श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण बघितलं – बरं का श्रोते हो, एक अहिराणी ओवी आहे. माहेर कशासाठी? .. तर… `पावलीनी चोळी, एक रातना विसावा… आता इथून पुढे’)
मालतीला वाटलं, वसूच्या कथेतून आपलाच जीवन प्रवाह वाहतो आहे. त्यावेळी मनोहर म्हणाला होता, `दुसरी सोय होईपर्यंत तरी राहू दे.’ पण मालती म्हणाली, `नको. आता इथं राह्यलाच नको.’ इंदूतार्इंनी तिची रुखवताची भांडी तिच्यापुढे आणून आपटली. भांडी, आपले कपडे घेऊन दोघे निघाली. तेव्हा महेश तिला ‘`घरी चल’’ म्हणाला होता आणि तिने त्याला अगदी असंच उत्तर दिलं होतं.
`वसूने मग एक लहान खोली भाड्याने घेतली. भाड्याच्या बदल्यात मालकिणीची पडेल ती कामे करायचं कबूल केलं तिने. मग या श्रमलक्ष्मीचे हात घरात आणि घराबाहेर राबू लागले. खोली लहानच खरी. पण तिची कळा बदलली. ती शोभिवंत, साजिवंत झाली. बघा… थोरा-मोठ्यांनी म्हंटलंच आहे, `यत्न तो देव जाणावा । देव तेथेचीपहावा।। ‘ खमाजमध्ये बांधलेल्या या ओळींना शोभा-मिरानं उचलून धरलं. मिहीर क्षणभर विश्रांतीसाठी थांबला.
मालतीचं मन भूतकाळात गेलं. घरातून बाहेर पडल्यावर मनोहर म्हणाला, `आत्याबार्इंकडे जाऊन पाहू या. दुसरी जागा मिळेपर्यंत तिथे राहतो, म्हणू या. त्यांचा वाडा आहे. रहायची जागा मोठी आहे. शिवाय दोघेच तिथे असतात. दोन्ही मुलींची लग्नं झालेली आहेत. मुलांचीही लग्नं होऊन ती आपापल्या नोकरीच्या गावी आहेत.’ निदान त्यांना विचारून तरी पाहूयात, असं म्हणत दोघेही मनोहरच्या सुशीला आत्याकडे गेली. आत्याबार्इंची पासष्ठी, तर आत्तोबांची, भाऊसाहेबांची सत्तरी उलटलेली. आत्याबार्इंना बरंच वाटलं. सोबतही होईल, आणि गरजेला उपयोगीही पडतील. आत्याने त्यांना अडगळीची खोली रिकामी करून दिली. भाड्याऐवजी मालतीने त्यांचं स्वैपाक-पाणी करायचं काम कबूल केलं.
मालतीचं आणि आत्यांचं गूळ-पीठ चांगलं जमलं. एकदा ती आत्यांना म्हणाली, `तुमच्या ओळखीत कुणाला शेवया, पापड, कुरडया, पुरणाच्या पोळ्या हव्या असतील, तर विचारा. मी करून देईन. हळू-हळू त्याच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. तिच्या हातांना काम मिळालं. पैसेही मिळाले. ऑर्डप्रमाणे बाजारातून सामान आणणं, तयार वस्तू पोचवणं, ही कामं मनोहर करू लागला.
एके दिवशी मनोहर म्हणाला, `तयार धोतर जोड्यांचं पिशव्यात भरून पॅकिंग करायचं काम मिळतय. शंभर नगाच्या पॅकिंगचे दहा रुपये मिळतील. करायचं? ‘
`करू या.’ मालती म्हणाली. मग मनोहर सकाळी जाऊन शंभर धोतरजोड्या व पिशव्या घेऊन येऊ लागला. रात्री सगळी कामे आवरली, की दोघेजण मिळून पॅकिंग करू लागली. दुसर्या दिवशी पॅकिंग पोचवायचं आणि नवीन काम आणायचं, असं सुरू झालं. असं मिळेल ते काम ती करत राहिली आणि पैसा पैसा जोडत राहिली.
मिहीरने फटका सुरू केला,
`श्रमलक्ष्मीचे हात राबती, घरी-दारी, इथे-तिथे।
कष्टावाचून जीवनी या, सौख्य कुणाला कधीमिळते?’
तर श्रोते हो, वसुंधराची परिस्थिती बघता बघता सुधारू लागली. ‘
मालती-मनोहरचा आता जम बसत चालला. रोजी-रोटी इतके मिळून थोडे-फार शिल्लकही पडू लागले. पण एवढंच मिळवून भागणार नव्हतं. संसार वाढणार होता. बाळाची चाहूल लागली होती. सातव्या महिन्यात महेश घरी बोलवायला आला, पण मालती म्हणाली, `बाळंतीण झाल्यावर येते.’ पोटात कळा येईपर्यंत ती काम करत राहिली. बाळंतीण झाल्यावर हॉस्पिटलमधून थेट माहेरी गेली. भाऊ-भावजयीनेही मोठ्या मायेने तिचे बाळंतपण केलं.
मालतीने विचार केला, मध्यंतरीच्या काळात तुटलेले सासरचे संबंध या नमित्ताने पुन्हा जोडूयात. आताशी मालतीला वाटू लागलं होतं, सासूबार्इंचं तरी काय चुकलं? कुठून त्या तिघांच्या पोटाला घालणार होत्या? नणंदा लग्न होऊन आपापल्या घरी. दीर पोटापाण्याच्यामागे नोकरीच्या गावी. आपला संसार संभाळून देणारा उचलून तरी किती देणार?
मालतीने बारसं थाटात केलं. त्या निमित्ताने तिने दीर-जावा, नणंदा, सासुबार्इंना बोलावलं. त्यांचे मान-पान केले. पैशाची जुळणी तिने आधीच करून ठेवली होती. सासरच्यांनीही चांगला बाळंतविडा केला. इंदूताई आता त्या दोघांना पुन्हा घरी चला, म्हणायला लागल्या. त्यावेळी आपलं चुकलं, निराशेच्या भरात आपण काय बोलत होतो, तेच कळत नव्हतं, असंही म्हणाल्या. सगळ्यांच्या पुढे हात जोडून माफी मागितली, पण मालती म्हणाली, `तुम्ही हात नका जोडू. तेव्हा तुम्ही थोड्या कठोर झालात, म्हणूनच आम्ही हात-पाय हलवायला लागलो. कुणाची लाचारी न पत्करता स्वाभिमानाने सुखाचे चार घास खाऊ लागलो.’ ती पुन्हा त्या घरात मात्र गेली नाही. सासुबार्इंना म्हणाली, `तुम्हाला जेव्हा नातवाला बघावं-भेटावंसं वाटेल, तेव्हा तुम्हीच येत चला.’ तिने बाळाचे नाव सुहास ठेवलं. तिला वाटलं, बाळाच्या नावाप्रमाणे त्याला बघताक्षणी सर्वांना प्रसन्न वाटू दे.
सुहास सहा महिन्याचा झाला, तेव्हा केव्हा तरी शिवण-कर्तनाच्या टिचर्स डिप्लोमाची जाहिरात मालतीच्या वाचनात आली. तिला शिवण येतच होतं. पण हा डिप्लोमा केला, की सरकारी शिवणाचे वर्ग तिला घेता येणार होते. मनोहरने क्लासच्या वेळात बाळाला संभाळायची जबाबदारी स्वीकारली आणि ती शिवणवर्गाला जाऊ लागली. फस्र्ट क्लासमध्ये ती परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर पुढे दोन वर्षे तिने शिवणाचे सरकारी वर्ग घेतले. तोपर्यंत दुसर्या बाळाची चाहूल लागली. मग मात्र तिने ते वर्ग बंद केले. बाकी शिवण शिवून देणं, आणि पदार्थ करून देणं, ही तिची कामे चालूच होती. पदार्थांच्या आर्डर्स खूपच वाढू लागल्या होत्या. दिवाळीचे पदार्थही ती मागणीप्रमाणे करून द्यायची. मोदक, पुरणपोळ्या, सुरळीच्या वड्या, चकल्या हे पदार्थ म्हणजे तर तिची खासियत होती. आता या ऑर्डर्स इतक्या वाढू लागल्या, की त्या त्यावेळी तिघी-चौघींना मदतनीस म्हणून तिला घ्यावं लागे.
क्रमश:….
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈