श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ रखमाचं काय झालं ? – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆
बायजा म्हातारी एकीकडे पोराच्या मायेने भिजत होती, दुसरीकडे भाजी विकायचा खोळंबा झाल्याने मनातल्या मनात चरफडत होती. मधूनच तिला रखमाचा, सदाचा राग येत होता तर कधी मनात त्यांच्याबद्दल नाना शंका-कुशंका येऊन काळीज कुरतडून निघत होते. ती पोराजवळ बसून त्याला थोपटत असली तरी तिची नजर दारातून बाहेर दूरपर्यंत रेंगाळत होती .. दूरवर कुणी दिसले की तो सदाच असणार किंवा रखमाच असणार असे वाटून मनात आशा पल्लवित होत होत्या.. दुसऱ्याच क्षणी ते दुसरेच कुणीतरी आहे याची जाणीव झाली की मन कोंबडीवानी खुडूक होत होते. तिची नजर रस्त्यावरून वळून पोराकडे जात होती अन तिथेच थबकत होती.
पोराकडे पाहिले की मनातले सारे विचार क्षणकाळासाठी का होईना गळून पडत होते आणि मुलावरची माया मन भरून टाकत होती.. मायेने पोराला थोपटत असतानाच अचानक तिची नजर दरवाज्यातून बाहेर गेली.. दूरवर सदासारखाच कुणीतरी येताना दिसला.. तिची नजर त्याच व्यक्तीवर खिळून राहिली होती.. ती व्यक्ती काही अंतर पुढे आल्यावर तिला तो सदाच असल्याची खात्रीं पटताच बायजाची नजर त्याच्या अवतीभवती रखमाला शोधू लागली.. रखमा काही दिसेना..
‘ संगं रखमा न्हाई.. सदा एकलाच हाय..काय झालंय पोरीला कुणाला ठावं.. ? आजारली आसंल म्हणून दवाखान्यात तर ठेवली नसंल..? पर तसं आसतं तर पोराला एकल्याला घरात सोडून नसती गेली दवाखान्यात.. संगती नेलं असतं.. दवाखान्यात न्हाय तर मग रखमा हाय कुठं ?.. ‘ मनात नाना विचार येऊन गेले..
सदा दारात आला. हातात जेवणाच्या डब्याची पिशवी पाहून बायजा काहीशी चक्रावलीच.. ‘ म्हंजी.. सदा रातपाळी करून आलाय कामावनं.. मग रखमा कुठं हाय ? ‘
” बायजाज्जी तू ? येरवाळचा बाजार सोडून तू कशी इथं ? पोराला बरं न्हाय काय ? आन रखमा कुठं गेलीया .. औशिद आणाय गेलीया व्हय ? काय झालंय पोराला.. सांच्यापारी तर ब्येस खेळत हुता.”
बायजाला बाजार सोडून पोराजवळ थांबलेलं बघून काळजी वाटून सदाने विचारले.. पटकन हातातली डब्याची पिशवी तिथंच खिळ्याला अडकवून तो पोराजवळ बसला. बायजाला काय उत्तर द्यायचं आणि कसे उत्तर द्यायचं ते क्षणभर समजेचना..
” उगा नगं काळजी करू.. पोरगं बरं हाय . थांब वाईच पाणी आणून देते. हातपाय तोंड धू… “
तिने आतून पाण्याची कासांडी आणून दिली.
” पर रखमा हाय कुठं ?”
त्याच्या प्रश्नाला उत्तर न देताच ती झटकन आत गेली आणि तिने चहाचे आदण ठेवले. सदाला पिण्यासाठी तांब्याभर पाणी आणून बाहेर ठेवले. आणि चांगला कप कपभर चहा घेऊन बाहेर आली.
” आज्जे , पर रखमा …?
” च्या पे आदी.. गार हुईल ?”
चहा पिऊन झाल्यावर तिने विचारले,
” सदा, काल तुझं न तिचं भांडान झालंवंतं काय रं ? “
” न्हाय.. पर अशी का ईचारतीयास ? “
“आरं, येरवाळच्यानं रखमा घरात न्हाई.. मी बाजारला जाया निघालेवते, पोराचं रडणं ऐकाय आलं.. रखमाला दोनचार हाळ्या मारल्या.. एक न्हाय न दोन न्हाय.. इवून बघतीया तर दार निस्तं फुड केलेलं…”
बायजाने सदाला सुरवातीपासूनचे सगळे सांगितले तसे त्याला रखमाची जास्त काळजी वाटू लागली. विचार करकरून डोके फुटायची वेळ आली. मनात येणारा एकेक विचार मनच रद्द करीत होते.. एवढ्याशा पोराला घरात एकटे टाकून कोणतीही माऊली कुठे जाईलच कशी ? मग रखमा कुठे गेली ? कशी गेली ?कधी गेली ? आणि सर्वात महत्वाचे का गेली ? सारे निरुत्तर करणारे प्रश्न.. मनात खदखदत असताना, कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसताना बायजाच्या मनात प्रश्न आला.. ‘ रखमाला कुणी पळवून तर न्हेलं नसंल न्हवं ? ‘
मनात प्रश्न आला आणि बायजा अस्वस्थ झाली. मनातली शंका सदाजवळ व्यक्त करावी की नको अशी तिची द्विधा मनस्थिती झाली. तिचे मन स्वतःशीच मनातील कुशंका पडताळून पाहू लागले. रखमा तरुण होती, देखणी होती.. पण एका तान्हुल्याची आई होती.. पण एखादा नजर ठेवून पळवून न्हेणारा असेल तर.. त्याला तान्हुल्याशी काय देणं घेणं असणार म्हणा.. पण कुणी पळवून नेत असताना रखमाने आरडा-ओरडा केला असता .. सगळी गल्ली गोळा केली असती.. मग ती स्वतःहूनच गेली असेल काय ? बायजाच्या मनात आलेली, ‘ ती स्वतःहून पळून जाण्याची शंका’ तिने स्वतःच धुडकावून लावली. ती रखमाला चांगलेच ओळखत होती… मनात नाना शंका – कुशंका येत होत्या आणि त्या चुकीच्या वाटून रद्दही होत होत्या.. पण एक अनुत्तरित प्रश्न मात्र मन पोखरत होता, मग नेमके तिचे झालंय काय ?
बायजा स्वतःच्या विचारांच्या नादात असतानाच अचानक तिचे सदाकडे लक्ष गेले.. तो काहीच न सुचून, गुडघ्यात तोंड खुपसून हताश होऊन रडत होता. बायजा उठली . त्याच्या पाठीवर हात ठेवून धीर देत म्हणाली,
” आरं , असे बसून कसे चालंल.. रखमाचा तपास कराय नगं..? ती कायतरी कारणाने म्हायेराला गेली हाय का ते बगाय पायजेल.. उठ.. असा बसून नगं ऱ्हाऊस.. मी हाय पोरापाशी “
माहेरी जाण्याचा मुद्दा बायजाला स्वतःलाच पटला नव्हता तरी तिने त्याला हताशपणातून बाहेर काढण्यासाठी उगाचच त्याला सांगितला होता…
त्याच्या मनात आशेचा काजवा टिमटीमला असावा.. तो झटक्यात उठला आणि बाहेर पडला.
क्रमशः ….
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈