सुश्री निशा डांगे
☆ जीवनरंग : लघुकथा – लेक लाडकी या घरची – सुश्री निशा डांगे ☆
मृणाल माझी सून चार वर्षांपूर्वी सोनपावलाने घरात आली. तिच्या येण्याने जणू काही घराचा स्वर्गच झाला. क्षणार्धात तिने सर्वांची मने जिंकली. सतत हसतमुख असणाऱ्या मृणालणे आपल्या हास्यातुषाराने घरातील वातावरण आनंदी केले. घरातील सर्वच जबारदाऱ्या कौशल्यपूर्वक सांभाळून ती आपली वैद्यकीय सेवा करीत असे. माझ्या सर्व मैत्रिणींना हेवा वाटावा अशी सून मला लाभली. कधी सुनेची लाडकी मुलगी झाली कळलेच नाही. एकदम मागून येऊन मला बिलगायची. “आई” म्हणून तोंडभरून प्रेमाने हाक मारायची. मृणाल आजही तशीच बिलगते, मायेने आमचं सगळं करते पण तिच्या हास्यातील खळखळणं केव्हाच संपलंय. केवळ आमच्यासाठी हृदयात अपार दुःख साठवून कृत्रिम हास्य तिच्या ओठांवर असते. ती कधी जाणवू देत नाही पण मी तिची आई झालेय नं आता त्यामुळे तिचं दुःख माझ्या नजरेतून सुटत नाही. झोपेत ओली झालेली उशी मला तिच्या अंगावर पांघरून घालतांना दररोज दिसते.
मंदारला जाऊन आज चार वर्षे झालीत. मृणाल माहेरी न जाता आमच्यासाठी सासरी थांबली. मंदार आमचा एकुलता एक मुलगा तो गेल्यावर आम्ही एकाकी पडलो . मृणालने नवरा गेल्याचे दुःख पचवून मंदारची सर्व जबाबदारी उचलली. आम्हा म्हाताऱ्यांची आधारकाठी झाली. मृणाल आणि मंदार एकाच वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते. एक दिवस मंदार मृणालला घरी घेऊन आला व आम्हाला म्हणाला ही तुमची होणारी सून . मुलाने असे परस्पर सूत जुळवले त्याचं जरा मनाला लागलं पण मृणालला पाहताक्षणी वाटले इतकी गोड, गुणी मुलगी आम्हालाही शोधून मिळाली नसती. फार थाटामाटात विवाह सोहळा होऊन मृणाल सून होऊन घरी आली. दोघेही एकाच इस्पितळात काम करत होते. नवीन जोडप्याचा सुखाचा संसार चालू होता आणि अचानक एका अपघातात मंदार गेला. लग्नाच्या एका महिन्यात मृणालला वैधव्य प्राप्त झालं. ह्या प्रचंड आघातातून सावरून तिने मंदारचे नेत्रदान करण्याचा निर्यण घेतला. म्हणाली आई,” मंदारचे डोळे राहिले तर मला सतत वाटेल तो मला बघतोय, त्याच्या सुंदर डोळ्यांनी हे सुंदर जग दुसऱ्या कोणालाही पाहू दे.” आम्हाला तिचा निर्णय पटला. मंदारचे नेत्रदान झाले.
आज मी सुद्धा एक निर्णय घेतलाय तो म्हणजे माझ्या सुनेचा पुर्विवाह करण्याचा. तिलाही हक्क आहे आयुष्याची पुन्हा नविन सुरुवात करण्याचा, पुन्हा खळखळून हसण्याचा. तिच्यासाठी स्थळ शोधत असतांना महेश कुळकर्णी नावाच्या मुलाचे तिच्या योग्य एक स्थळ सांगून आले. ते भेटण्यासाठी आले तेव्हा मुलाला बघून मृणालच्या दुःखाचा बांध फुटला ती एकदम रडू लागली. ,” मृणाल काय झाले? तू एकदम अशी…….”
“आई, हा ……. म्हणून तिने महेशच्या डोळ्यावरच्या गॉगलकडे हात दाखविला. मग महेशच तिला सावरून बोलू लागला हा तोच गॉगल आहे जो तुम्ही मला मंदारच्या डोळ्यांसाठी भेट म्हणून इस्पितळात माझ्या बिछान्यावर ठेवून गेला होतात. त्यासोबत एक चिठ्ठीही होती असे म्हणत त्याने खिशातील एक कागद तिच्या समोर ठेवला त्यात लिहिले होते मंदारच्या डोळ्यांची काळजी घ्या. मंदारची खरी काळजी तर तुम्ही आहात न मी तीच घेण्यासाठी आलोय.
© सुश्री निशा डांगे
पुसद
मो 84218754
अति सुन्दर
बेहतरीन रचना, बधाई
सुस्वागतम् आणि अभिनंदन
अत्यंत भावपूर्ण कथा
वाह अप्रतिम