सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ गुंफण नात्यांची – भाग 6 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
आईच्या अगदी विरुद्ध टोकाचे विचार आहेत लेकीचे. काय काय ऐकायला आणि पाहायला मिळणार देव जाणे! बघता बघता तन्वीची परीक्षा संपली आणि घरामध्ये ट्रीपचे वातावरण तयार झाले. कपड्यांची बॅग, खाण्याची बास्केट, पाण्याचा कॅन, थोडीफार औषधं. नाही नाही म्हणता दोन मोठ्या बॅग्ज झाल्याच. शिवाय तिघींच्या पर्सेस. तन्वीच्या आईनं प्रवासाची चोख व्यवस्था केली होती. संपूर्ण ए.सी.चे रिझर्वेशन असल्यामुळे आरामच आराम होता. प्रवासात तन्वीचा चिवचिवाट सुरूच होता. मोठ्या मजेमध्ये आणि आनंदात प्रवास सुरू होता. तिघीजणी प्रसन्न होतो. दक्षिण भारतातली मोठीमोठी मंदिरं, अथांग समुद्रकिनारे, मोठमोठाली प्राणी संग्रहालयं, हिरव्यागार बागा बघून हरकून गेलो होतो. कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंदांचे स्मारक बघून मला आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले होते. लेकीवर असलेली नाराजी समुद्राच्या लाटांबरोबर केव्हाच मागे पडली होती. तिघींची मनं आनंदानं तृप्त झाली होती..
आता परतीचा प्रवास सुरु झाला होता. प्रवासाचा शीण आला होता. थोडाफार थकवाही आला होता. पण त्या रम्य आठवणी मनामध्ये सतत रुंजी घालत होत्या. समुद्राच्या लाटा, त्यांचा मखमली स्पर्श, सूर्यास्त आणि सूर्योदयाचे अलौकिक सौंदर्य, काय पाहिजे आता आयुष्यात?
कुठल्याशा एका स्टेशन वर त्यांच्या बोगीमध्ये तन्वी एवढाच एक मुलगा आणि त्याचे बहुदा वडील असावेत ते आले. झालं तन्वीला ओळख करून घ्यायला काही वेळच लागला नाही. ती सफाईदारपणे इंग्रजी बोलत असल्यामुळे भाषेचा अडसरच आला नाही. हिची आई आणि त्याचे बाबा लॅपटॉप वर आपले काम करण्यात गुंग होऊन गेले. आजी आपल्या नाती वर लक्ष ठेवून होत्या. नुसतेच लक्ष नाही तर करडी नजर ठेवून होत्या.
कार्टी किती मोकळेपणाने बोलतेय त्याच्याशी, ओळख ना पाळख. पण अगदी हातावर टाळी देऊन काय हसायचे? छे! हल्लीची मुलं फारच थिल्लरपणाने वागतात. दोघांनी आपापले फोन नंबर्स एकमेकांना दिले. नंबर सेव्ह करून झाल्यावर रिंग होते का चेक करून झालं. काय बोलत होते कोण जाणे? पण अखंड टकळी चालू होती दोघांची. आजी मात्र दोघांवर करडी नजर ठेवून होत्या.
बहुदा तो आणि त्याचे वडील उतरणार होते. त्याच्या वडिलांनी लॅपटॉप बंद केला. त्या मुलांनीही आपल्या पाठीवर सॅक अडकवली.
“बाय तन्वी, सी यू. वुई विल मीट ऑनलाइन, अँड बाय मोबाईल ओके? आय एम व्हेरी ग्लॅड टुडे. आय थँक गॉड फाॅर गिविंग मी अ व्हेरी स्वीट सिस्टर लाईक यू. बाय!” असं म्हणत हातानं बाय बाय करीत तो खाली उतरला.
मी तन्वीकडे पाहिलं. ती पण हलक्या हातांनी आणि भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप देत होती. पटकन उठून माझ्याजवळ आली.
” आजी, काय छान भाऊ मिळाला बघ मला या प्रवासात. अगं तो के. प्रसाद त्याला पण ना, मला बघितल्यावर बहिण असावी तर अशीच, असंच वाटलं. त्यालाही खूप फ्रेंड्स आहेत पण बहीण नाही. किती छान ना! आता आम्ही भेटणार सारखं नेटवर. फोनही करणार. आजी, मी पण आज खूप आनंदात आहे.”
उमललेल्या टवटवीत फुलासारखी स्वच्छंदी आणि आनंदी तन्वीला बघून आजीच मन भरून आलं. अजून सगळीकडे वाळवंट झालं नाही. अशी हिरवळ कुठेतरी उगवते आहे. नात्यांची गुंफण अजूनही फुलते आहे. वरवर रुक्षपणा जाणवत असला तरी आत कुठेतरी ओलावा आहे. आपल्या नकळत तो झिरपतो आहे. महिला राज्याचा गर्व किती जरी महिलांना वाटत असला तरी हा भावनिक आधारही तिला हवा आहे. हे नातं पूर्ण जळून खाक झालं नाहीये. कुठेतरी धुकधुक आहे. आपल्यासारख्यांनीच त्यावर फुंकर घालायला पाहिजे. त्याची जपणूक करायला पाहिजे. त्याचा ओलावा टिकवून ठेवला पाहिजे. त्याला प्रेमाचं पाणी घालायला पाहिजे.
तन्वीचा हात थोपटत आजीनं मनाशी निर्धार केला.
समाप्त
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈