सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ व्हॅलेंटाईन डे भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
नाना-नानी यांचीआनंदी जोडी… पासष्ट वर्षाच्या संसारात परिस्थितीच्या रूपानेभोगाव्या लागलेल्या उन्हाच्या झळा, पावसाचा भडीमार, आणि बोचरी थंडी यांचा मोठ्या हिमतीने हसत हसत सामना केलेले.. ..छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणारे हे सुखी जोडपे.नानींचं माहेर इंदूरचं… लग्न झाल्या झाल्या नानी हे टोपण नाव ऐकलं की त्यांना कससंच वाटायचं .पण नवऱ्याची लहान भावंडंच काय सगळं घरदारच त्यांना नाना म्हणायचं .म्हणून मग त्या नानी! आणि नानांची सगळ्यांशीच आदराने बोलायची सवय… त्यामुळे त्या नानीजी आणि त्यांचे ‘हे’ नानाजी!
आठवड्यापूर्वीच आपल्या नातवाकडं मुंबईत राहायला आले होते. नातू अमर आणि नातसून नताशा आग्रह कर- करून आपला नवा संसार बघायला त्यांना घेऊन आले होते आणि कमीत कमी पंधरा दिवस झाल्याशिवाय परत जायचा विषयही काढायचा नाही, अशी त्यांना तंबीही देऊन टाकली होती.
“काहीही म्हणा हं नानीजी, सहा महिनेच झालेत लग्नाला, पण किती छान ट्यूनिंग जमलंय नाही यांचं ?फार छान वाटतंय हे पाहून ! आपल्या दोघी मुली, आणि ह्याचे आई-बाबा यु .एस. सोडायला तयार नाहीतआणि हा पठ्ठ्या अमर, सरळ मी इंडियात ‘सेटल’ होणार, तिथंच धंदा ,व्यवसाय करणार म्हणून ठासून सांगून इथे मुंबईला राहायला आलाय. शब्दाशब्दातून कौतुक भरून वाहत होतं . नानीजी तरी कौतुक करण्यात कुठल्या कमी पडायला!” ही नताशा किती गोड लाघवी मुलगी आहे नाही! आपण आलो त्याच दिवशी मला म्हणाली होती, “नानीजी सध्या तरी आपलं हे घर…म्हणजे हा वन बीएचके फ्लॅट छोटा आहे. असं करा, तुम्ही बेडरूम वापरा . आम्ही हॉलमध्ये”….” वा ग वा शहाणे!” मी म्हणाले , “आम्हालाच हा हॉल हवाय.. मोठा… ऐसपैस! किती प्रेमाने माझ्या कुशीत शिरली होती आणि मांडीवर डोकं ठेवून झोपली होती.”नानी च्या डोळ्यासमोर सारखं तेच चित्र येत होतं . अचानक आठवण झाल्यासारखं त्या म्हणाल्या,
“अरे हो, ती आज सांगून गेली आहे की त्यांचे डिनर आज बाहेर आहे आणि परत यायला पण आज उशीर होणार आहे. संध्याकाळी आपल्यासाठी जेवणाचे पार्सल येणार आहे. आठ वाजले होते नाना-नानी आपलं जेवण आवरून टीव्ही पहात बसले होते. तेवढ्यात दरवाजा धाडदिशी उघडून नताशा आत आली .हातातला मोठा बुके तिनं सेंटर टेबलवर व्यवस्थित ठेवला. पण पायातल्या चप्पल कोपऱ्यात उडवल्या. पर्स भिरकावून दिली आणि बेडरूमचा दरवाजा पण दणकन् बंद केला.
‘अमर कुठाय… तुमचं डिनर’
…वगैरे शब्द नानींच्या तोंडातून बाहेर पडलेच नाहीत. “हा काय प्रकार आहे ?”त्या हळू आवाजात नानांबरोबर बोलू लागल्या. मी गेल्या आठवडाभर पाहतेय… कधी चॉकलेटचा मोठा बॉक्स, कधी लाल गुलाबाची फुलं आणि त्या शोकेस कडं बघा, केवढा मोठा टेडी त्यांनीआणून ठेवलाय… आणि आज हा प्रकार! नानींना काहीच सुचेना.
“हा फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे नां,मग बरोबर आहे”नाना सगळे कोडे उलगडल्यागत बोलले,”कळलं का काही? हा व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि त्यात आज चौदा तारीख!”
“म्हणजे काय हो? काल परवा कुठल्याशा मालिकेत ऐकला हा शब्द. प्रेमाचा दिवस काहीतरी असतं म्हणे व्हॅलेंटाईन म्हणजे”….इति नानी उवाच!
नानींचा भाबडेपणा पाहून आलेले हसू आवरत नाना म्हणाले ,”अहो परदेशातल्या तरुण-तरुणींचा हा खास दिवस आहे. युरोपातील एका देशात एक व्हॅलेंटाईन नावाचा संत… चर्चचा फादर म्हणा हवं तर, होऊन गेला. प्रेम करणाऱ्या युगुलांचं तो लग्न लावून द्यायचा म्हणे. कारण तिथल्या सम्राटानं ‘लोकांनी लग्नं करायची नाहीत’ असा हुकूम काढला होता. व्हॅलेंटाइनचा आणि चौदा फेब्रुवारी या दिवसाचा काहीतरी संबंध असावा. त्यामुळे चौदा फेब्रुवारी हा प्रेमी जोडप्यांचा’दिवस व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करायची तिकडं पद्धत आहे.
क्रमशः ….
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈