श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ नारायणी नमोsस्तुते – भाग ४ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं – खूप काळ पसरलेल्या गडद धुक्यानंतर जसा काही नहुषाच्या चेहर्‍यावर सूर्य उगवला होता. आता इथून पुढे )

`हो बेटा, नक्कीच येईन. वेळ तेवढी कळव.’

`अकरा वाजताचा मुहूर्त आहे, पण आपण साडे दहापूर्वी हजर राहायला हव!’ नहुषाचा आत्मीयतापूर्ण आग्रह बघून मी समारंभाला जायचं ठरवलं. गेलोही. पण खूप उशीर झाला होता. मी कार्यालयाच्या बाहेर पडणार,  एवढ्यात बाहेर गावचा एक परिवार कार्यालयात येऊन दाखल झाला. त्यांच्या दोन मुली होत्या. पोस्ट गरॅज्युएट. दिसायला सुंदर पण दोघी अपंग. जन्मापासून. कुणी तरी कार्यालयाचा पत्ता दिला आणि ते इथे पोचले होते. मुलीही बरोबर होत्या. मी टाळू शकलो नाही.

मी हॉलवर पोचलो, तेव्हा साखरपुड्याचा विधी संपून गेला होता. मला ओळखणारं तिथे कुणीच दिसलं नाही. एकदा वाटलं, आपण परत फिरावं. एवढ्यात नहुषानं मला बघितलं. पाहुण्यांमधून वाट काढत ती माझ्यपर्यंत पोचली.  चेहर्‍यावरून नाराजी स्पष्ट झळकत होती.

`मला माफ कर पोरी! इच्छा असूनही मी वेळेवर येऊ शकलो नाही! असं झालं की…’

`काही हरकत नाही काका. जे झालं ते झालं! या. मी पाहुण्यांशी आपली ओळख करून देते.

माझे डोळे आतुरतेने नारायणभाऊंचा शोध घेत होते. मी नहुषाला विचारलंसुद्धा, `नारायणभाऊ कुठे दिसत नाहीत?’

`हो. त्यांची पण भेट घालून देते, पण आधी पाहुण्यांना तर भेटा.’  एवढ्यात नलिनी आली. मी तिला खूप दिवसांनी बघत होतो. ती आल्याबरोबर नहुषाने `नलिनीआक्का ‘ म्हणून तिला हाक मारली नसती,  तर मी कदाचित् तिला ओळखलंही नसतं. मला पाहताच ती म्हणाली, `आजच्या समारंभात आमच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती होतात, पण तुम्हीच उशीर केलात. ठीक आहे. आलात ना! या. मी आपली पाहुण्यांशी ओळख करून देते.` आता नहुषाचा चार्ज नलिनीने आपल्याकडे घेतला. बहिणींमध्ये सगळ्यात मोठी असल्याने तिने उचललेली ही जबाबदारी माझ्या मनाला कुठे तरी स्पर्श करून गेली.

एकेक करत आठ-दहा पाहुण्यांशी तिने माझी ओळख करून दिली. ओळख करून देताना `आमचे काका म्हणजे आमचे लोकल गार्डियनच, अशा स्वरुपात ओळख करून दिली जात होती. माझ्यासाठी `काका’ हे संबोधन ठीक होतं,  पण लोकल गार्डियन’ ऐकताना काहीसं असहज वाटत होतं. पण त्यावेळी गप्प राहण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. वास्तविक नारायणभाऊ असताना या बहिणींनी मला लोकल गार्डियन बनवण्याची काहीच गरज नव्हती. माझे डोळे सतत नारायणभाऊंचा शोध घेत होते. परिचयानंतर सगळ्यांसाठी फराळाचे पदार्थ आले. ही जबाबदारी नमिता आणि नहुषा मोठ्या कौशल्याने पार पाडत होत्या. थोड्या वेळात निरोप घेऊन गाड्यांमध्ये बसून पाहुणे निघून जाऊ लागले. त्यावेळीही नारायणभाऊ न दिसल्याने माझ्या मनात अनेक शंका घर करू लागल्या. मला वाटलं, की हा विवाह नारायणभाऊंना मान्य नसणार किंवा मग काही तरी कौटुंबिक कारण असणार, की ज्यामुळे ते या समारंभाला हजर राहू शकले नसणार. त्याचबरोबर असंही वाटून गेलं,  की या सगळ्या बायकांमध्ये परिवाराच्या वतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणी ना कुणी पुरुष हवा,  म्हणून मला पुढे केले असणार.  मी तिथून निघण्याचा विचार करतच होतो,  एवढ्यात घुंघट घेतलेल्या एका मुलीला घेऊन तिघी बहिणी माझ्यापुढे हजर झाल्या. माझ्या लक्षात आलं, घुंघट काढलेली ती मुलगी नारायणीच असणार. तिने मला चरणस्पर्श केला. मी `शुभं भवतु’ म्हणत शंभर रुपयाची एक नोट तिच्या हातात दिली. नमिता आणि नहुषाबरोबर नारायणी परत गेली. नलिनी मागे माझ्याजवळ थांबली. आता नारायणभाऊचा विषय काढणं योग्य झालं नसतं. मी नलिनीचा निरोप घेतला, तेव्हा दबक्या आवाजात म्हणाली,

`काका, नारायणभाऊंना नाही भेटणार?’

मी चकित होऊन नलिनीकडे बघू लागलो.  दोन-तीन पाहुणे परत जाण्याच्या तयारीत, शेजारीच  उभे होते. नलिनीने डोळ्यांच्या इशार्‍यानेच मला `या’ म्हंटलं आणि रस्ता काढत ती पुढे निघाली. एका खोलीत प्रवेश करत ती म्हणाली, `काका, हे बघा नारायणभाऊ. आपण भेटा त्यांना.’ एवढं बोलून ती पुन्हा बाहेर उभ्या असलेल्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी मागे वळली. मी खोलीत बघितलं. दोन खुच्र्यांवर नमिता आणि नहुषा बसल्या होत्या. दिवाणावर नारायणी बसली होती. तिला मी आत्ता आत्ताच बाहेर भेटलो होतो. एक खुर्ची रिकामी होती. तिच्यावर बसत मी विचार केला,  बहिणी बहिणींनी माझी थट्टा करण्याचं ठरवलेलं दिसतय.  मी खिन्न झालो. काय बोलावं, मला कळेचना. एवढ्यात नारायणीकडे लक्ष वेधत नहुषा म्हणाली, `काका अजूनही आपण आपल्या नारायणभाऊंना ओळखलं नाहीत?’

क्रमशः….

मूळ हिंदी  कथा – ‘नारायणी नमोsस्तुते’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments