श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
जीवनरंग
☆ वारकरी…सिद्धी पाटील भुरके ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
गोविंद अपार्टमेंटमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढल्यामुळे खळबळ माजली होती. सत्तर वर्षांचे जोशी आजी-आजोबा कोरोनाबाधित झाले होते. दोघांनाही सौम्य लक्षणं असल्याने हॉस्पिटलमधे न ठेवता घरातच राहण्यास सांगितले होते. सकाळीच पालिकेचे लोकं येऊन जोशीआजोबांचा मजला सील करून गेले होते.
इथे मीराला सकाळपासून नुसते फोनवर फोन येत होते. काही नातेवाईकांचे- काही मैत्रिणींचे.
“अग तुमच्याच सोसायटीमधे सापडले ना रुग्ण?? “
“बापरे.. आता काय होणार ग तुमचं?? “
वगैरे वगैरे कोरड्या काळजीचे फोन घेऊन मीरा जाम वैतागली होती. सोसायटीच्या वॉट्सअप ग्रुपवर तर कहरच चालू होता. जोशी आजीआजोबांना अगदी वाळीत टाकल्यातच जमा केलं होतं.
मीराला प्रश्न पडला होता की ज्यांना हा आजार झाला आहे, ते कसं करतील याबद्दल कोणी चकार काढला नाही. बाकी नको त्या गोष्टींवर चर्चा करत बसलेत सगळे. “खरंच किती चांगले आहेत जोशी आजीआजोबा.. दरवर्षी न चुकता पुणे ते सासवड वारीला जाणारे ते विठ्ठलभक्त दोघे कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात.. नेहमी आनंदी राहणारे.. मुलगा परदेशात स्थायिक झाल्याने पडत्या वयात एकमेकांना आधार देऊन राहणारे एकदम हैप्पी गो लकी कपल आहेत ते सोसायटी मधले आणि त्यांच्यावर ही वेळ यावी?? अर्थात कोणाचा स्वभाव बघून हा रोग होत नाही.” या सगळ्या विचारांचे मीराच्या मनात काहूर माजले होते.
इथे जोशी आजीआजोबा तापाने फणफणले होते. तोंडाची चव गेली होती आणि अंगात अजिबात ताकद नव्हती. तरी कसंबसं आजींनी डाळतांदळाची खिचडी केली होती आणि ती खाऊन दोघे निपचित पडून होते. आजी राहूनराहून विठ्ठलाचा धावा करत होत्या.
“पांडुरंगा अरे काय वेळ आणलीस आमच्यावर.. काय चूक झाली आमची? तुझ्या दारी मरण यावं हीच इच्छा होती. पण आता आमचे मृतदेह पण कोणी घेणार नाही. कुठे कमी पडलो आम्ही तुझ्या भक्तीत? “– “अग असं अभद्र बोलू नकोस. काहीही होणार नाहीये आपल्याला. शांत हो बघू आधी “. जोशी आजोबांनी आजींना शांत केलं.
इथे आपलं मन शांत करण्यासाठी मीराने पुस्तकांचे कपाट उघडलं आणि चांगलं पुस्तक शोधू लागली. तोच तिच्या हाती तिच्या आजीने लहानपणी भेट दिलेले ‘गोष्टी संतांच्या ‘हे पुस्तक लागले. पुस्तक घेऊन मीरा थेट आजीच्या फोटोसमोर जाऊन बसली आणि एक एक गोष्ट वाचू लागली. आपल्या लाडक्या आजीच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. मीराची आजीसुद्धा पायी पंढरपूरची वारी करत असे. मीरा लहानपणी तिला नेहमी विचारत असे की “आजी वारकरी म्हणजे काय ग? ” –
“अग नुसती वारी केली म्हणजे कोणी वारकरी होत नाही. ज्याला जळी, स्थळी, काष्टी परमेश्वर दिसतो, भूतदया मानवता या तत्वांवर जो जीवन जगतो, तो खरा वारकरी .”
आजीचे हे उत्तर मीराला फार आवडे. आजीच्या आठवणीतून भानावर येऊन मीराने पुन्हा पुस्तक वाचायला सुरवात केली आणि त्या गोष्टी पुन्हा एकदा वाचून तिच्या हे लक्षात आले की देवानेही देवपण सोडून अडचणीत असलेल्या भक्तांची नेहमी मदत केलीये. या विचाराने मीरा भानावर आली. पटकन उठून स्वयंपाकघरात गेली. चहा आणि पोहे करून डब्यात भरले आणि तो डबा जोशीआजोबांच्या दारात ठेऊन आली.
घरी येऊन मीराने जोशीआजोबांना फोन केला आणि म्हणाली, “आजोबा दार उघडून डबा घ्या आणि हो, आजींना सांगा आजपासून सकाळसंध्याकाळ मी तुम्हाला जेवणाचा डबा देणार आहे. “
“अग मुली तुला माहितीये ना आम्हाला काय झालंय ते?” जोशी आजोबा म्हणाले.
“हो चांगलंच माहितीये. तुमच्या दारात डबा ठेवल्याने मला कोरोना होणार नाहीये . मी काहीएक ऐकणार नाहीये तुमचं. आजपासून तुमच्या जेवणाची मी सोय करणार आहे “. असं म्हणून मीराने फोन ठेऊन दिला. आणि त्या दिवसापासून अगदी सकाळच्या चहापासून ते रात्री हळदीच्या दुधापर्यंत सर्व काही मीरा जोशीआजोबांच्या दारात ठेऊ लागली.
असेच काही दिवसांनी दुपारी जोशी आजोबांचा मीराला फोन आला.
“आजोबा बस 15 मिनिटात डबा ठेवते.. सॉरी आज जरा उशीर झाला. “
“अग मुली किती गडबड.. मी तुला वेगळ्या कारणासाठी फोन केलाय. आज आमच्या पुढच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.. “
“आजोबा अहो काय सांगताय..!! किती आनंदाची बातमी दिली तुम्ही “..मीराचा चेहरा आनंदाने फुलला.
“हो.. आमच्या मुलालासुद्धा सांगितलं नाही अजून.. पहिला फोन तुलाच केला.. “
जोशीआजोबांकडून आज्जीने फोन घेतला आणि म्हणाल्या “मुली अगदी देवासारखी धावून आलीस बघ.. मी उगाच विठुरायाला दूषण देत होते. तुझ्या रूपात आमच्या मदतीला तो धावून आला बघ. “
“अहो आजी फार मोठेपणा दिला तुम्ही मला. मी फक्त माझ्या आजीच्या व्याख्येतील ‘वारकरी’ बनण्याचा प्रयत्न केला, जो मानवता आणि भूतदया या तत्वांवर आपले जीवन जगतो.” डोळे पुसत मीरा म्हणाली, “आज डब्यात गोडाधोडाचं देते. काळजी घ्या आजी.”
इथे जोशीआजींनी देवाजवळ दिवा लावून साखर ठेवली आणि विठूरायाची क्षमा मागितली आणि म्हणाल्या, “देवा तुझी लीला अपरंपार आहे. आज तुझ्या देवळाची दारं बंद झाली.. अगदी तुझी वारीपण रद्द झाली. पण तू घराघरात वास करून माणसातला देव बघायला शिकवलं. “
मीरासुद्धा आपल्या लाडक्या आजीच्या फोटोसमोर बसली.. हात जोडून आजीला म्हणाली,
“आज खरं मी तुझी नातं शोभतिये. तुझ्या शिकवणीमुळे आज मी वारकरी झाले.. हा वारसा असाच पुढे नेईन याची मी तुला खात्री देते. ” मीराचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि नकळत ती आजीचे आवडते भजन गाऊ लागली—–
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी——-
लेखिका – सिद्धी पाटील भुरके
प्रस्तुती :- संग्राहिका मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈