सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ प्रेम – भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(श्रीधरने नोकरी सोडली .गावी आलो….आता पुढे)
एक दिवस आईनं आपणहून बोलावलं. तेलपीठ लावून न्हाऊ घातलं. पायात सोन्याची जोडवी चढवली. खीर पुरणाचा स्वयंपाक केला. या मायेनं शरीर कातरलं. मन भरलं. थोपवलेले अश्रु वाह्यले.
आण्णा काही बोलले नाहीत पण नमस्कारासाठी वाकले तेव्हां त्यांचा थरथरता हात पाठीवरुन फिरला. .
श्रीधरने अनेक ऊद्योग केले.
शेतीचे प्रयोग झाले. अनेक व्यापारी एजन्सीज घेतल्या.
कारखाना ऊभारण्याची स्वप्नं पाहिली . मित्राबरोबर भागीदारीत कंत्राटदारी केली. पण अपुरा अनुभव आणि अपुरं भांडवल . . यामुळे हाती धुपाटणंच आलं. .
निवडणुका आल्या तेव्हां अनेक ऊठाठेवी करून ऊमेदवारी मिळवली. पण जातीयवादाने ऊचल खाल्ली अन् हाथी खुळखुळाच आला. .
आणि या सार्यात मी कुठेच नव्हते. मला त्याने कधीच विचारले नाही.
वेळोवेळी एव्हढच म्हणायचा,
“एकदा मला यात यश मिळू दे.. तुला सोन्याने मढवेन. मग आण्णा पाहतील.. !!”
मला त्याची दयाही यायची. त्याला सांगावसं वाटायचं”अरे आण्णा तसे नाहीत. तू धरसोडपणा सोड. खरंच काहीतरी करून दाखव, आण्णा स्वत: तुला जवळ करतील. “एकीकडे आण्णांनाही सांगावसं वाटायचं,”
“श्रीधर महत्वाकांक्षी आहे. पण तुम्ही कोणीतरी त्याच्या पाठीशी ऊभे राह्यलात तर त्याला यश मिळेलही..”
पण मी ना इथली ना तिथली. प्रेमापायी चाललेली ही ओढाताण… त्यात तुटलेली माझी स्वप्नं.. आणि हरवलेली मी….
मी माझ्याच विचारांत हरवले. कितीतरी वेळ.. खोल खोल बुडाले.. नीरजने मागुन येऊन गळ्यात हात टाकले, तेव्हां भानावर आले.
“आई आज्जी आली….”
अगबाई!!
मी पटापट पदरानच तोंड पुसलं. केस गुंडाळले अन् आईला हसतमुखाने सामोरी गेले.
“काय ग आई..? येना. बैस. तू कशाला आलीस इतके जीने चढून..?
मी आईला बसायला पाट दिला. पण आई काॅटवरच बसली.
“बाळ, रागावलीस माझ्यावर? दोन दिवस पाहतेय् तोंड फिरवून आहेस!.”
“नाही ग आई.. तुला ऊगीच असं वाटतंय्.. तुझ्यावर कशाला रागावू? हे बघ मी आता निघालेच होते. आला का हलवाई..?”
“ते राहू दे! हे बघ बैस मजजवळ..”
मला क्षणभर काहीच सुचेना. मनात काहुर माजलं.
काआली आई..?
“हे बघ. काल माझं आण्णांशी खूप भांडण झालं. मी त्यांना म्हटलं, जे झालं ते झालं. शेवटी आपलीच पोर आहे. तिची ही ओढाताण तुम्हाला कशी पाहवते? जन्मभर ही अशी काठीच घेऊन बसणार आहात का तिच्यासाठी?.. बाळ. आण्णांना तु ओळखत नाहीस का? किती माया आहे त्यांची तुझ्यावर…? शिस्तीचे करडे, व्यवहाराला पक्के असले तरी माया मऊ असते.. मी खूप बोल लावले तेव्हां त्यांनी मला सगळी कागद पत्रे दाखवली.”
“अग! सारं काही देणार आहेत तुला! सुरेखाला दिलं नाही त्याहुन तुला देणार आहेत. पण त्यांना ऊतावळेपणा आवडत नाही तू श्रीधरला……”
मग मी आईला थांबवले.
“नको आई. मला काहीच नको. मी कधी मागितलं का..? तो अधिकार मी केव्हांच गमावलाय्. . आणि तुम्हाला वाटतं तसं नाहीय्. . मी सुखी आहे. मला पैसे नको. मालमत्ता नको. तुझी माया आशिर्वाद हेच माझ्यासाठी मोलाचे. . आण्णांनाही हेच सांग. . मी त्यांचीच मुलगी आहे. त्यांचेच संस्कार आहेत मजवर.. माझं मन का इतकं कच्चं आहे..?”
मग मीच आईला समजावले. नकळत माझ्या दु:खावर वेदनेवर आघात करणारी, काटे टोचणारी आई.. अन् माझ्याचसाठी आण्णांशी भांडणारी माझी आई..
मी नीरजला पटकन् कडेवर घेतलं. त्याचे खूप पापे घेतले.
मी खूप आनंदले. हरवलेलं खूप काहीतरी गवसलं होतं…
“आई तू हो पुढे. मी आलेच. तू आज काहीच करु नकोस. मी सगळ्यांचा डबा घेउन तुझ्याकडेच येते. आण्णांच्या आवडीच्या सुरळीच्या वड्या केल्या आहेत.. छान जमल्यात..”
नीरजला कडेवर ऊचलून काळोख्या जीन्यातून सावकाश पायर्या ऊतरणारी, माझी ती वय होत चाललेली आई…
माझ्या डोळ्यातले मोती पटापट ओघळले……
समाप्त
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈