सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ सोनं -भाग पाचवा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(सोन्याचे दागिने कनकला आता वापरायला देण्यापेक्षा लग्नातच द्यावे, म्हणजे कोरे करकरीत दिसतील, असं सुमाला वाटलं……)
आतापर्यंत बऱ्यापैकी सोनं जमलं होतं. यापुढे लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमवायला सुरुवात करायची, असं सुमाने ठरवलं.
‘सगळे दागिने घालून कनक किती सुंदर दिसेल! तिला बघून आपल्या जावांची नाकं कशी ठेचली जातील!आपलं हे कर्तृत्व बघायला सासूबाई असायला हव्या होत्या.’
कनकसाठी स्थळं बघायला सुरुवात केली तिने.
एक दिवस कनकच सांगत आली, ऑफिसमधल्या एका मुलाने तिला लग्नासंबंधी विचारल्याचं.
कौशल चांगला होता. दिसायला, शिक्षणाने, स्वभावाने. एकुलता एक होता. मुंबईचा होता.
लग्नानंतर दोघेही अमेरिकेला जाणार होते.
मग त्याचे आईवडील आले.
सुमाला त्यांचं आदरातिथ्य किती करू आणि किती नको, असं झालं.
” आमची कनक तर तुम्हाला पसंतच आहे. देण्याघेण्याचं म्हणाल, तर तिला अगदी सोन्याने मढवून लग्नाला उभं करणार आम्ही. बांगडया, गोठ, पाटल्या, पिछुडी, पाच प्रकारचे हार, चार प्रकारच्या माळा, दहा डिझाईनची कानातली, बाजूबंद, वाकी, कंबरपट्टा, झालंच तर आठ -दहा अंगठ्या …… लग्नही दणक्यात करूया . दोघांच्याही घरचं एकमेव कार्य. कुठे काही कमी पडायला नको. विशेषतः दागिन्यांत…..”
“छे , छे!”कौशलची आई म्हणाली,”अहो, लग्नानंतर दोघं जाणार अमेरिकेला. तिथे थोडीच घालणार आहे ती गोठ आणि बाजूबंद? आणि मुंबईत तरी कुठे सोय आहे दागिने घालून मिरवायची!तेव्हा दागिने इथेच राहू देत.”
कनकची बोलतीच बंद झाली होती.
ती मंडळी गेल्यावर कनकने विचारलं, “आई, आपण एवढे गरीब आहोत, तर आपल्याकडे एवढं सोनं कुठून आलं?”
मग सुमाने तिला अथपासून इतिपर्यंत सगळं सांगितलं.
तिला वाटलं होतं, कनक आपले आभार मानेल, आपलं कौतुक करेल.
पण कनकचं डोकं सटकलं. “ती आजी एक मूर्ख होती. पण ती तरी जुन्या काळातली. शिकलेलीही नव्हती धड. तू तर या काळातली आहेस ना?आणि थोडंफार शिकलेलीही आहेस. तरी तू असं मूर्खासारखं वागलीस? तुला माहीत आहे, आई, तू काय केलंयस? या सोन्याच्या हव्यासापायी माझं बालपण माझ्यापासून हिरावून घेतलंस. माझ्या मैत्रिणी, माझा मैत्रीचा हक्क माझ्यापासून ओरबाडून घेतलास.आपली परिस्थिती वाईट नसूनही साध्यासुध्या सुखांनाही मला वंचित केलंस. मला वाटायचं, आपण इतरांच्या मानाने खूप गरीब आहोत, म्हणून. मी जन्मभर तो कॉम्प्लेक्स घेऊन जगत आले.
एक गोष्ट सांगून ठेवते . तू हे जे जमवलं आहेस ना, त्यातलं कणभरही सोनं मी माझ्या अंगाला लावून घेणार नाही.”
सुमाचं डोकं गरगरू लागलं. सासू, जावा, मावशी, तो दागिन्यांनी भरलेला लॉकर…. सगळ्यांनी आपल्याभोवती फेर धरलाय, असं वाटून ती मटकन खाली बसली.
समाप्त
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈