सौ. गौरी सुभाष गाडेकर
जीवनरंग
☆ मारुती – भाग चौथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
(कथासूत्र :दगड्याच्या अंगात मारुती आला नसून ती ऍलर्जीमुळे आलेली सूज आहे, या भावड्याच्या म्हणण्याला डॉक्टरांनी दुजोरा दिला व त्यावर औषध दिलं…..)
भावड्या घरी पोचला, तेव्हा म्हादेव येऊन बसला होता. “द्येवा, मारुतीराया, तू बरोबर मार्ग दावलास. माजी म्हस मला गावली. बोल्ल्यापरमाणं नारळ फोडतो.”त्याने दोन नारळ फोडले आणि दहा रुपयेही ठेवले मारुतीसमोर. नाम्याच्या पोराला नोकरी लागली.तोही खुश होऊन आला. त्याने पेढे आणि वीस रुपये ठेवले.
आजूबाजूच्या इतर गावातलेही लोक दर्शनाला येऊ लागले. आतापर्यंत एका पैशाचीही कमाई नसलेल्या दगड्यामुळे इतके पैसे घरात यायला लागले, म्हटल्यावर घरची परिस्थिती तर सुधारली होतीच ;पण सगळे दगड्याला मानही देऊ लागले होते.
भावड्याने मोबाईलवर दगड्याचा फोटो काढला आणि डॉक्टरांना पाठवला. नंतर त्याने डॉक्टरांना फोन लावला.
“हो. आपला कयास बरोबर होता. त्याला कसलीतरी ऍलर्जीच झाली आहे. मी दिलेलं औषध दे त्याला. म्हणजे निदान वाढणार तरी नाही सूज,”डॉक्टरांनी सांगितलं.
भावड्याने मनोभावे मारुतीला नमस्कार केला. तो म्हातारीला म्हणाला,”आई, आपली पुण्याई म्हणून मारुती आपल्या घरात आला. मी एक दिवस उशिरा आलो, पण आता मात्र मी त्याची सेवा करणार. माझ्या हाताने मी त्याला भरवणार.”
भावड्याने एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला, तेव्हा त्याला जाणवलं, की प्रकरण वाटतं, त्यापेक्षा कितीतरी पटीने गंभीर आहे. सगळ्याच दृष्टीने.
एक म्हणजे दगड्याच्या तोंडाला आलेली सूज उतरायला हवी. त्याचं शरीर दारूने आधीच एवढं पोखरलेलं आहे, की दुसरं टॉक्सिन ते कितपत पचवू शकेल, ते सांगता येत नाही. त्यामुळेच ही ऍलर्जी झाली आहे, हे नक्की.ही ऍलर्जी कसली आहे, हेही माहीत नाही. एकूण, त्या पेशन्टबाईंवर औषधाचा जसा लवकर परिणाम झाला, तसा दगड्याच्या बाबतीत होईल की नाही, याची गॅरंटी नाही.
दुसरं म्हणजे त्याला बरं वाटलं, त्याच्या चेहऱ्यावर आलेली सूज उतरली, तर त्याचा आनंद वाटणारी व्यक्ती फक्त आपणच असणार.त्याला मिळणारे पैसे, नैवेद्य, मान वगैरेमुळे घरातल्या माणसांची इच्छा, त्याने असंच राहावं, अशी असणार. बाकीच्यांचं सोडाच; पण खुद्द दगड्याही हे देवत्व एन्जॉय करतोय.
आणि आजूबाजूच्या माणसांना कळलं, की हा मारुती-बिरुती नसून ही ह्याला झालेली ऍलर्जी आहे, तर सगळे मिळून दगड्याला तर पिटून काढतीलच, पण घरच्यांनाही सोडणार नाहीत.
यातून काय मार्ग काढावा बरं?
दगड्यासमोर डोळे मिटून, मांडी घालून बसलेला भावड्या खऱ्या मारुतीला आळवू लागला,’मारुतीराया, तुम्हीच सांगा – यातून माझ्या दगड्याची आणि घरातल्या इतरांची सुटका कशी करायची?’
आणि मारुतीने भावड्याला मार्ग दाखवला.
भावड्या उठला. दगड्याच्या पुढ्यात पण दगड्याला पाठमोरा, गर्दीकडे तोंड करुन उभा राहिला. दोन्ही हात वर करुन ओरडला, “थांबा. गप्प राहा सगळे.”
त्याबरोबर सगळेच बोलायचे थांबले आणि उत्सुकतेने त्याच्याकडे बघू लागले.
“मी आता इथे बसून मारुतीस्तोत्र म्हणत होतो, तेव्हा मारुतीने मला दृष्टांत दिला.”
हे ऐकताच लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली.
“शांत राहा. मारुती माझ्याशी काय बोलला, ते ऐकायचं असेल, तर सगळे शांत व्हा.”
त्याबरोबर आपापसातलं बोलणं थांबवून सगळे भावड्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागले.
“मारुती म्हणाला, ‘मला तुमच्या गावात यावंसं वाटलं, म्हणून मी गावातल्या सगळ्यांत पुण्यवान माणसाची निवड केली. होय. हा दगडू अजाण लेकरू आहे. तो पित होता, हे खरं आहे. पण त्याच्या अजाणपणामुळे त्याच्या हातून घडलेल्या त्या चुकीला मी माफ केलंय.
हे सगळे लोक भक्तिभावाने माझ्या दर्शनाला आलेत. मी त्यांच्यावर प्रसन्न झालो आहे.
पण……… एखादा पापी माणूस माझ्यासमोर आला, की माझ्या अंगाची आग होते. जळणाऱ्या लंकेत माझ्या शरीराचा दाह होत होता, त्याचीच मला आठवण होते. तेव्हा, जर ती आग, तो दाह असह्य झाला, तर मी दगड्याचं शरीर, तुमचं हे गाव सोडून निघून जाईन. म्हणून शेवटचं सांगतोय, प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी विचार करा. आपण पाप केलंय, असा मनाचा कौल मिळाला, तर इथून निघून जा. नाहीतर मीच निघून जाईन. आजच असं नाही, उद्या, परवा, एरवा, तेरवा….. जेव्हा तुमच्या पापामुळे होणारा माझ्या अंगाचा दाह सहन करण्यापलीकडे जाईल तेव्हा.”
एवढं बोलून भावड्या वळला. दगड्याकडे वळून हात जोडून म्हणाला, “देवा, तुझा निरोप सगळ्यांच्या कानावर घातला.”
क्रमश: ….
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈