सौ. प्रियदर्शिनी तगारे

☆ जीवनरंग ☆ नजर ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆ 

दारावरची बेल वाजली. रजनीनं दार उघडलं. दारात समोरच्या फ्लॅट मधल्या काकू होत्या.

“आटपलं का तुझं?”

“हो काकू, आताच रमेश बॅंकेत गेले. मुलं तर आठालाच गेली शाळेत. तुमचं आवरलं ?”

“हो गं, म्हणूनच आले ना! बरं वाटतं तुझ्याशी बोलल्यावर. ये ना, बाहेरच पॅसेजमध्ये.”

दोघी पॅसेजमध्ये बोलत राहिल्या. एव्हढ्यात जिना चढून कुणी तरी वयस्क माणूस वर आला. तो जवळ आला आणि रजनीचं लक्ष त्याच्या डोळ्याकडं गेलं. ती एकदम दचकली. ‘अरे बापरे’असं  नकळत तिच्या तोंडून निघालं. काकूंची त्याच्याकडे पाठ होती. रजनीचा चेहरा पाहून त्या वळल्या. त्या माणसाकडं पहात बोलल्या, “या, हे आहेत घरात. येते गं रजनी “असं म्हणून काकू गेल्या.

सहा महिन्यांपूर्वी या गावात रमेशची बदली झाली होती. या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट त्यांनी  भाड्याने घेतला होता. समोरच्या फ्लॅट मधल्या काकूंची सोबत चांगली होती.थोड्याच दिवसात त्यांनी रजनीला आईसारखी माया लावली होती.

तो माणूस आला त्यानंतर दोन दिवसांनी दुपारच्याच काकू आल्या. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग काकू म्हणाल्या “रजनी, परवा तू त्या पाहुण्यांना बघून दचकलीस का ?”

रजनीनं न राहवून विचारलं,” काकू, ते ओळखीचे आहेत का तुमच्या ?”

“माझ्या बहिणीच्या दूरच्या नात्यातले आहेत ते. कुठल्याशा कार्यासाठी आले होते. पण तू …..”

रजनीनं क्षणभर काकूंकडं पहात आवंढा गिळला आणि ती बोलायला लागली,

“माझ्या लहानपणीची आठवण आहे ही. मी दहा-बारा वर्षांची असेन. घरात आई, बाबा, मी आणि माझी बहीण रागिणी एवढे होतो. आमच्या गल्लीत सगळी एकमजली लहान लहान घरं होती. आजूबाजूच्या घरातल्या सगळ्यांचं एकमेकांकडं येणंजाणं होतं. सगळ्या बायका एकत्र गप्पा मारत असत. आम्हा मुलींकरवी निरोपांची देवाणघेवाण होई तर कधी एखाद्या पदार्थ पोहचवला जाई. मी सगळ्यांकडं आनंदानं जात असे. फक्त गल्लीच्या टोकाला असलेल्या गोविंद अप्पांच्या घराकडे मात्र मी सहसा फिरकत नसे. खरं तर गोविंद अप्पांची बायको इंदिराकाकू आणि आमची आई यांची खूप मैत्री. पण मी तिकडं जात नसे याला कारण बापू, अप्पांचा धाकटा भाऊ. तसा तो मोठा होता, लग्न बिग्न झालेला. तो जेव्हां घरात असे तेव्हां घराच्या पायरीवर किंवा बाहेरच्या खोलीत उभा राहून सगळीकडे पहात असे. त्याची नजर फार विचित्र होती. त्या लहान वयातही मला त्यात काहीतरी वेगळं आहे हे जाणवत असे. त्यांच्या घरी जाऊन निरोप सांग असं आई म्हणाली की मी नाही म्हणायची. मग आईला राग यायचा. माझ्या न जाण्याला कारण होतं.

एकदा मी त्यांच्याकडे गेले. इंदिरा काकू  मागे स्वयंपाकघरात होत्या. तिकडे जाण्यासाठी मी निघाले तर मधल्या अंधाऱ्या बोळात बापूने मला……… त्याचा तो विचित्र स्पर्श आठवला तरी आजही अंगावर शहारा येतो. त्यावेळी मी आईला सांगू शकले नाही. काय सांगावं ते कळतच नव्हतं, खरं तर खूप काही घडलं नव्हतं. पण तरीही खूप काही होतं. त्याची नजर मनात धडकी भरवायची.

काकू, त्यादिवशी तुमच्या दाराशी त्यांना बघताच ती नजर आठवून मी दचकले.आई मला म्हणायची काहीतरीच विक्षिप्तपणा बाई तुझा. मग मलाही कधीतरी वाटायचं……..”

“नाही रजनी, तू चुकत नव्हतीस. हा बापू वागायला चांगला नव्हताच. बरं झालं; तेव्हां तू सावध झालीस. नाहीतर एखादा अवघड प्रसंग तुझ्यावर आला असता. मोठी माणसं काही वेळा लहान मुलांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करतात. पण त्याची मोठी किंमत मोजावी लागते. लहान मुलांना जेव्हां अशी जाणीव होते, त्यात नक्की तथ्य असतं”

काकूंचं बोलणं ऐकून रजनीला एव्हढ्या वर्षांनंतरही सुटल्याची भावना झाली.

 

© सौ.प्रियदर्शिनी तगारे

© सौ.प्रियदर्शिनी तगारे≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

लेख आवडला.