श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ पुस्तके (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
नरेंद्रजी आमच्या इथले सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे ते साहित्यप्रेमीही आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी साहित्य चर्चेचं एकदा आयोजन केलं होतं. शहरातील अनेक लेखक, कवी आणि श्रोते या कार्यक्रमात सामील झाले होते. नरेन्द्रजींनी बाहेर व्हरांड्यात एक टेबल ठेवलेलं होतं. त्यावर जुन्या, एकापेक्षा एक चांगल्या डायर्या ठेवलेल्या होत्या. शेजारी एक फलक टांगलेला होता. त्यावर लिहिलेलं होतं, ’ज्या व जितक्या डायर्या पसंत असतील, तितक्या नि:शुल्क घेऊन जा.’
चर्चेला आरंभ झाला, तेव्हा नरेंद्रजी म्हणाले, “ दर वर्षी अनेक डायर्या भेट म्हणून मिळतात. काही इतक्या सुंदर असतात, की टाकून द्यायला मन धजत नाही. जमेल तसा वाटत सुटतो. तरीही इतक्या साठल्या आहेत. तेव्हा विचार केला, की आपल्याला लिहायला उपयोगी पडतील.” चर्चा संपल्यानंतर नरेन्द्रजींनी बघितलं, सगळ्या डायर्या संपलेल्या होत्या. यामुळे उत्साह वाढून त्यांनी दसर्याच्या दिवशी आणखी एक उपक्रम केला. दसर्याच्या दिवशी समाजातले सगळ्या थरातले लोक त्यांना भेटायला रात्री उशिरापर्यंत येत असतात. दोन मुलांची लग्ने, त्याचप्रमाणे नातवंडांचे वाढदिवस यावेळी आलेल्या अनेक निरुपयोगी भेटींची अनेक पॅकेट्स् एका खोलीत किती तरी वर्षं जागा अडवून पडली होती. नरेन्द्रजींनी ती सगळी पॅकेट्स् बाहेर काढली आणि व्हरांड्यात ठेवली मागच्यासारखाच फलक लावला, ‘ ज्याला जे पसंत आहे, ते त्याने घेऊन जावे. ’ दुसर्या दिवशी सकाळी नरेन्द्रजींनी बघितलं, व्हरांड्यात एकही पॅकेट् शिल्लक नव्हतं.
एवढ्यातच नरेन्द्रजींनी आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला. अनेक लोक त्यासाठी उपस्थित होते. त्यांचे अभिनंदन करत होते. त्यांना शुभेच्छा देत होते. यावेळी त्यांनी आपल्याजवळ साचलेली सुमारे ५०० पुस्तके बाहेर ठेवली होती आणि त्यावर फलक लावला होता, ‘ ज्यांना जितकी पसंत आहेत, त्यांनी तितकी घेऊन जावीत.’
समारंभ संपल्यानंतर नरेन्द्रजींनी आपल्या व्हरांड्यात लावून ठेवलेला पुस्तकांचा ढीग बघितला, तेव्हा ते हैराण झाले. याचा शोध घेतल्यानंतर असं कळलं, की काही जण जेवण झाल्यानंतर आपआपल्या घरी गेले आणि त्यांनी आपल्या घरातून पुस्तके आणून त्या ढिगात टाकली. फलकाच्या आस – पास नरेन्द्रजींनी ठेवलेली पुस्तके जशीच्या तशी होतीच, पण त्या व्यतिरिक्त आणखी तीनशे –चारशे पुस्तके जमा झाली होती.
मूळ हिंदी कथा – ‘पुस्तके’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈