक दिवस मरणाशी झुंज घेत शेवटी ते मरण पावले. दरोडेखोरांनी आम्हा चौघा भावंडांना एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. नंतर आम्हाला बाहेर काढलं गेलं, तेव्हा आमचे आई-वडील काही आम्हाला दिसले नाहीत. सगळं घर रक्तरंजित झालं होतं, जशी काही रक्तानेच होळी खेळलीय. मी आणि नमिताताई ते दृश्य बघून बेशुद्धच पडलो. नारायणभाऊ तेव्हा सहावीत शिकत होता. बाबांना खूप वाटायचं की शिकून-सवरून नारायणभाऊ मोठा माणूस बनेल. तो खूप हुशारही होता. पण सगळं राहून गेलं.
घरमालकांची बेकरी होती. त्यांनी नारायणभाऊला ब्रेड विकण्याचं काम दिलं. काही दिवसानंतर तो दुधाच्या पिशव्या टाकू लागला. नंतर वर्तमानपत्रही. सकाळची ही काम उरकल्यानंतर नारायणभाऊ दिवसभरात आणखीही काही काही कामं करू लागले. तथापि त्यांनी ब्रेड विकणं मात्र सोडलं नाही, कारण बेकरीतून आम्हाला शिळा ब्रेड फुकट आणि भरपूर मिळत असे. काही दिवसानंतर त्याला एका लेडीज गारमेंट शॉपमध्ये सेल्समनची चांगली नोकरी मिळाली. पगारही चांगला मिळू लागला. आम्हा बहिणींचं शाळेत जाणं पुन्हा सुरू झालं. कधी कधी त्याला रात्रीही दुकानात थांबावं लागत असे. त्यांचा तयार कपड्यांबरोबरच साड्यांचाही मोठा विभाग होता. शहरातलं बहुतेक सगळ्यात मोठं दुकान त्यांचं होतं. दिवसभर गिर्हाहाईकांना उघडून दाखवलेल्या साड्यांचा ढीग लागलेला असायचा. त्यांच्या व्यवस्थित घड्या करून दुसर्या दिवशी पुन्हा गिर्हाईकांना दाखवण्यासाठी नीट ठेवून द्याव्या लागत. या कामाला बर्याचदा वेळ लागायचा. मग रात्री सेल्समन तिथेच झोपत.
क्रमशः….
मूळ हिंदी कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈